Login

लेक लाडकी आमच्या घरची.. भाग अंतिम

सासरी गेलेल्या मुलीच्या आईची कथा..
लेक लाडकी आमच्या घरची.. भाग ४


मागील भागात आपण पाहिले की उषाताई शोभाताईंना भेटायला त्यांच्या घरी जातात.. आता बघू पुढे काय होते ते..


" नाही. पण मी सांगते. अवनीचा जन्म झाला आणि आम्ही ठरवले एकच मूल असू द्यायचे. शारिरीक किंवा आर्थिक अडचण नव्हती. तरिही आपले जे काही प्रेम, माया, ममता असेल ती या एकटीसाठीच असे ठरवले होते. ती सासरी जाणार हे माहित असूनही. तेव्हा काही वाटले नाही पण आता तिचं जेव्हा खरंच लग्न झाले आहे, तेव्हा मात्र जाणवते की आपण आपले अख्खं आयुष्य तिच्याभोवती गुंफले.. आणि आता ती लांब गेली.. खूप अवघड असते ओ हे.." उषाताई डोळे टिपत म्हणाल्या. शोभाताईंना कसेतरीच वाटले. त्या काही बोलणार तोच उषाताईंनी सुरुवात केली.
" दिवसभर आपल्या पाठी पाठी फिरणारी लेक जेव्हा दिवस दिवस दिसत नाही तेव्हा जीव खूप खालीवर होतो. सतत हे कर, ते कर सांगणाऱ्या लेकीचा आवडता पदार्थ केला तर तो घशाखालीही उतरत नाही हो. म्हणूनच आधीच्या काळात कदाचित जास्त मुले होऊ देत असावीत. म्हणजे एक मूल दूर गेले तरी दुसरे सोबत असायचे. अवनीशिवाय आयुष्य जगायची आम्ही सवय करतो आहोत. पण तरिही जीव अडकतो तिच्यात. तशी ती एखाद्या शनिवारी येते पण नाही आली तर जीवाची घालमेल होत राहते. म्हणून मी येत होते. तुम्हाला जर ते आवडत नसेल तर नाही येणार आता.." डोळे पुसत उषाताई निघाल्या..

" तुमचे मी एवढे ऐकून घेतले, आता माझेही ऐका.. सुधा माझी जीवाभावाची मैत्रीण.. मुलाचे लग्न झाले. आता आपण संसारातून निवृत्त होऊन आयुष्य जगू, असा तिने विचार केला. सून छान बोलत होती, बडदास्त राखत होती. गोड बोलून तिने सगळे आपल्या हातात घेतले आणि मग सासूसासर्यांना घरातून हाकलले. स्वतःच्या आईवडिलांना घरात आणून ठेवले आणि त्या दोघांना वृद्धाश्रमात. आम्ही मैत्रीणी तिच्यासाठी काही करायला गेलो तर माझ्या कर्माचे फळ मीच भोगणार असे म्हणत तिने नकार दिला.. आणि त्या वृद्धाश्रमात काहीच महिन्यात तिचा जीव गेला.. गेला की दिला तिलाच माहित.. पण ते बघून मी मनाशी ठरवले की तिच्यासोबत जे घडले ते आपल्यासोबत होऊ द्यायचे नाही. म्हणून तुम्ही घरी यायला सुरुवात केल्यापासून मी थोडी कठोर झाले.." शोभाताईंचे डोळे पाणावले होते..

" पण आई हाताची सगळी बोटे सारखी नसतात.." अवनी दरवाजा उघडून कधी आली हे या दोघींना समजलेच नव्हते..
" त्या मावशींची सून वाईट वागली म्हणून गैरसमज करून घेऊन तुम्ही आमच्याशी अशा वागलात, ते ही चुकीचेच ना? तुम्ही अगदी स्वतःहून जरी घर आमच्या नावावर करत असता तरी मी तुम्हाला नकोच सांगितले असते."

" हो ग.. तुझे चांगले वागणे समजत होते. पण कुठेतरी भिती वाटत होती की तिची सून पण आधी अशीच गोड गोड वागायची. नंतर केसाने गळा कापला तिचा.. ते सतत आठवायचे. मग तुझ्या जागी तिच दिसायची.. पण आता तशी चूक नाही होणार माझ्याकडून.." शोभाताई हात जोडत म्हणाल्या..

" तुम्ही हात नका जोडू. बर्‍याचदा आपण आधी आलेल्या अनुभवांच्या जोरावर नवीन नात्यांची सांगड घालतो . फक्त एक गोष्ट विसरतो की एकाचा नियम दुसऱ्याला लागू होत नाही.. पहिला चुकला की त्याचा राग नेहमीच दुसऱ्यावर निघतो. पहिला बरोबर असला की आंधळेपणाने दुसऱ्यावर विश्वास ठेवला जातो." उषाताई शोभाताईंचे हात हातात घेत म्हणाल्या..

" अगदी बरोबर..कधीकधी काय चूक काय बरोबर याचा सारासार विचार करणे ही सोडून दिले जाते मग.." शोभाताई म्हणाल्या.

" मग आता झालेगेले विसरून मी आणलेल्या रसमलाईने तोंड गोड करणार का?" अवनीने विचारले..

" आण बरं वाटीत." शोभाताई म्हणाल्या. अवनी आत गेली हे बघून शोभाताई उषाताईंना म्हणाल्या..
" तुमचेच घर समजा आणि कधीही येत जा.. यापुढे माझ्याकडून कोणताही गैरसमज होणार नाही याची खात्री बाळगा."
उषाताईंनी फक्त त्यांचा हात थोपटला..


कथा कशी वाटली ते नक्की सांगा.. अभिप्रायाच्या प्रतिक्षेत..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →