Login

लेखणीची किमया.

लेखणीची किमया
लेखणीची किमया

एकदा एक भक्त मोठ्या भक्तिभावाने परमेश्वराची आराधना करत होता. त्याच्या खऱ्या भक्तीने परमेश्वर प्रसन्न झाले आणि त्याच्यापुढे प्रकट होऊन विचारले. प्रिय भक्ता, सांग तुला काय हवं.? शस्त्र हवे की अस्त्र.भक्त म्हणाला, देवा मला शस्त्र नको, शस्त्र दोन कारणासाठी वापरले जाते, एक स्वसंरक्षणासाठी व एक दुसऱ्याला मारण्यासाठी. मला स्वसंरक्षण नको. कारण तूच माझा रक्षक आहेस व मला इतरांना मारण्याचा काहीही अधिकार नाही. म्हणून तू मला लेखणी नावाचे अस्त्र दे. मी माझ्या लेखणीतून रसिकांना आनंद तर देत राहीलच पण चुकीचे पाऊल टाकणाऱ्यांना धोक्याचा इशारा सुद्धा देईल आणि काही आगळीक घडली तर लेखणी द्वारे त्यांची कानउघाडणी सुद्धा करेल. तथास्तु म्हणत परमेश्वर अंतर्धान पावले.

लेखकांमध्ये असलेली सृजनशीलता, सकारात्मक दृष्टिकोन, धीर धरण्याची वृत्ती आणि इतरांपेक्षा वेगळा विचार करण्याची क्षमता या सर्वांचा उपयोग निश्चितच समाजासाठी होत असतो. कवींच्या डोळ्यात तर निसर्गतः जणू प्रत्येक गोष्टीत सौंदर्य टिपण्याची एक खास ' लेन्स ' बसवलेली असते. म्हणूनच तो दगड धोंड्यातही सौंदर्य शोधतो. लेखणीची किमया ही अशी असते.

पुण्यात १८९६ ला प्लेगच्या साथीच्या वेळी रॅंड नावाच्या उद्दाम अधिकाऱ्याने जो लोकांचा अन्वनित छळ चालवला होता तेव्हा लोकमान्य टिळकांनी आपल्या 'केसरी' वृत्तपत्रातून 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?' असा जळजळीत लेख लिहून ब्रिटिश शासनावर घणाघाती टीका केली होती. सावरकरांनी सुद्धा ब्रिटिश शासनाशी लढा देताना ज्या हातात बॉम्ब पिस्तुले धरली त्याच हातांनी त्यांनी मृदू काव्येही लिहिली. लेखणीचे म्हणजेच ज्या हाताने शस्त्रे त्याच हाताने लेखणी हे अस्त्रही वापरले. कवीचे शब्द जेव्हा लेखणीमध्ये उतरतात तर ते कधी लोण्याहून मऊ आणि अमृताहुन मधुर होतात तर कधी वज्रापेक्षा कठोर व धारदार बनतात. ज्यावेळी मानवाला लेखनकला अवगत नव्हती तेव्हा ऋषीमुनींनी, विद्वान पंडितांनी सांगितलेले ज्ञान श्रुती आणि स्मृती द्वारे जतन करावे लागत असे. श्रुती म्हणजे ऐकणे व स्मृती म्हणजे स्मरणात ठेवणे परंतु लेखन कला अवगत झाल्यानंतर हे ज्ञान लेखणी द्वारे कागदावर उतरले जाऊ लागले व पुस्तक रूपाने ते ज्ञान लोकांपर्यंत पर्यंत पोहोचले आहे. जेव्हा समाज माध्यमांचा वापर नव्हता तेव्हा पत्र म्हणजेच लेखणी द्वारे आपल्या मनातील भावना लिहून दूरच्या नातेवाईकांपर्यंत पोहोचवल्या जायच्या. सीमेवर राहणारे सैनिक पत्र पाठवून आपल्या नातेवाईकांना धीर द्यायचे.
शब्दांनीच विणले आहे
जीवनरुपी वस्त्र
जपून वापरावेत शब्द
शब्द हे शस्त्र
शब्द हेच अस्र

शब्दांची धार तलवारीच्या धारेहून तेज असते. कटू शब्दांनी झालेले मनावरचे घाव वरून दिसत नसते.

समतावादी महापुरुषांनी लेखणी द्वारे हजारो वर्षाची गुलामी, लाचारी, पाखंड, अंधविश्वास यांचे जाळे सपासपा कापून माणसाला माणसात आणले. लेखणीची धार फक्त प्रसिद्धीसाठी नाही तर समाज परिवर्तनासाठी असावी. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी हेच म्हटले होते, 'एका लेखणीत हजार तलवारींची ताकद असते.' वाल्मिकींचे रामायण, व्यासाचे महाभारत हा समस्त भारतीयांचा अमोल ठेवा आहे. कालिदासांचे काव्य, रवींद्रनाथ यांच्या कविता भाषांची बंधने तोडून, दिशा, काल यांच्या मर्यादा ओलांडून संपूर्ण विश्वाच्या होतात. ज्योतिराव फुले यांनी 'शेतकऱ्यांचा आसूड' या पुस्तकातून शेतकऱ्यांच्या परिस्थितीचे अगदी चपखल वर्णन केले होते आणि शेतीची परिस्थिती सुधारण्यासाठी ब्रिटिश शासनाला उपाय सुद्धा सुचवले होते. हीच ती लेखणीची किमया.

सौ. रेखा देशमुख
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →