मागील भागात आपण पाहिले की शोभाताई घरी आलेल्या अवनीच्या आईशी नीट बोलत नाही.. बघू पुढे काय होते ते..
" आई, तू हे बरोबर नाही केलेस. त्या एवढं काय काय घेऊन आल्या होत्या. आणि तू नीट बोलली ही नाहीस त्यांच्याशी ." सौरभ आईवर चिडला होता.
" तू पण बदललास रे लग्नानंतर. वाटलं होतं आपलं मूल तरी आपल्याला समजून घेईल.. पण कसलं काय? तू तर बायकोचा बैल झालास रे.."
" आई, तू विषय कुठलचा कुठे नेते आहेस. मी फक्त म्हटले की तू अशी का बोललीस तर तू पराचा कावळा करते आहेस." सौरभ अजून काही बोलणार तोच पाणावलेल्या डोळ्यांनी अवनी घरात आली. आत येताच तिने कोणाकडे न बघता डब्बा उचलून स्वयंपाकघरात नेला.
" बघ, आणले ते फक्त स्वतःच्या लेकीसाठी.. मग मी कशाला यांच्याशी नीट बोलायचे." नाक उडवत शोभाताई बोलल्या.. चिडून सौरभ बेडरूममध्ये गेला. तो आत गेला हे बघून शोभाताईंनी मोबाईल घेतला, त्या स्वतःच्या खोलीत गेल्या आणि त्यांनी फोन लावला..
" हो.. आज बोलले ग मी.. "
" मग काय? आपण पाहिले ना त्या सुधाच्या सुनेने काय केले ते? स्वतःच्या घरातून तिला बाहेर काढले आणि स्वतःच्या आईबापाला घरात आणून ठेवले. "
" हो.. ग.. दोन रात्र डोळ्याला डोळा लागला नव्हता. सतत वृद्धाश्रमात असलेली सुधा आठवत होती.."
" हो ग.. माझी सून तशी नवीनच आहे.. पण या आधी चांगल्या असतात नंतर आपले रंग दाखवतात. यांच्याशी थोडे असेच वागायला पाहिजे.."
" चल. ठेवते नंतर.. आमचे हे आले वाटते. जमले तर भेटू उद्या नानानानी पार्कात." शोभाताई फोन ठेवून बाहेर आल्या. अशोकराव तोपर्यंत आलेच होते. सगळे जेवायला बसले.. अवनीने काहीच न बोलता आईने आणलेला डबा डायनिंग टेबलवर ठेवला.. तिचे डोळे अजून आईच्या शब्दाने भरून येत होते. तिने सगळ्यांना जेवायला वाढले.
" हे काय करंज्या? मी दोन तास बाहेर काय गेलो लगेच करंज्यांचा घाट?" अशोकराव विनोद करायचा प्रयत्न करत बोलले. पण कोणीच हसले नाही.
" अरे व्वा.. मसालेभातही. आज मज्जा येणार जेवायला.."
" हो.. जसे काही रोज जेवायला मिळतच नाही. हे तिच्या आईने आणून दिले आहे. तुम्हाला ते गोड लागणारच.. नेहमीच तुम्हाला माझ्या हातचे सोडून दुसर्यांच्या हातचे आवडते. ते म्हणतात ना, घर की मुर्गी दाल बराबर.. तसे झाले आहे माझे." शोभाताई फणकार्याने बोलल्या.
" मुर्गी तर आपण खात नाही.. ही करंजी खाऊ यात का? आणि ही गोड आहे म्हणजे अजून गोड लागायचा प्रश्नच नाही." अशोकराव हसत आणि शोभाताईंना गप्प राहण्याची खूण करत बोलले. अवनी काहीच न बोलता तुकडे तोडत होती. आईने प्रेमाने आणून दिलेल्या करंज्या खायच्या असूनही आईचा झालेला अपमान आठवून खाव्याश्या वाटत नव्हत्या. कसंबसं जेवण आटपून, पाठचा पसारा आवरून ती बेडरूममध्ये गेली. सौरभ तिची वाटच बघत होता.
" संध्याकाळचा प्लॅन फिक्स आहे ना?" अवनीचा उतरलेला चेहरा बघून त्याने विचारले. काहीच न बोलता अवनीने मान हलवली. या पलॅनमुळेच तिला आज माहेरी जाता आले नव्हते आणि त्यामुळे उषाताई धडपडत आल्या होत्या. व्हायचे ते होऊन गेले होते त्यासाठी परत प्लॅन कॅन्सल करायचा म्हणजे दोघांचे भांडण आणि नंतर अबोला नक्की. ते सहन करायची ताकद आज तरी तिच्याकडे नव्हती. पण काही झाले तरी उद्या ऑफिसमधून हाफ डे घेऊन घरी जायचे आणि आईशी निक्षून बोलायचे हे मात्र नक्की. असे तिने स्वतःशीच ठरवले.
उषाताई करतील का अवनीच्या सासरी येणे बंद? बघू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
