"लेका : परक धन!" भाग - ८
रात्रभर चाललेला तमाशा, वंदनाचे रडणे आणि दिनकरच्या पट्ट्याचे आवाज आता शांत झाले होते. सकाळ झाली, पण वंदना आणि मुलींच्या आयुष्यातला अंधार तसाच होता.
वंदना रात्रभर झोपली नव्हती. अंग दुखत होतं, पण मनाच्या वेदना त्यापेक्षा खूप जास्त होत्या. दिनकर दुकानात गेला होता, चंद्रकला बाहेर गेली होती. हिच संधी साधून वंदनाने सुहासला फोन लावला.
"हॅलो ताई, बोल. सकाळी सकाळी कॉल केला." सुहास बोलतो.
"सुहास, मी काय बोलते ते नीट ऐक. मला फार वेळ नाही." असे बोलून वंदना सुहासला त्या मुलाबद्दल सांगते.
"ताई, किती भयानक आहे हे! दाजी एवढ्या खालच्या थराला जातील असं कधीच वाटलं नव्हतं मला. पैशासाठी ते जवळजवळ स्वतःच्या मुलीला विकतच आहे."
"सुहास तुला त्या माणसाची सर्व माहिती काढायची आहे. त्याच्या घरादाराची माहिती काढ."
"ताई, कशाला या सर्व भानगडीत पडायचे. सरळ नकार देऊन टाक."
"तुला असं वाटतंय का मी नकार दिला नसेल. तू फक्त माहिती काढ."
"ताई, मी काढतो माहिती. त्या गावातील काही माणसं माझ्या ओळखीचे आहे." असे बोलून सुहास फोन ठेवून त्या माणसाची माहिती काढायला जातो.
इकडे मोरेंच्या घरी मीना हातात झाडू घेऊन अंगण झाडत होती. घरात आपल्या लग्नाची बोलणी चालू आहे हे तिला कळत होते. पण तिला न दुःख झाले, ना राग होता, ना आनंद होता. मीना घरात मिळणाऱ्या वागणुकीमुळे भावनाशून्य झाली होती. तिला माहीत होतं की तिला या घरात फक्त एक ओझं समजलं जातं.
दुपारची वेळ झाली होती. घरात एक भयाण शांतता होती. तेवढ्यात वंदनाला सुहासचा फोन येतो. पण चंद्रकला घरात बसलेली होती. तिच्या समोर वंदनाला बोलता येत नव्हतं.
"मी शेतात जाऊन आले" असे सांगून वंदना बाहेर पडते.
आणि सुहासला बाहेर जाऊन परत फोन करते.
आणि सुहासला बाहेर जाऊन परत फोन करते.
"हॅलो ताई, मी काढली माहिती त्याची." सुहास बोलतो.
"हम्म... काय माहिती भेटली?" वंदना बोलते.
"ताई, तू सांगितले ते एकदम खरे आहे. आणि फक्त तेवढंच नाही, तर त्याला एक आठ वर्षाचा मुलगा पण आहे."
हे ऐकून मात्र वंदनाच्या पायाखालची जमीन सरकते. हातातला फोन खाली पडता पडता वाचला. आपली पोरगी एका आठ वर्षाच्या पोराची आई होणार, याची तिला कल्पनाच करवत नव्हती.
"अरे देवा, कर्मा माझ्या. आरे सुहास त्या आठ वर्षाचा पोरगा असलेल्या माणसाबरोबर माझी पोरगी लग्न करीन का?
"ताई, आपण हे लग्न थांबवू. तू नको काळजी करू."
"आपण नाय करू शकणार. तुझे दाजी कोणाचाच ऐकणार नाही." वंदना रडत बोलते.
"ताई, तू काही काळजी करू नको. मी आहे."
"हा... सुहास, लग्न बिग्न काही ठरलं तर तू पोलिसात जा. माझी काळजी नको करू."
"ताई, तू काळजी नको करू. मी मीनाच्या बाबतीत काही चुकीचे होऊ देणार नाही."
सुहासच्या बोलण्याने वंदनाला आधार मिळ्यासारखं वाटतं.
संध्याकाळची वेळ झाली होती. दिनकर घरी आला. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं. "श्रीमंत मासा आता आपल्या गळाला लागणार" याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर साफ दिसत होता. पण वंदना मात्र शांत राहत नाही.
"तुम्ही मीनासाठी जो माणूस बघितला आहे त्याला आठ वर्षाचा मुलगाय. माहिती आहे का तुम्हाला?" वंदना वरच्या आवाजात दिनकरला बोलते.
"सगळं माहितीये मला. तू मला नको सांगू. आणि माझ्यासोबत परत जर वरच्या आवाजात बोलली तर जीभ हसडून हातात देईल." दिनकर अरेरावीत बोलतो.
"अहो तुमची मुलगीच आहेना. परकी झाली का तुम्हाला." वंदना बोलते.
"मीने... समोर ये." दिनकर मीनाला बोलावतो. मीना दिनकरच्या समोर येऊन उभी राहते.
"एक मुलगा आहे. वय पस्तीस वर्षे. श्रीमंत आहे. त्याला थोडा दारूचा नाद आहे. पहिल्या बायकोपासून त्याला आठ वर्षाचा मुलगा आहे. पहिली बायको आता या जगात नाहीये. तू लग्न करशील त्याच्याशी?" दिनकर मीनाला विचारतो कारण त्याला खात्री होती की मीना त्याच्यासमोर नाही बोलणार नाही.
"तुम्ही जे बोलाल तेच मी करेल बाबा." मीना असे बोलल्यावर दिनकर, चंद्रकला यांच्या चेहऱ्यावर हसू येते.
वंदना मीनाला फिरवून तिला ओरडून बोलते, "काय बोलते तुला कळतंय का?"
"आई, मी बाबांच्या शब्दाच्या बाहेर नाही जाणार." मीना बोलते.
मीना असे बोलल्यावर वंदना तिच्या जोरात कानाखाली मारून बोलते, "कशाला स्वतःच्या आयुष्याशी खेळतेय?"
मीना काहीच बोलत नाही.
"आग अशी पुतळ्यासारखी उभी राहू नको. बोल काहीतरी." असे बोलून वंदना परत मीनाच्या कानाखाली मारते.
आता मात्र मीना उद्रेक होतो. तिच्या मनातील सर्व ती बाहेर काढते.
"नाही थांबवू शकत माझं लग्न कोणी. वरतून तो देव जरी आला तरी माझं लग्न थांबवू शकत नाही. त्या देवाचं राहूदे, तू थांबवशील का माझे लग्न? तुझ्यात आहेका तुझ्या नवऱ्याच्या विरोधात जाण्याची हिंमत. तू जे आत्ता बोलतेयना त्याला खूप उशीर झाला आहे. हे आम्ही लहान असतानाच करायला पाहिजे होतं." मीना भडाभडा तिच्या मनातील सर्व बाहेर काढते.
मीना बोलल्यानंतर घरात एकच शांतता पसरते. वंदना सुन्न होऊन मीनाकडे बघत होती. दिनकर देखील अवाक होऊन मीनाला बघत होता. चंद्रकला आहे तशीच बसून राहते.
मीना आतल्या खोलीत निघून जाते. वंदना आहे त्याच जाग्यावर उभी होती. थोडावेळ गेल्यावर सर्वजण जेवण करायला बसतात.
थोड्यावेळाने मीनाला वाटते, ती उगाच आईला बोलली. मीनाला अपराधी असल्या सारखे वाटत होते. वंदना गौरीला घेऊन आतल्या खोलीत बसली होती. घरातील सर्व कामं आटोपल्यावर मीना आतल्या खोलीत जाऊन आईच्या गळ्यात पडून रडू लागते.
"आई... माझे चुकले. मला माफ कर. मी ओघाओघात तुला भरपूर काही बोलले." मीना रडत रडत आईला बोलते.
"अगं ऐ पोरी, पिल्लांचे दात कधी मांजरीला लागतात का! मला काहीच वाईट वाटले नाही. उलट आज मला एक वेगळीच मीना दिसली." वंदना बोलते.
"आई, खरंच तुला माझा राग नाही आलाना."
"नाही आला. आणि तू बोललीस त्यात काही चुकीचे पण नव्हते. मी तुमच्या लहानपणीच तुमच्या बाबाच्या आणि आजीच्या काही गोष्टींना विरोध केला असता तर आज या थरापर्यंत गोष्टी गेल्या नसत्या. पण मला वाटायचं एक दिवस मुलगा होईल आणि तुझ्या बाबांचा तिरस्कारपण कमी होईल. पण मुलगाही झाला नाही आणि तुझ्या बाबांचा तिरस्कार तो तर दिवसेंदिवस वाढतच गेला."
"आई, खरं सांगू. लहानपणापासून इतक काही बघितलं का आता काहीच वाटत नाही. तुला सांगते बाबा कधी चांगले वागलेना, हा आता ते कधीच चांगले वागत नाही पण चुकून चांगले वागले तर आस वाटतं आमचंच काहीतरी चुकले आहे." मीना हसून बोलते. पण त्या हसण्या मागे किती दुःख साचलेले होते हे फक्त तिलाच माहीत होते.
"मीना तुला भीती नाही वाटत का?" वंदन मीनाला विचारते.
"आई, भिती, आनंद, दुःख या भावना आता मला संपल्यासारख्या वाटतात." मीना बोलते.
वंदनाला कळत होते, या कमी शब्दात मीना खूप काही बोलून गेली आहे. वंदना मीनाला जवळ घेऊन तिला मिठी मारते.
"मीना, या घराणे तुझं बालपण हिरावून घेतले आहे. त्यामुळे मला आसं वाटतंय तुझं लग्न तरी एखाद्या चांगल्या घरात व्हावे. म्हणजे तुझे इथून पुढचे तुझे आयुष्य तरी चांगले जाईल." वंदना मीनाला समजावण्याचा प्रयत्न करते.
"आई, तुला बाबांनी काल माझ्या लग्नावरूनच मारलेना. आता माझे जे होईल ते होईल पण मला आता माझ्यामुळे तुला आणि माझ्या लहान बहिणींना त्रास नाही होऊन द्यायचा." मीना बोलते.
"माझी पोरगी मोठी झाली. पण देवा तू तिला लई लहान वयातच मोठेपण दिले." वंदना मीनाच्या डोक्यावरून हात फिरवून बोलते.
मीना आणि वंदना बोलत बसतात. नंतर तशाच झोपी जातात.
सकाळ झाली होती. घरात नेहमी सारखीच शांतता होती. मीना आणि कल्पना घरातील कामं आटपत होती. वंदना गौरीला घेऊन बसली होती. वंदनाला अजूनही फारसे कामं करता येत नव्हती.
दिनकर खुर्चीवर बसून चहा पित होता. आणि मीनाच्या लग्नात जे पैसे मिळणार त्याचे स्वप्न बघत होता. तेवढ्यात बाहेरून पोलिसांच्या गाडीचा आवाज येतो. ती गाडी दिनकरच्या घरासमोर येऊन उभी राहते. आणि पोलिस दिनकरच्या दरवाजात येऊन उभे राहतात...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा