Login

लेक लाडकी आमच्या घरची

सासरी गेलेल्या मुलीच्या आईची कथा
लेक लाडकी आमच्या घरची..


" सौरभ, जरा प्लीज बघतोस का कोण आहे ते?" कणिक भिजवत असलेल्या अवनीने त्याला विनंती केली.

" बघायचे काय? तुझी आई आली असेल." थोड्या तुसडेपणानेच शोभाताई बोलल्या. त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत सौरभने दरवाजा उघडला. दरवाजात खरंच अवनीची आई उषाताई होत्या.

" अवनी आई आल्या आहेत.." सौरभने ओरडून सांगितले. आईला बघून अवनीला झालेला आनंद शोभाताईंकडे बघून मावळला.

" आई, तू? मी नको म्हटलं होते ना तुला?" अवनी पटकन बोलून गेली. उषाताईंचा चेहरा उतरला. ते बघून सौरभलाच कसेतरी वाटले. तो पटकन बोलला, "अग बसू तर दे त्यांना. एवढ्या लांबून आल्या आहेत तर?" उषाताई घाम पुसत बसणार तोच शोभाताई परत बोलल्या.
" त्यांना तर आता सवय झाली आहे यायची. त्यात काय एवढे?" सौरभ त्यावर काही बोलणार तोच उषाताई म्हणाल्या,
" अरे मी फक्त एवढेच द्यायला आले होते. त्यांनी हातातला डबा सौरभच्या हातात दिला.
" अवनीला माझ्या हातच्या ओल्या नारळाच्या करंज्या फार आवडतात. कालच करणार होते पण तिला गरम मिळाव्यात म्हणून आता केल्या आणि लगेच आणल्या."

" एवढ्या गरमागरम खायला घालायच्या होत्या तर लेकीलाच बोलवायचे तिकडे. इथे यायचे कष्ट कशाला घ्यायचे?" शोभाताई परत बोलल्याच. वाक्य कानी पडूनसुद्धा काहीच ऐकू न आल्यासारखे दाखवत उषाताई पुढे म्हणाल्या, "सौरभ तुझ्यासाठी मसालेभात आणला आहे."

" हो.. आम्ही काही स्वयंपाक करतच नाही ना जणू.." शोभाताई बोलल्या.

" तसे नाही ओ ताई.." उषाताईंनी बोलायचा प्रयत्न केला.

" आई, निघायचे?" तोपर्यंत अवनी हात धुवून आली होती.

" अग पण त्यांना पाणी तरी दे.." सौरभ म्हणाला.

" माझं पाणी वेगळं उकळलेले असते माझ्याकडे.. नको मला." बोलत उषाताई उठल्या.

" तुम्ही फक्त हे देण्यासाठीच आलात इकडे?" सौरभने आश्चर्याने विचारले.

" हो.. अवनीला एखादं भावंड असतं तर त्याच्यासोबत पाठवलं असतं. आता कोणी नाही म्हटल्यावर मलाच यायला नको का?" उषाताई हसत म्हणाल्या. "दादा दिसत नाहीत घरात.."

" बाबा मित्राकडे गेले आहेत. त्यांची रविवार सकाळ जोरात असते तिथे." सौरभ म्हणाला.

" त्यांना विचारले म्हणून सांग. अच्छा ताई. निघते मी.." उषाताई शोभाताईंना म्हणाल्या. शोभाताईंनी फक्त मान हलवली. अवनीने सौरभकडे एक जळजळीत कटाक्ष टाकला. ती उषाताईंना सोडायला खाली गेली..

" आई, का आलीस आज? मी तुला सांगितले ना नको येऊस म्हणून. " अवनीच्या डोळ्यात पाणी होते.

" तू येणार नाही म्हणालीस. मग काय करू? त्या करंज्या तुला न देता आमच्या घशाखाली उतरल्या नसत्या."

" पण त्या बोलल्या तुला. मला नाही आवडत ते.."

" असू दे. बोलण्याने अंगाला भोकं पडतात का? मला तुला भेटायचे होते. मी आले. तुझे बाबा तुझ्यासारखेच मानापमान धरून ठेवणारे. ते नाही आले.. चल. निघते मी पण. ते ही थांबले असतील माझ्यासाठी. करंज्या कशा झाल्यात ते सांगायला विसरू नकोस.." उषाताई रिक्षात बसत म्हणाल्या. डोळे पुसत अवनीने त्यांना बाय केले.


शोभाताईंना उषाताईंचे येणे आवडत नाही का? पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →