"लेक : परक धन!" भाग - १३
कल्पनाच्या त्या अनपेक्षित आणि आक्रमक पवित्र्याने मोरेंच्या घरात सर्वजण आवाक झाले होते. जमिनीवर पडलेला चामडी पट्टा आणि कल्पनाच्या हातातील ती विषारी औषधाची बाटली बघून दिनकरची बोलतीच बंद झाली होती.
दिनकरला त्याचा झालेला अपमान चांगलाच जिव्हारी लागला होता. कल्पनाने त्याचे हात बंद केले होते. पण त्याच्या आतला संताप कुठेतरी बाहेर पडण्यासाठी धडपडत होता.
"हे सगळं तुझ्यामुळे झालंय! तूच या कारटीला डोक्यावर बसवलं आहे. तुझ्यामुळेच शेफारली आहे ही. आज मला उलटं बोलायला लागली." दिनकर असे बोलून वंदनावर धाऊन जातो.
दिनकरचा हात वंदनाच्या गालापर्यंत पोहचण्याआधीच कल्पना विजेसारखी मध्ये आली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते.
"बाबा! आईलाच काय घरातील इतर कोणालाही तुम्ही हात जरी लावला तर लक्षात ठेवा." कल्पना कडाडली. दिनकर आहे तसाच उभा राहिला.
दिनकरचा अहंकार दुखावला गेला होता, पण कल्पनाच्या डोळ्यातील ती आग बघून तो आतून हादरला होता. रागाने आणि अपमानाने फणफणत तो काहीही न बोलता घराबाहेर निघून गेला.
दिनकर गेल्यावर कल्पनाने आपली नजर खुर्चीवर बसलेल्या चंद्रकलावर टाकली. जी चंद्रकला नेहमीच घरात तोऱ्यात राहत होती, ती आता खुर्चीवर शांत बसली होती. कल्पनाने तिच्यावर नजर टाकल्यावर चंद्रकला कल्पनाच्या नजरेला नजर देत नाही.
थोड्यावेळाने घरातील परिस्थिती शांत झाली. दिनकर अजूनही घरच्या बाहेरच होता. मीना आणि कल्पना आतल्या खोलीत बसल्या होत्या. मीनाच्या चेहऱ्यावर अजूनही आश्चर्याचे आणि आदराचे भाव होते.
"कल्पना... तू हे कसं केलं? तुझ्यात एवढी हिंमत आली कुठून?" मीना विचारते.
"मला वाटलं ते मी केलं. बाकी काही नाही." कल्पना बोलते.
"या अगोदरही असं आपल्याला सगळ्यांनाच वाटले आहे. पण बाबांच्या समोर बोलण्याची सोड, डोळे वर करून बघण्याची कोणाची हिंमत नव्हती. बाबांना लांबूनच बघितले तरी आपण थरथर कापत होतो. मग आता असे काय झाले?"
"ताई, मी आता मोठी झालिये. मला माझे चांगले-वाईट कळते. आणि मी नाही सहन करू शकत."
"बरं...बरं... ठीक आहे. पण मला सांग तू खरंच चिठ्ठी लिहून ठेवली आहे का?"
"नाही ग ताई! मी अशी कोणतीही चिठ्ठी लिहून ठेवलेली नाहीये. त्यांनी फक्त इतकी वर्षे आपल्याला घाबरवण्याचे काम केलं. मीही आता तेच केलं. त्यांना घाबरवलं."
"आणि ती कीटकनाशकाची बाटली? परत असे काही करू नको."
"ताई, त्या बाटलीत कीटकनाशक नव्हतेच. जुनी रिकामी बाटली होती. मी फक्त बाबांना घाबरवत होते. मी एवढी मूर्ख नाहीये की कुणा दुसऱ्याच्या चुकीसाठी स्वतःचा जीव देईन. आत्महत्या करणं हे पळकुटेपणाचे आणि भ्याडपणाचे लक्षण आहे. संकटाना घाबरून पळायचे नाही, तर त्यांच्या डोळ्यात डोळे घालून लढायचे असते."
कल्पनाच्या बोलण्यात प्रचंड आत्मविश्वास होता, जो मीनालाही आता ऊर्जा देत होता.
"कल्पना, तुझ्यात एवढा आत्मविश्वास, हिंमत कुठून आली?"
"स्वावलंबाने! ताई, जी व्यक्ती दुसऱ्यावर अवलंबून असते, ती स्वतःचे निर्णय स्वतः कसे घेऊ शकेल. त्याचे निर्णयही त्या व्यक्तीवर अवलंबून असतात. आज मी दोन पैसे कमवते म्हणूनच बाबांना विरोध करू शकले."
"तुझे बरोबर आहे." मीना तिची नजर खाली जमिनीकडे करून बोलते. मीनाला माहित होते, ती स्वतः तिच्या नवऱ्यावर अवलंबून आहेत.
"ताई, मला तुला एक सांगायचे आहे. तू एखादी छोटीशी का होईना नोकरी कर. नाहीतर तुलाही आईसारखेच आयुष्य काढावे लागले असते. घरात त्रास झाल्यानंतर आईला नेहमी प्रश्न पडायचा की ती घराबाहेर गेली तर आपल्या सगळ्यांचे संगोपन कसे करणार आणि ती घराबाहेर पडलीच नाही. त्यामुळे तू अशी चूक करू नको."
"कल्पना, माझ्या घरातले मला कधीच नोकरी करून देणार नाही."
"मग सोड ते घर ताई! मी तुझ्या नोकरीची, राहण्याची सगळी व्यवस्था करू शकते. असंही ते लग्न कसं झाले आहे, हे सर्वांनाच माहिती."
"कल्पना, तू मला नोकरी, घर देणार! एवढ्या ओळखी तुझ्या कधी झाल्या?" मीना आश्चर्याने विचारते."
"ताई, ते मी तुला योग्य वेळ आल्यावर सांगेल. पण तुला एक चांगले आयुष्य जगायचे असेल तर माझ्या बोलण्याचा नीट विचार कर."
कल्पना आणि मीनाचे बोलणे चालूच होते. नंतर थोड्यावेळाने सर्वजण झोपून घेतात.
सकाळ झाली होती. मोरेंच्या घरातील वातावरण प्रचंड गंभीर आणि तणावपूर्ण होते. दिनकर अजूनही रागाने फणफण करत होता. वंदनाला टोमणे मारत होता. कल्पनाकडून झालेला विरोध त्याच्या चांगलाच जिव्हारी लागला होता.
चंद्रकला मात्र एकदम शांत होती. पण तिच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता. जणू तिच्या डोक्यात भलतेच काही चालू आहे असे वाटत होते.
दिनकर चहा घेऊन दुकानात जायला निघतो. दिनकर घराबाहेर पडताच चंद्रकला देखील लगबगीने त्याच्या मागे मागे घराबाहेर जाते. जणू तिला काहीतरी दिनकरला सांगायचे होते?
चंद्रकला, दिनकर बाहेर गेल्यावर वंदना सुहासला फोन करते.
"हॅलो, ताई! काय काय चालू आहे? बऱ्याच दिवसांनी फोन केला?" सुहास फोनवर बोलतो.
"आरे झाले पण तसेच आहे. काल रात्री चमत्कार झाला चमत्कार!" वंदनाच्या बोलण्यात आनंद होता.
"चमत्कार, कसला चमत्कार?" सुहास विचारतो.
वंदना काल रात्री जे झाली ते सर्व सुहासला सांगितले. सुहासला ते ऐकून कल्पनाचा अभिमान वाटू लागतो.
"काय सांगते ताई! म्हणजे आपली कल्पना आता मोठी झाली तर." सुहास आनंदाने बोलत होता.
"हो मग. जे मला इतक्या वर्षात जमले नाही ते तिने करून दाखवले. घे बोल तिच्या बरोबर." असे बोलून वंदना कल्पनाकडे फोन देते.
"हॅलो, मामा कसे आहात तुम्ही?" कल्पना विचारते.
"मी एकदम मस्त आहे. पण रात्री तुझ्यात काय संचारले होते कल्पना?"
"मला इतक्यात लग्न नाही करायचे. मग मी केला माझ्या पद्धतीने विरोध."
"बरं केलं! इतक्या लवकर लग्न करण्याची गरज नाहीये. अगोदर चांगली शिक, स्वतःच्या पायावर उभी रहा. मगच लग्नाचा निर्णयाचा निर्णय घे. तेही स्वतःच्या मर्जीने."
"हो मामा."
सुहास, वंदना आणि बाकी मुलींचे फोनवर चालूच होते.
इकडे दुकानात दिनकर आला होता. त्याच्या चेहऱ्यावर राग अजूनही फणफणत होता. त्याच्या पाठीमागून चंद्रकलाही दुकानात आली होती. तिच्या डोक्यात वेगळेच काहीतरी शिजत होते.
"दिनकर, रात्री जे घरात झालं ते जास्तच चुकीच झालं. त्या कालच्या पोरीने आपल्या दोघांचा अपमान केला आहे."
"आई, माझं रक्त अजून सळसळत आहे. पण काय करावा काही कळत नाही."
"तिला अशी अद्दल घडवावी लागलं की परत कोणत्याच पोरीने आपल्या विरोधात जायची हिंमत केली नाही पाहिजे."
"पण आई करणार काय? तिला हात जरी लावला तरी ती पोलिसात जाईल. या शिकलेल्या लोकांचा काहीच भरोसा नसतो."
"तू बरोबर बोलतोय. पण माझ्याकडे एक मार्ग आहे. त्यानं ती कल्पी वठणीवर येईल."
"कोणता मार्ग आई?"
"तिला घरच्या बाहेर काढून दे. डोक्यावरचं छप्पर गेलं की आपोआप वठणीवर येईल."
दिनकर विचार करायला लागतो.
"आरे दिनकर कशाचा एवढा विचार करतोय?" चंद्रकला दिनकरला विचारते?
"आई, तू म्हणतेय ते बरोबर आहे. असेच केले पाहिजे."
"चल मग लगेच घरी. तिला घराबाहेर काढू!"
"आई आत्ताच दुकानात आलो आहे. नीट धंदा पण नाही झाला. लगेच कुठं घरी जायचं."
"आरे दिनकर नंतरला काही अर्थ नाहीये. आत्ताच चल." असे बोलून चंद्रकला दिनकरला घराकडे घेऊन निघते.
घरी वातावरण एकदम खेळीमेळीचे होते. सर्व मुली एकदम आनंदात होत्या. कल्पना कॉलेजला जाण्याची तयारी करत होती. मीना आईला स्वयंपाकात मदत करत होती. बाकी मुली गौरी बरोबर खेळत होत्या. गौरी आता घरात पळायला लागली होती.
सगळे काही एकदम सुरळीत चालू होते. तेवढ्यात दिनकर आणि चंद्रकला दुकानातून घरी येतात. असा अचानक दिनकरला घरी आलेले पाहून वंदना थोडी विचारत पडते. पण तिला वाटते, "काहीतरी विसरले असतील."
"आई, मी कॉलेजला चालले आहे." असे बोलून कल्पना निघते.
दिनकर तिला दरवाजातूनच थांबून बोलतो, "कॉलेजला चालली आहे तर मग कायमचीच जा! माझ्या घरात जो माझं ऐकणार नाही, त्याला माझ्या घरात जागा नाही." दिनकरचा आवाज एकदम भारदस्त होता.
घरात एकच शांतता पसरते. कल्पनाची नजर वंदनाकडे जाते. वंदना, मीना दोघीही घाबरून बघत होत्या. आता पुढे कल्पनाचे काय होणार याची भीती दोघींच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा