Login

"लेक : परक धन!" भाग - १२

स्री जन्माची व्यथा मांडणारी कथा.
"लेक : परक धन!" भाग - १२

मीना लग्न करून सासरी गेली, त्या गोष्टीला आता तीन वर्षे उलटून गेली होती. सोळाव्या वर्षी लग्न झालेल्या मीनाचं बालपण आणि तारुण्य सतिशच्या त्या भल्यामोठ्या बंगल्यात कुठल्या कुठे हरवू. गेलं होतं.

मीना सतिशच्या घरात फक्त एक मोलकरीण होती. सतीशचा मुलगा तिला डोळ्यावर देखील धरीत नव्हता. सतीशची दारू आणि मारहाण, त्याच्या वासनेची शिकार, घरात राबणे एवढेच मीनाचे आयुष्य लग्नानंतर झाले होते.

तिच्या डोळ्याखालील काळी वर्तुळे आणि चेहऱ्यावरचा निस्तेजपणा तिच्या आयुष्यातील नरकयातना सांगत होता.

इकडे मोरेंच्या घरी दिनकरचा वंशाच्या दिव्याचा हट्ट अजूनही तसाच होता. मुलगा व्हावा म्हणून त्याने आता भोंदू बाबांचा रस्ता धरला होता. रोज त्याचे काहीना काही चालू असायचे. आज या बाबाने हे सांगितले, उद्या दुसऱ्या बाबाने दुसरे सांगितले.

या सगळ्या वातावरणात एक आशेचा किरण म्हणून निघाली होती. आणि ती म्हणजे "कल्पना." कल्पना आता कॉलेजला गेली होती. अर्थात तिला कॉलेजला जाण्यासाठी दिनकर आणि चंद्रकलाने विरोध केला होता. दिनकरने कल्पनाच्या कॉलेजच्या शिक्षणाला खर्च करण्यास स्पष्टपणे नकार दिला होता.

पण कल्पना मात्र दिनकरवर विसंबून नाही राहिली. कल्पना कॉलेज मधल्या 'कमवा व शिका' या योजनेतून लायब्ररीत काम करायला लागली त्यातून तिच्या शिक्षणाचा खर्च सहज होत होता.

लायब्ररीमध्ये काम करता करता कल्पना अभ्यासपण करायची. हुशार, मेहनती कल्पना कॉलेजची टॉपर होती. घरातील वातावरणामुळे स्वावलंबी असणे किती गरजेचे आहे हे तिला फार कमी वयात कळले होते. शिक्षणामुळे कल्पनाच्या विचारांना पंख फुटू लागले होते.

सध्या मीना काही दिवसासाठी माहेरी आली होती. तिचा कोमजलेला चेहरा आणि शरीरातील वर्ण तिची तिच्या सासरला काय अवस्था आहे हे सांगत होते. पण तिच्या बाजूने जाब विचारणारे कोणीच नव्हते.

रात्र झाली होती. दिनकर आणि चंद्रकला जेवायला बसले होते. जेवता जेवता दिनकर कल्पनाच्या लग्नाचा विषय काढतो.

"आई बाजूच्या गावच्या माझा मित्र संपत आहेना, त्याचा मुलगा आहे. संपतने त्याच्या मुलासाठी कल्पनाला विचारले आहे." दिनकर चंद्रकलाला सांगतो.

वंदना आणि मीना मान वळून कल्पनाकडे बघतात. कल्पनाच्या डोक्यात मात्र एक वेगळाच निश्चय होता.

"आर मग ठरवून टाकूकी. कशाची वाट बघायची!" चंद्रकला बोलते.

"ठरवू, पण पैशाचा बंदोबस्त करावा लागेल. ते काय लग्न करून नेणार नाही." दिनकर बोलतो.

"आरे थोडक्यात होत असेल तर करून टाकू. बाकी काही बघू नको. अजून पाच पोरी आहे."

"ठीक आहे आपण करून टाकू. मी संपत बरोबर बोलून कधी भेटायचं ठरवतो." दिनकर असे बोलून बाहेर जातो.

कल्पना आतल्या खोलीत जाऊन विचार करत बसली होती. तिला माहीत होते तिचे लग्न झाले तर शिक्षण, करिअर या सगळ्यावर तिला पाणी सोडायला लागेल. त्यामुळे तिला आत्ताच लग्नाला विरोध करावा लागेल. नाहीतर पुढे हे तिच्यासाठी खूप कठीण होईल.

कल्पना बराच वेळ विचार करून दृढनिश्चय करून बाहेर जाते. वंदना तिथे बसली होती. कल्पना तिच्या बाजुला जाऊन उभी राहते. दिनकर बाहेर होता पण चंद्रकला मात्र घरातच होती.

"आई मला अजून भरपूर शिकायचे आहे. मला इतक्यात लग्न करायचं नाही." कल्पनाच्या बोलण्यात एक निर्धार होता.

वंदना एक नजर चंद्रकलाकडे टाकून बोलते, "आग पोरी फक्त भेटायच चाललं आहे. लगेच लग्न थोडी होतं." वंदनाच्या बोलण्यात भीती होती.

"आई लग्न करायचे नाहीये मग कशाला भेटायचे? आणि ताईचे लग्न तर आठच दिवसात केले होते." कल्पना असे बोलल्यावर वंदनाकडे तिचे उत्तर नव्हते. वंदना शांत राहून घेते.

"तिच्यासोबत काय बोलतेय! माझ्याशी बोल." चंद्रकला मध्येच बोलते.

"तुला ऐकायला नाही आले का? मला लग्न नाही करायचे." कल्पनाच्या बोलण्यात विद्रोह होता.

"तुला लग्न करायचं आहे का नाही, हे तुला कोणी विचारले आहे." चंद्रकलाचा आवाज वाढला होता.

"ठीक आहे. मग ते पाहुणे आले का त्यांच्यासमोर तूच जा." कल्पना असे म्हटल्यावर चंद्रकलाचा पारा चढतो.

"तुझी जीभ आजकाल जास्तच चालायला लागली आहे. त्या कॉलेजला जाऊन तुला शिंग फुटायला लागली आहे."

चंद्रकला पुढे येऊन कल्पनावर हात उचलते. पण यावेळी सपकन आवाज आला नाही. कल्पनाने हवेतच चंद्रकलाचा हात पकडला. मोरेंच्या घरात आजवर कोणत्याही स्त्रीने असा प्रतिकार केला नव्हता.

हे बघून वंदना आणि मीनाच्या काळजात धस्स झालं. दोघींनाही काळजी होती "आता पुढे काय होईल?"

कल्पना मात्र चंद्रकलाच्या डोळ्यात डोळे घालून बघत होती. कल्पनाची नजर एवढी तीक्ष्ण होती की चंद्रकला कल्पनाला नजर देऊ शकली नाही.

नेमकं त्याच वेळेला दिनकरने घरात पाऊल टाकले. समोरच दृश्य बघून दिनकरचे डोळे विस्फारले. कल्पनाने आजीचा हात पकडला आहे, हे बघून त्याचा राग अनावर झाला.

चंद्रकलाने दिनकरला बघताच तिचे नेहमीसारखे नाटकं करायला सुरूवात केली.

डोक्यावरून हात मारून चंद्रकला बोलायला लागली, "आरे देवा, नशीब फुटलं रे माझं. या पोरीने माझ्यावर हात उचलला. आजवर कोणी माझ्यावर हात उचलला नाही. देवा रे देवा."

दिनकर कल्पनाच्या समोर येतो. वंदना आणि मीनाला वाटते आता कल्पनाचे काही खरे नाहीये.

"तू आजीवर हात उचलला?" दिनकर कणखर आवाजात कल्पनाला विचारतो.

"मी हात उचलला नाही. ती मला मारत होती म्हणून फक्त तिचा हात पकडला." कल्पना ठामपणे बोलते.

"आर दिनकर ती लग्न करायचं नाही म्हणतीये. मला म्हणती, तूच बस त्या पाहुण्यांसमोर. आजपर्यंत या घरात माझा हात कोणीच धरला नाही पण हिने धरला." चंद्रकला दिनकरला भडकून देते.

"तुला लग्न नाही करायचं?" दिनकर कल्पनाला विचारतो.

"नाही करायचं. मला अजून शिकायचं आहे. आणि माझ्या लग्नाचा निर्णय मीच घेणार. कोणीही मला भाग पाडू शकत नाही." कल्पना दिनकरच्या डोक्यात डोळे घालून बोलते.

"बघितला का तुझ्यासमोरच कशी मान वरून करून बोलतेय!" चंद्रकलाचे आगीत तेल ओतण्याचे काम चालू होते.

"चार पुस्तकं वाचून तुला माज आलाय वाटतं. तुझा माज उतरावाच लागेल." दिनकर असे बोलून दरवाजाला अटकवलेला पँटचा पट्टा काढतो.

वंदना आणि मीना पुढे येऊन दिनकरला पकडतात.

"अहो, लहान आहे ती. नका मारू तिला. समज नाहीये तिला." वंदना दिनकर समोर गयावया करू लागते.

"बाबा नका मारू तिला. मी तिला समजावून सांगते. ती करेल लग्न." मीना दिनकरला विनवण्या करते.

"आई, ताई तुम्ही दोघी बाजूला व्हा. तुम्हांला जर यांना थांबवता आले असते तर आजपर्यंत एवढे सगळे झालेच नसते." कल्पना वंदनाला आणि मीनाला बाजूला करते.

"बाबा तुमचा मार निमूटपणे सहन करायला, मी काही आई किंवा ताई नाहीये. तुमच्या पट्ट्याचा मला साधा स्पर्श जरी झाला तर मी माझ्या जीवाचे काही बरे वाईट करेल. आणि हो मला माहित होतं माझ्यावर अशी वेळ कधीना कधी येणार आहे. त्यामुळे मी तुमच्या आणि आजीच्या नावाची एक चिठ्ठी लिहून ठेवली आहे. ज्यात असे लिहिले आहे का, मी तुमच्या आणि आजीच्या जाचाला कंटाळून जीव सोडतेय."

कल्पना असे बोलून कीटकनाशकाची बाटली आणायला जाते. दिनकर आहे त्याच जाग्यावर उभा होता. कल्पना कीटकनाशकाची बाटली उघडते. आणि तोंडापर्यंत आणते.

"बाबा मी माझ्या मैत्रिणीला सांगितले आहे. माझ्या जीवाचे काही बरे वाईट झाले तर ही चिठ्ठी सरळ पोलिसांना नेऊन द्यायची. मी जाईलच पण तुम्हाला तुरुंगात पाठवून जाईल."

कल्पनाच्या डोळ्यात ना भीती होती ना माघार. कल्पनाचा आवाज इतका धारधार होता की दिनकर उगारलेला हात तसाच हवेतच राहतो.

"मला फक्त स्पर्श करा. मग बघाच मी काय करते." कल्पना जणू रुद्रावतार धारण केला होता.

दिनकर आणि चंद्रकला सुन्न झाले होते. दिनकरचा श्वास घशातच अडकला होता. तो आ वासून कल्पनाकडे बघत होता. त्याची पट्ट्यावरची पकड सैल होते आणि पट्टा धपकन खाली पडतो. चंद्रकलाचे डोळे भीतीने मोठे झाले होते. चंद्रकला मुकाट्यानं मागे सरकते.

वंदना आणि मीना अवाक होऊन कल्पनाकडे बघत होत्या. त्यांच्यासाठी हा एक मोठा धक्का होता. ज्या घरात मुलीला डोळे वर करून बघण्याची परवानगी नव्हती. त्याच घरातील एका मुलीच्या विद्रोहाने भिंती कापून गेल्या होत्या...

क्रमश:
0

🎭 Series Post

View all