Login

"लेक : परकं धन!" भाग - १७

स्त्री जन्माची व्यथा मांडणारी कथा.
"लेक : परकं धन!" भाग - १७

मीनाला दिवस गेले होते. आई होणे कोणत्याही स्त्रीसाठी जगातला मोठा आनंद असतो. पण तो आनंद मीनाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता. आई होणे ही आनंदाची बाब जरी असली तरी ती तेवढीच मोठी जबाबदारी होती. आणि मीनामध्ये ती जबाबदारी सांभाळण्याची समज नव्हती.

कल्पना कॉलेज वरून घरी आली होती. मीनासाठी नोकरी शोधण्याचा आनंद तिच्या चेहऱ्यावर होता. पण तो आनंद घरात येताच नाहीसा झाला. घरातील तणावपूर्ण वातावरण बघून तिला वाटले आजी आणि बाबाने पुन्हा काहीतरी केले.

कल्पना फणफण करत ओट्यावर गेली, जिथे चंद्रकला आणि दिनकर बसलेले होते.

"काय झालंय घरात? आज पुन्हा तुम्ही दोघं आईला आणि ताईला काही बोलतात का?" कल्पनाने दिनकर आणि चंद्रकलाला जाब विचारला.

कल्पनाचा आवाज वाढलेला होता. पण दिनकर आणि चंद्रकलाने तिच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले. दिनकरने तर ती तिथे नाहीच, अशा आविर्भावात दुसरीकडे तोंड फिरवले.
चंद्रकलाने एक तिरपा कटाक्ष टाकला आणि परत दुसरीकडे बघितले.

कल्पनाचा संताप अधिकच वाढला. ती पुन्हा काहीतरी बोलणार, तेवढ्यात वंदना बाहेर आली आणि तिने कल्पनाचा हात धरून तिला आतल्या खोलीत नेले.

"आई, काय झालंय? यांनी परत तुझ्यावर हात उचलला का? तू अजिबात यांना घाबरू नकोस." कल्पना चिडून बोलत होती.

"कल्पना शांत बस! घरात काहीही झालेलं नाहीये. कुणी कुणाला मारलेले नाहीये किंवा बोललेलं नाहीये." वंदना सावकाश बोलते.

"मग तुम्ही दोघी अशा तोंड पाडून का बसलाय?" कल्पना काळजीने विचारते.

वंदनाने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलते, "कल्पना... मीनाला दिवस गेले आहे. ती आई होणार आहे."

हे ऐकताच कल्पनाच्या पायाखालची जमीन सरकली. ती जिथे आहे तिथेच थिजून उभी राहिली. तिचा तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. "काय...!" कल्पनाच्या मुखातून एवढाच शब्द निघाला.

ती मीनाजवळ गेली. मीना मान खाली घालून बसली होती. तिच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. कल्पनाने मीनाच्या खांद्यावर हात ठेवला आणि तिला विचारले, "ताई... हे खरंय का? तू या बाळाला खरंच जन्म देणार आहे का?"

मीना अत्यंत केविलवाण्या नजरेने कल्पनाकडे बघून बोलते, "माझे मत कोण विचारणार आहे कल्पना? या घरात आणि माझ्या सासरी कुणी कधी विचारलं आहे का? माझं काहीच माझ्या अधिकारात नाहीये. माझा विचार, निर्णय, आवड-निवड सर्वकाही दुसरेच ठरवतात."

कल्पनाला मीनाची लाचारी सहन होत नव्हती. तिने मीनाची दोन्ही हात आपल्या हातात घेतले आणि मीनाला आधार देत बोलते, "ताई, तू कुणालाच विचारू नकोस! तू स्वतःचा निर्णय स्वतः घे. हे बाळ तुला हवंय की नकोय, हा सर्वस्वी तुझा अधिकार आहे. तू नको असेल तर नाही सांग सर्वांना. मी तुझ्या सोबत आहे."

"मला कोणताही निर्णय नाही घ्यायचा कल्पना. जे नशिबात लिहिलंय, ते मुकाट्याने भोगण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये." मीना हार मानल्यासारखे बोलत होती.

"ताई, नशीब वैगरे काही नसतं. आपण आपलं आयुष्य स्वतः घडवतो. तू फक्त नाही म्हण. बाकी सर्व मी बघते." कल्पना मीनाला समजावण्याचा प्रयत्न करते.

"कल्पना, जर या बाळाला आपण नाही म्हटलो तर ते बाबांच्या विरोधात नसेल. माझ्या घरच्यांच्या, माझ्या नवऱ्याच्या विरोधात असेल." मीना बोलते.

"ताई, मी राहील त्यांच्यापण विरोधात." कल्पना आत्मविश्वासाने बोलते.

"कल्पना, तुला एकटीला नाही जमणार. आणि तू माझ्या नवऱ्याला बाबांसारखे नको समजू. बाबा त्याच्यापेक्षा शंभर पटीने चांगले आहे. बाबा घरातील स्त्रीला मोलकरीण, ओझं, भार समजतात. पण माझा नवरा स्त्रीला फक्त एक खेळणं समजतो. मग ती स्त्री घरातील असुदे नाहीतर बाहेरची." मीनाच्या बोलण्यात वेदना होत्या.

"ताई, मी एकटी नाहीये. माझा एक मित्र आहे कॉलेजचा. त्याचे वडील आशुतोष देशपांडे. त्यांचे खूप मोठे नाव आहे. त्यांचा स्वतःचा महिलांसाठीचा एनजीओ आहे. त्या एनजीओ मार्फत ते महिलांच्या हक्कांसाठी लढतात, त्यांना न्याय मिळून देतात."

"मी तुझ्याबद्दल त्यांच्याशी बोलले आहे. ते तुला पूर्ण मदत करायला तयार आहे. तुला नोकरी पण देतील. ते तुझ्या राहण्याची पण सोय करतील. तू फक्त हो म्हण." कल्पना आशेने बोलत होती.

बाजूलाच बसलेली वंदना हे सर्व ऐकत होती. तिलाही वाटले की जर खरंच अशी मदत मिळत असेल, तर मीनाची कायमची त्या नरकातून सुटका होईल.

"मीना, कल्पना जे बोलतेय तसे झाले तर चांगलेच होईल. अशा मोठ्या लोकांचा पाठिंबा मिळवून सगळं नीट होणार असेल तर काय अडचण आहे? तू एकदा विचार कर." वंदना देखील आशेने बोलते.

"आई, कल्पना तुम्हांला आठवते का? माझ्या लग्नाच्या वेळेस बाबांना पोलीस घेऊन गेले होते. माझ्या नवऱ्यानेच सोडवले होते त्यांना. त्याने सुहास मामाचे काय हाल केले होते, आठवते ना?" मीना बोलते.

"ताई, तेव्हा मामा एकटे होते. आता पूर्ण एनजीओ तुझ्या पाठीमागे असेल. त्यांच्यापण खूप मोठ्या ओळखी आहे." कल्पना मीनाला विश्वासाने सांगत होती.

"ठीक आहे, मी विचार करते. आई मला शिरा खायचा आहे. तू जरा रवा घेऊन येते का दुकानातून? आणि तूच जा. म्हणजे चांगला रवा आणशील." मीनाच्या बोलण्याने वंदना आणि कल्पनाच्या चेहऱ्यावर हसू येते. आणि वंदना रवा आण्यासाठी जाते.

"ताई, तू खरंच खूप चांगला निर्णय घेतला आहेस." कल्पना आनंदाने बोलते.

"कल्पना, मला तुला सत्य सांगायचे आहे. जे मी लग्नापासून लपवले होते. ते कदाचित आईला सहन झाले नसते म्हणून मी तिला मुद्दामच बाहेर पाठवले. पण आता तुला सांगण्याची वेळ आली आहे." मीना गंभीर होऊन बोलते.

"कोणते सत्य ताई?" कल्पनाचे डोळे विस्फारले.

"कल्पना, सतिशच्या पहिल्या बायकोचा नैसर्गिक मृत्यू नव्हता झाला. तिला सतीशने मारले होते."

मीनाकडून हे ऐकताच कल्पनाच्या अंगावर काटा उभा राहतो. तिला घाम फुटला. काय बोलावे आणि बोलू नये हेच तिला कळत नव्हते. तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.

"काय...? ताई, काय सांगतेस तू? सतीशने मारले तिला?" कल्पना घाबरून विचारते.

मीना सतिशच्या पहिल्या बायकोचे सत्य सांगू लागते.

"कल्पना, तिच्या माहेरची परिस्थिती गरीब होती. वडील शेतकरी होते. पण त्यांचा मुलीवर खूप जीव होता. तिच्या बाबांनी ती एक ओझे म्हणून नाही तर मुलगी म्हणून आनंदाने तिचे लग्न लावून दिले होते. त्यांची चूक एवढीच झाली की त्यांनी सतीशची नीट माहिती काढली नव्हती."

"लग्न झाल्यानंतर सतिशच्या घरी तिचा खूप छळ होऊ लागला. मोलकरणी सारखे राबणे, रोजची मारहाण, आणि सतीश तर राक्षसच आहे. तिने हे सर्व माहेरी सांगितले."

"तिचे वडील तिच्या बाजूने उभे राहिले. तिचा भाऊ त्यावेळेस लहान होता. ती सासरच्या छळाला कंटाळून माहेरी गेली होती. सतीश तिच्या माहेरी पोहचला आणि तिच्या वडलांना, भावाला बेदम मारहाण केली."

"सतीश पुन्हा त्या बिचारीला त्याच्या घरी घेऊन आला. तिचे वडील तेवढ्यावर थांबले नाही. त्यांनी त्यांचे प्रयत्न चालू ठेवले. पण सतीशकडून वडिलांना होणाऱ्या त्रासाला ती कंटाळी. आणि सतिशच्या पुढे शरण गेली."

"असेच काही वर्षे गेली. तिला मुलगा झाला. तिचा भाऊ मोठा झाला. तो एक प्रोफेसर झाला होता. वर्षे गेली पण तिचा त्रास काही कमी नाही झाला. तिचा भाऊ एका एनजीओकडे मदतीसाठी गेला. हे सतीशला कळले. एनजीओ चौकशी करेपर्यंत सतीशने तिला..."

दोघींच्याही डोळ्यात अश्रू येतात. खोलीत काही क्षण शांतता पसरते.

"ताई, तू तीन वर्षापासून एवढ्या भयानक माणसाबरोबर कशी राहते!" कल्पनाच्या डोळ्यांत अश्रू आले.

"कल्पना, आज तो एनजीओ तिच्या बाजूने कोर्टात केस लढत आहे. उद्या कदाचित सतीशला शिक्षा पण होईल.
पण ती तर आता या जगात नाहीये..."
"एका वडीलांनी त्यांची जीव की प्राण असलेली मुलगी गमावली..."
" एका भावाने त्याची बहीण गमावली..."
"एका मुलाने त्याची आई गमावली... "

"उद्या तो मुलगा मोठा झाल्यावर जेव्हा त्याला कळेल त्याचा आईला मारणारा त्याचाच बाप आहे. काय वाटेल त्याला? "

मीनाने सर्वकाही कल्पनाला सांगितले होते. हे सर्व ऐकून कल्पनाला काहीच सुचत नव्हते. ती फक्त सुन्न होऊन ऐकत होती...

क्रमश:
0

🎭 Series Post

View all