"लेक : परकं धन!" भाग - १९
कडकडीत उन्हाची वेळ होती. कल्पना कॉलेजवरून घरी आली होती. ती घरच्या जवळ आल्यावर तिला घरच्या अंगणात सतिशची गाडी दिसते. तिच्या लक्षात येते की हा सतीश ताईला घ्यायलाच आला असणार आणि तिच्या तळपायाची आग मस्तकात जाते.
कल्पना रागात घरात जायला लागते. तिने मनाशीच ठरवले की काहीही झाले तरी ती ताईला पुन्हा त्या नरकात जाऊन देणार नाही. ताई पुन्हा तिकडे गेली तर परत कधी येणार हे माहित नाही. परत अजून किती त्रास होणार माहीत नाही.
ताईची आणि आशुतोष काका, नलिनी काकू यांची भेट होणार नाही. मला काहीही करून त्यांची भेट घातलीच पाहिजे. असा विचार कल्पना करत होती. तेवढ्यात तिला आठवते आशुतोष काका बोलले होते की, "सतिशच्या विरोधात जे काही करायचे असेल ते विचारपूर्वक करावे लागेल. तो एक सराईत गुन्हेगार आहे."
कल्पना जागीच थबकते. ती स्वतःच्या रागाला शांत करते. एक दीर्घ श्वास घेते. आणि ठरवते की ती सतीशला काहीच बोलणार नाही.
कल्पना घरात जाते. सतीश सोफ्यावर एखाद्या राजासारखा बसला होता. त्याच्या तोंडांत पान होते, गळ्यातल्या जाड सोन्याच्या साखळ्या तो बाहेर काढून मिरवत होता. दिनकर त्याच्या समोर हाताची घडी घालून लाचारपणे बसला होता.
कल्पनाला बघताच सतीशने पानाची पीक बाहेर थुंकली आणि मग्रूर हास्य करत तो म्हणाला, "काय मेव्हणीबाई? कसा चाललाय अभ्यास?"
कल्पना काहीच बोलत नाही. फक्त चेहऱ्यावर एक खोटे हसू आणत मान हलवते.
सतीश दिनकरकडे बघून कुत्सितपणे म्हणाला, "सासरेबुवा... पोरींना एवढं शिकवून काय करायचं? अक्षर ओळख झाली, बास झालं. मला तर नाही पटत. उद्या नवऱ्याच्या डोक्यावर बसायची. आमच्या घरात असती तर आम्ही नसतं शिकवलं."
"हो, बरोबर आहे तुमचे जावईबापू." दिनकर लाळघोटेपणा करत सतिशच्या बोलण्याला दुजारा देतो.
"मग कशाला शिकवताय मेव्हणीबाईला एवढे? घ्या काढून कॉलेजमधून. नाहीतर तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटेल." सतीश बोलतो.
"हे शेवटचे वर्ष आहे. आता पुढे नाही शिकवायचं!" दिनकर एक नजर कल्पनाकडे टाकतो. त्याला भीती होती ती सतीशला काही बोलते का!
"मी तर म्हणतो, राहूद्या ते कॉलेज बिलेज. लग्न करून टाका हिचे. माझ्या नातेवाईकात एक मुलगापण आहे. तुम्ही म्हणाला तर मी शब्द टाकेल." सतीश बोलतो.
"तिच्या लग्नाच्या अजून काही विचार नाहीये. तसं काही असलं तर फोन करू की तुम्हाला."
दिनकरला हो बोलण्याची इच्छा होती पण त्याला माहीत होते कल्पना त्याचे काहीच ऐकणार नाही. म्हणून इच्छा नसतानाही तो नाही बोलतो. दिनकर पुन्हा एकदा कल्पनाकडे बघतो. दिनकरला वाटते कल्पना सतीशला काही बोलण्याच्या आत विषय बदलायला हवा.
"बाकी काय चालले जावईबापू?" दिनकर विषय बदलतो.
"बाकी काही नाही. पण सासरेबुवा... एका गोष्टीत मानले पाहिजे तुम्हाला! सासूबाईंना दिवस गेले. या वयातच चांगलाच दम आहे की तुमच्यात! मानलं राव तुम्हाला!"
सतीश हे वाक्य बोलताच, तो आणि दिनकर दोघेही अत्यंत बेशरमपणे मोठ्याने हसायला लागतात. त्यांच्या हसण्याला आणि बोलण्याला कोणतीच मर्यादा नव्हती.
कल्पनाला मात्र हे अजिबात सहन झाले नाही. "यांचे नाते काय हे एकमेकांशी बोलत काय आहे! पण यांच्याकडून वेगळी काय अपेक्षा करणार!" असा विचार कल्पना करत होती.
कल्पनाला दोघांचीही किळस आली. दिनकरची लाचारी आणि सतिशची नीच पातळी बघून कल्पना आतल्या खोलीत गेली.
खोलीत मीना एका कोपऱ्यात तिची सामानाची पिशवी भरत होती. मीनाचा चेहरा एखाद्या जिवंत प्रेतासारखा पांढराफटक पडला होता.
कल्पना मीनाजवळ गेली आणि तिने मीनाचे खांदे धरून तिला विचारले, "ताई... तू खरंच त्या राक्षसासोबत जाणार आहे का? तू खरंच त्या नरकात जाणार आहे का?"
मीनाने अत्यंत हतबलतेने मान डोलावली. "हो... जावंच लागेल मला कल्पना. दुसरा कोणताही पर्याय नाहीये."
"नाही ताई! तू नाही जायचं! मी आशुतोष देशपांडे यांना सगळं सत्य सांगितलं आहे. तुझ्या नवऱ्याने पहिल्या बायकोला कसं मारलं, हे सगळं त्यांना माहितीये. ते तुझी मदत करायला पूर्णपणे तयार आहे. त्यांच्या ओळखी खूप वरपर्यंत आहेत. ताई, ते तुला सुरक्षित ठेवतील. तुझ्या केसालाही धक्का लागून देणार नाही." कल्पना मीनाचे हात घट्ट पकडून तिला समजावण्याचा प्रयत्न करीत होती.
मीनाने एक सुन्न कटाक्ष कल्पनाकडे टाकला आणि बोलली, " मला नाही जमणार कल्पना." मीना कोरड्या आवाजात बोलत होती.
"ताई, तू काहीतरी कारण सांग ना! सांग की तुझी तब्येत खूप खराब आहे. किंवा सांग की गरोदरपणात प्रवासाचा त्रास होऊ. ताई तू फक्त आजच्या दिवशी नाही बोल." कल्पना पोटतिडकीने बोलत होती.
मीना कल्पनाच्या डोक्यावरून हात फिरवत अत्यंत शांतपणे बोलते, "तू समजून घे कल्पना... मी त्याला नाही बोलू शकत नाही. जर मी त्याला नाही बोलले तर तो मला जबरदस्ती फरफटत घेऊन जाईल आणि त्यानंतर तिथे माझे जे हाल होतील त्याचा तुला विचार सुद्धा करवणार नाही."
"ताई, मी तुझ्या सोबत बोलू लागेल. आपण काहीतरी करू ना." कल्पनाने बोलते.
"कल्पना, तू बोलून काही होणार आहे का! बाबा, आजी त्याच्या बाजूने बोलतील. आईची बोलण्याची हिंमत होणार नाही. आणि तुला जर वाटत असेल तर तू बाबांसारखे त्याला गप्प करशील तर तुझा गोड गैरसमज आहे. तू ज्या गोष्टी बाबांच्या विरोधात केल्या त्याने त्याला काहीच फरक पडणार नाही." मीनाच्या डोळ्यांत हलकेसे पाणी येते.
मीनाची ती हतबलता बघून कल्पनाला स्वतःचाच राग येऊ लागला. ती कितीही शिकलेली, कितीही बंडखोर असली, तरी सतीश, आणि दिनकर सारख्या माणसांच्या बेड्या तोडणे तिला एका रात्रीत शक्य नव्हते.
"इकडे देशपांडेंच्या घरी एक वेगळीच अस्वस्थता होती. राघव हॉलमध्ये येरझाऱ्या मारत होता. कल्पनाने सांगितलेले मीनाचे वास्तव त्याच्या मनातून जात नव्हते. त्याचे आई- वडील, आशुतोष आणि नलिनी दोघेही सोफ्यावर गंभीर चेहरे करून बसले होते.
"आई-बाबा, तुम्ही प्लीज मीनाताईसाठी काहीतरी करा ना! तो नीच माणूस तिला जिवंत सोडणार नाही." राघव विनंती करतो.
नलिमीताई राघवच्या पाठीवरून हात फिरवत बोलतात, "बेटा, आम्ही अशा अनेक स्त्रीयांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे. पण आमच्याही काही मर्यादा असतात. जेव्हा पीडित स्त्री किंवा तिच्या घरातील स्वतःहून पुढे येईल तेव्हाच आम्ही तिच्यासाठी काही करू शकतो. आम्ही तिच्याकडे गेलो आणि तिने मदत नाकारली तर तिथेच आमचे हात बंद होतात."
"आई, मला आजच्या जगात अशी माणसं आहेत याचेच आश्चर्य वाटते. एक बाप स्वतःच्याच मुलीला कसे काय त्या नरकात पाठवू शकतो." राघव चीड येऊन बोलतो.
आशुतोषराव यांनी एक दीर्घ श्वास घेतला आणि ते अत्यंत समजूतदारपणे म्हटले, "राघव, जगात सर्व प्रकारची माणसं असतात. माणसाच्या प्रवृत्तीला काहीच मर्यादा नसते. म्हणूनच तर म्हटले जाते, 'व्यक्ती तितक्या प्रवृत्ती.' दिनकरसारखे लोक समाजाच्या खोट्या प्रतिष्ठेसाठी स्वतःच्याच लेकीचा बळी देतात. आणि सतीशसारखे लोकं स्त्रीयांना स्वतःची जहागिरी समजतात. पण तू काळजी नको करू. आपण योग्य वेळेची वाट बघू आणि मीनाला नक्की या दुष्टचक्रातून बाहेर काढू."
इकडे मोरेंच्या घरी मीनाच्या निरोपाची वेळ जवळ आली होती. सतीशने मीनाला आवाज दिला. मीना सर्वांना भेटत होती. कल्पनाच्या डोक्यात विचारांचे चक्र वेगाने फिरत होते. तिला काहीही करू मीनाला थांबवायचे होते.
"ताईला चक्कर आल्याचं नाटक करायला सांगू का?"
"का पोट दुखतंय असे सांगायला लावू?"
"का उलट्या येताय असे सांगायला लावू?"
"का पोट दुखतंय असे सांगायला लावू?"
"का उलट्या येताय असे सांगायला लावू?"
कल्पनाला काहीच सुचत नव्हते. सतिशची ती लालबुंद नजर आणि बाबांचा तो निर्दयी चेहरा बघून तिचे तिचे सगळे विचार थिजून गेले होते.
मीनाने जड अंतःकरणाने सर्व मोठ्यांच्या नमस्कार घेतला. वंदना पदराने डोळे पुसत एका बाजूला उभी होती. दिनकर सतिशच्या पुढे लाचार होऊन उभा होता.
मीनाचे एकएक पाऊल गाडीच्या दिशेने पडू लागले. कल्पना मुकाट्याने मीनाची बॅग उचलून तिच्या बरोबर चालू लागली. ते गाडीपर्यंतचे काही फुटांचे अंतर मीनाला मैलासारखे वाटत होते.
कल्पना मीनाच्या पाठीमागे बॅग घेऊन चालताना स्वतःला अत्यंत लाचार आणि लहान समजत होती. दोघीही ओट्यावर आल्या आणि अचानक कल्पनाच्या चेहऱ्यावर हसू आले...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा