"लेक : परकं धन!" भाग - १६
कल्पनाला मीनासाठी काहीतरी करायचे होते. मीनाला एखादी नोकरी मिळावी म्हणून कल्पना राघवला बोलते की तिला त्याच्या बाबांना भेटायचे आहे. पण यासोबत तिच्या मनात ही शंकापण होती की मीना नोकरी करेल की नाही?
राघव कल्पनाला घेऊन घरी घेऊन जातो. तेव्हा त्याचे आई-बाबा बाहेर जाण्याची तयारी करत होते. कल्पनाला बघताच दोघांनाही आनंद होतो. पण राघव आणि कल्पनाच्या लक्षात येते की दोघेही बाहेर चालले आहे.
"काय कल्पना? आज बऱ्याच दिवसांनी घरी आली?" आशुतोष विचारतो.
"सर... ते" असे कल्पना बोलताच, आशुतोष तिला टोकून बोलतो, "तुला किती वेळेस सांगितले आहे आम्हाला सर, मॅडम नको बोलत जाऊ. आपण घरातलेच आहेना!"
"अरे आशुतोष, अजून या दोघांचे लग्न झाले नाही म्हणून तिला आई-बाबा म्हणायला अवघडल्यासारखं वाटत असेल." नलिनी बोलते.
"नक्कीच! मी ते समजू शकतो. पण मग आई-बाबाच म्हटले पाहिजे असे थोडी आहे." आशुतोष बोलतो.
"कल्पना, आशुतोषचा पण मुद्दा बरोबर आहे. तू आम्हाला काका-काकु का नाही बोलत." नलिनी बोलते.
"ठीक आहे. मी आजपासून तुम्हाला काका-काकूच बोलेल." कल्पना बोलते.
"बरं राघव, आम्ही बाहेर चाललो आहे. तुमच्या गप्पा, अभ्यास चालुद्या." नलिनी बोलते.
"आई, तुम्ही बाहेर चालला आहेत! खरतर कल्पनाचे तुमच्याकडेच काम आहे." राघव म्हणतो.
"काही महत्वाचं आहे का?" आशुतोष विचारतो.
"बाबा, कल्पनाला तिच्या बहिणीविषयी बोलायचे आहे. फार महत्वाचे आहे." राघव सांगतो.
"ठीक आहे. आपण बसून बोलूया." आशुतोष असे म्हटल्यावर सर्व सोफ्यावर बसून घेतात.
"काका, आमच्या घरची सर्व परिस्थिती तुम्हाला माहिती आहे. मीनाताईचे लग्न कसे झाले हेही माहित आहे. त्यामुळे मला ताईसाठी काहीतरी करायचे आहे." कल्पना बोलते.
"तुझ्या डोक्यात काही आहे का? म्हणजे नेमकं काय करायचे?" नलिनी विचारते.
" काकू, तिला एखादी नोकरी मिळेल का?" कल्पना विचारते.
"मिळेल ना! पण तिची तयारी आहे का?" नलिनी बोलते.
"ते माहीत नाही. मी अजून तिच्यासोबत बोलले नाही. आणि हो काकू ती फक्त नववी शिकलेली आहे. दहावीत असतानाच तिचे लग्न झाले." कल्पना सांगते.
"मला सांग, तिला काय करता येते? तिच्याकडे काही स्किल आहे का?" आशुतोष विचारतो.
"काका, तसे तिच्या हाताला चांगली चव आहे. जेवण चांगले बनवते." कल्पना सांगते.
"ठीक आहे मग आपण बघू तिला कूकची नोकरी कुठे भेटली तर. आणि समजा नाही भेटली तरी आपला एनजीओ ज्या महिलांकडे शिक्षण नसेल, स्किल नसेल तर आपण त्यांना तसे शिक्षण देऊन त्यांना त्यांच्या पायावर उभे करतो." आशुतोष बोलतो.
"कल्पना, प्रश्न नोकरीचा नाहीये. प्रश्न मीनाचा आहे. तू तिला तयार कर. तिला त्याच्या पायावर खंबीरपणे उभे करण्याची जबाबदारी आमची. आपण कितीही बोललो, मीनासाठी हे करायचे, ते करायचे पण तिची तयारी नसेल तर काहीच होणार नाही." नलिनी बोलते.
"काका-काकू, मी तयार करेल ताईला." कल्पना विश्वासाने बोलते.
"ठीक ऐ मग. मीना तयार झाली की तिला आपल्या ऑफिसला घेऊन ये. आणि तिने जर तुझे ऐकले नाही तरी तिला घेऊन ये. आम्ही तिच्याशी बोलू." आशुतोष बोलतो.
"हो काका." कल्पना म्हणते.
"आम्ही निघतो आता. आम्हाला महत्वाच्या कामासाठी बाहेर जायचे आहे." नलिनी असे बोलताच आशुतोष आणि ती निघतात. ते गेल्यावर कल्पनाही घरी निघते.
कल्पना मीनाच्या सुरक्षित भविष्यासाठी प्रयत्न करत होती. त्यातून तिला एक मार्गपण भेटला होता. पण इकडे मोरेंच्या घरी मीना सासरी जाण्याची तयारी करत होती.
वंदना जड अंतःकरणाने तिची बॅग भरत होती. मीनाने साधी साडी नेसली होती. सासरी निघायचे होते पण मीनाला चक्कर यायला लागते.
"आई मला चक्कर आल्यासारखे होत आहे." मीना सांगते
"तरीपण मी सांगत असते. वेळेवर जेवण करीत जा. पोटाला पोटभर खात जा. पण तू अजिबात ऐकत नाही." वंदना मीनाला जराशी ओरडते.
मीना धावत मोरीत जाते. तिला कोरड्या उलट्या होत होत्या.
मीनाचा निस्तेज चेहरा, तिला आलेली चक्कर आणि या कोरड्या उलट्या हे बघून वंदनाच्या लक्षात आले की मीनाला दिवस गेले आहे. चंद्रकला देखील तिथेच होती, त्यामुळे तिच्यापासून देखील हे लपून राहिले नाही.
चंद्रकला लगेच जोरजोरात दिनकरला आवाज द्यायला लागली. बाहेर ओट्यावर बसलेला दिनकर धावत घरात आला.
"आई, काय झाले? एवढ्या जोरजोरात का आवाज देत होती?" दिनकर घाबरून विचारतो.
"आरे घाबरतो काय! आनंदाची बातमी आहे. मिनी आई होणार आहे." चंद्रकला उत्साहाने सांगते.
"काय सांगते काय! मीने ऐ मीने..." दिनकर मीनाला आवाज देतो.
मीना आणि वंदना दोघीही बाहेर येतात. वंदनाला कळाले होते मीना आई होणार आहे पण तिने काही मीनाला सांगितले नव्हते.
"मीने बघतीस काय! तू आई होणार आहे आई!" चंद्रकला आनंदाने बोलत होती. तिचा आनंद गगनात मावत नव्हता.
"मीने... तुला मुलगाच झाला पाहिजे. मग बघ जावईबापू तुला कसे डोक्यावर घेऊन मिरवताय ते. नाहीतर घालशील तुझ्या आई सारख्या मुली जन्माला." दिनकर पुन्हा त्याची तीच री ओढतो.
"दिनकर, एवढी आनंदाची बातमी आहे. जावईबापूंना फोन करून सांग." चंद्रकला सांगते.
दिनकर लगेच सतीशला फोन लावतो.
"नमस्कार सासरेबुवा, आमच्या बायकोला कायमची माहेरी ठेवून घेतली की काय?" सतीश विचारतो.
"जावईबापू तसे काहीच नाहीये. उलट तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे." दिनकर म्हणतो.
"आनंदाची बातमी! कोणती आनंदाची बातमी?" सतीश विचारतो.
"जावईबापू, तुम्ही बाप होणार आहे. मीनाला दिवस गेले आहे." दिनकर आनंदाने सांगतो.
"काय सांगताय! ही खरंच आनंदाची बातमी आहे. आता मीनाला तिकडच राहूद्या. मीच एकदोन दिवसात तिकडं येतो." सतीश बोलतो.
"या... या... काहीच हरकत नाहीये." असे बोलून दिनकर फोन कट करतो.
सर्वजण आनंदात होते. पण मीनाला आनंद झाला आहे का हे मात्र कोणीच विचारत नव्हते. तिला हे मातृत्व पाहिजे की नाही हे विचारणार कोणीच नव्हते. मीना वंदनाकडे बघत होती, वंदना मीनाकडे बघत होती. पण दिनकर आणि चंद्रकलाचे भलतेच चालू होते.
"दिनकर, मीनाचे हे पहिलेच बाळंतपण आहे. कदाचित तिच्या घरचे आपल्याला हे बाळंतपण करण्यासाठी सांगतील. पण आपण काही तयार व्हायचे नाही." चंद्रकला म्हणते.
"आपण का तयार व्हायचे? आपल्याला काही कमी खर्च आहे का पुढे! अजून पाच मुलींचे लग्न बाकी आहेत." दिनकर बोलतो.
"हम्म... नाहीतर होशील तयार पोरीचे बाळंतपण करायला." चंद्रकला बोलते.
"आई, मला कळतं काय करायचे आणि काय करायचे नाही. असही मीनाच्या सासरी काय कमी आहे!" दिनकर बोलतो.
"मीनाला दिवस गेले ही चांगली बातमी आहे. पण तिच्या पोटात असणार पोरगं त्याचंच आहे." चंद्रकला बोलते.
"आई, ही बातमी मी कुसुमला फोन करून सांगतो." असे बोलून दिनकर बाहेर जातो.
मीना खोलीत एकटी शांत बसली होती. खरतर आई होणे हा कोणत्याही स्त्रीसाठी आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण असतो. पण हा आनंद मात्र मीनाच्या चेहऱ्यावर दिसत नव्हता.
मीनाला आनंद नाही झाला हे वंदनाच्या लक्षात आले होते. पण पुढे काय करावे हे मात्र तिला कळत नव्हते. वंदना आणि मीना दोघीही खोलीत शांत बसलेल्या होत्या.
थोडावेळ गेल्यावर कल्पना कॉलेजवरून घरी येते. तिने दरवाजात पाऊल ठेवताच दिनकर आणि चंद्रकलाचे तोंड वाकडे होते. कल्पनाच्या हे लक्षात येते. ती मुद्दाम त्यांना चिडवण्यासाठी चेहऱ्यावर मोठे हसू आणते आणि त्यांच्याकडे बघते.
कल्पना तशीच त्यांच्याकडे बघत खोलीत जाते. तिची बॅग ठेवते आणि हातपाय धुवून घेते. नंतर तिच्या लक्षात येते की वंदना आणि मीना एकदम शांत बसल्या आहेत.
कल्पनाला वाटते घरात काहीतरी झाले आहे. आजी आणि बाबा परत आई आणि ताईला काहीतरी बोलले आहे. कल्पनाचा राग अनावर होतो.
कल्पना मीनासाठी नोकरी बघत होती. आणि मीनाला दिवस गेले होते. कल्पनाने मीनाच्या नोकरीचा पूर्ण विचार केला होता पण तिने सतीशचा विचार केला नव्हता. आणि कल्पनाला अजून हेही माहित नव्हते की मीनाला दिवस गेले आहे...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा