Login

"लेक : परक धन!" भाग - ११

स्री जन्माची व्यथा मांडणारी कथा.
"लेक : परक धन" भाग - ११

मीनाला बघण्यासाठी पाहुणे आले होते. घरात पाहुण्यांची वर्दळ होती. पैशाचा माज सतिशच्या प्रत्येक शब्दात जाणवत होता. दिनकर त्याच्या प्रत्येक शब्दाला फक्त मान डोलवत होता. जणू दिनकरचा लाळघोटेपणा चालूच होता. मीनाला बोलावून तिला काही प्रश्न विचारण्यात आले होते.

"दिनकरराव, आम्हाला वाटतं लग्न पुढच्या आठ दिवसातच करावे. पोलीस आणि बाकीच्या काही अडचणी येऊ नयेत म्हणून म्हटलो." सतीशचे वडील बोलतात.

"तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे. आम्हाला काहीच अडचण नाहीये." दिनकर हो ला हो करतो.

आठ दिवसानंतरचा मुहूर्त निश्चित करण्यात आला. सगळ्यांना पेढे भरवण्यात आले. गळाभेट झाली. आणि पाहुणे निघाले. दिनकरच्या चेहऱ्यावर एक विकृत आनंद होता.

पाहुणे गेल्यावर मीना खोलीत एका निर्जीव बाहुलीसारखी बसली होती. वंदना एका कोपऱ्यात बसून मीनाकडे बघत होती. वंदनाचे आयुष्य जसे गेले तसेच मीनाचे आयुष्य वंदनाच्या डोळ्यासमोर उभे राहिले.

चंद्रकला, दिनकर दोघेही बाहेर गेले होते. हिच संधी साधून वंदनाने सुहासला फोन केला.

"हॅलो... सुहास..." वंदना रडत बोलते.

"ताई, काय झालं? तू रडते का? आणि पाहुणे गेले का?" सुहास चिंतेने विचारतो.

"हो गेले. आठ दिवसानंतरचा मुहूर्त ठरवला त्यांनी. आता काय करायचे सुहास? माझ्या मीनाचे कसं होईल!" वंदना रडत होती.

"ताई, तू एक काम कर मीनाला माझ्याकडे पाठव. मी बघतो काय करायचे."

"नको. परत ते सतीशची गुंड तुला त्रास देतील. तुझ्याइथं तू आणि मीना दोघंही सुरक्षित नाहीये."

"ताई, तू बोलते ते बरोबर आहे. मला माझ्या जीवाची पर्वा नाहीये. पण मीनाला काही नको व्हायला. ताई एक करू. मीनाला पळवून लावू!"

"पळवून?" वंदनाला काळजात धस्स झालं. क्षणभर थांबून वंदना बोलते, "आरे ती जाईल कुठं?"

"ताई, माझा एक मित्र आहे मुंबईला. एकदम जवळचा आणि विश्वासू. त्याच्याकडे मीना एकदम सुखरूप राहील. पैशाची व्यवस्था मी करतो. तू फक्त मीनाला तयार कर. मी तिला गावाच्या बाहेर घ्यायला देखील येतो.

वंदनाने फोन ठेवला. सुहासने एकदम पक्का बेत आखला होता. वंदनाला आता फक्त मीनाला तयार करायचे होते आणि इथून कोणाच्याही नकळत पाठवायचे होते.

रात्र झाली होती. चंद्रकला शेजारी गेली होती. दिनकर बाहेर फेरफटका मारायला गेला होता. वंदना ही संधी साधून मीनाला आतल्या खोलीत घेऊन जाते पण गडबडीत ती दरवाजा लावायचे विसरते.

"मीना... मी काय सांगते ते नीट लक्ष देऊन ऐक. तुझं लग्न थांबवायचे असेल तर एकच मार्ग आहे. तू पळून जा."

"आई, तू काय बोलतेय? मीनाला धक्का बसतो. ती दचकून मागे सरकते.

"मी योग्य तेच बोलतेय. तू इथली काळजी करू नकोस. मी बाबांना काहीतरी कारण सांगेन."

"आई, मी कुठे जाऊ! या समजात मुलींचे लचके तोडायला टपलेली नराधम कमी आहे का! तीन-चार वर्षाच्या लहानग्या मुलीवर बलात्कार, तर कधी साठ-सत्तर वर्षाच्या वृद्ध स्त्रीवर बलात्कार झाल्याचे आपण ऐकत असतो. इथं फक्त स्त्री-पुरुष समानता बोलले जाते. पण त्याचे कोणीही आचरण करत नाही. पळून जाऊन बाहेर जे हाल होतील त्याच्यापेक्षा हे लग्न झालेले बरे."

"मीना, हा सर्व विचार मामाने आणि मी केला आहे. मुंबईला मामाचा मित्र आहे. एकदम विश्वासू, त्याला मीपण ओळखते. मामा तुला गावाच्या बाहेर रात्री घ्यायला येणार आहे. तो पैसे पण देईल तुला आणि त्याच्या मित्राकडे पण सोडेल."

"आई, पण बाबा. त्यांना कळले तर ते तुझे हालहाल करतील."

"माझी काळजी करू नको. मी त्यांना सांगेन मला काहीच माहित नव्हते. तू..." बोलता बोलता वंदनाचे लक्ष दरवाजाकडे जाते. आणि वंदनाच्या अंगावर काटा उभा राहिला.

दरवाजात चंद्रकला उभी होती. तिने हे ऐकले की नाही हे मात्र दोघींनाही माहित नव्हतं. वंदनाची धाकधूक होत होती. मीना थरथर कापत होती.

चंद्रकला पुढे येऊन वंदनाच्या केसं पकडून बोलते, "चांगलंच शिकवते ग पोरीला." सपकन वंदनाच्या कानाखाली बसते.

"आजी नकोना मारू आईला..." मीना रडत रडत आजीचे पाय पकडते पण चंद्रकला तिला ढकलून देते.

चंद्रकलाचा कालवा चालू होता तोच दिनकर येतो. दिनकरला बघून वंदना चेहरा सुकून जातो. मीना डोक्यापासून पायापर्यंत थरथरत होती. दोघींनाही वाटते आता बाबा पट्टा काढतील आणि...

"काय झालं आई? कशाला एवढा कालवा करतेय?" दिनकर चंद्रकलाला विचारतो.

"तुझी बायको, तुझ्या पोरीला पळून जायचं शिकवीत होती."

हे ऐकून दिनकर जोराजोरात हसू लागतो. त्याचे हसणे बघून चंद्रकलाला धक्का बसतो. वंदना आणि मीनालाही कळत नव्हते की तो का हसत असेल?

"अगं आई जाऊदेना मग. तेवढीच घरातली एक ब्याद कमी होईल."

"आरे दिनकर मग पाहुण्यांना तू हे सांगणार, आमची एक ब्याद कमी झाली!"

"पाहुण्यांना कशाला काय सांगायचे. त्यांना थोडीना फक्त मीनाच पाहिजे. त्यांना मुलगी पाहिजे आणि आपल्या घरात एकच मुलगी आहे का!" दिनकर कल्पनाकडे बघून बोलतो.

हे ऐकताच वंदना आणि मीनाच्या पायाखालची जमीन सरकते. कल्पना निरागसपणे तिथे उभी होती. आपल्या सुटकेसाठी आपल्या लहान बहिणीचा बळी ही कल्पनाही मीनाला करवत नव्हती.

"हे तर माझ्या लक्षातच आलं नाही." चंद्रकला बोलते.

दिनकर वंदनाला उठवून बोलतो, "तुला मीनाला जिथं पाठवायचं आसल तिथं पाठव. मीना गेली तर दुसरी आहे. दुसरी गेली तर तिसरी आहे. मला काहीच अडचण नाहीये. मीना तुला जायचे का? मी सोडतो तुला."

मीना कल्पनाकडे बघून क्षणभर थांबून बोलते, "बाबा मला कुठेही जायचे नाही. तुम्ही सांगाल तेच मी करेल."

मोठ्या बहिणीने लहान बहिणीसाठी स्वतःच्या आयुष्याची राखरांगोळी स्वीकारली होती. दिनकरच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते. वंदना मात्र पुतळ्यासाठी उभी होती. कारण तिला माहीत होते की आता ती काही झाले तरी मीनाचे लग्न थांबवू शकत नाही. तेवढ्यात सुहासचा फोन येतो.

"सुहासचा फोन आहेना. घे... घे... आणि मोकळेपणाने तुला जे सांगायचे ते सांग." दिनकर वंदनाला बोलतो.

दिनकर आणि चंद्रकला खोलीच्या बाहेर जातात. वंदना सर्व प्रकार सुहासला फोनवर सांगते. आणि दोघेही हे सत्य स्वीकार करतात की मीनाचे लग्न ते थांबवू शकत नाही.

त्या रात्री घरात सगळे झोपले होते, पण वंदना आणि मीनाची झोप उडाली होती. दोघीही छताकडे बघत मुक्याने अश्रु ढाळत होत्या.

बघता आठ दिवस निघून गेले. लग्नाचा दिवस उजाडला. मांडव पडला, सनई चौघडे वाजू लागले. गावातल्या लोकांसाठी हा एक मोठा सोहळा होता पण मीनासाठी एक मोठी शोकांतिका होती.

लग्न मंडपात मीना पाटावर बसली होती. शेजारी सतीश बसला होता. कोपऱ्यात उभी असलेली वंदना हे सर्व बघत होती. पण मीनाऐवजी तिथं दुसरी वंदना बसलेली दिसत होती.

घरातील मोलकरीण, आणि मुलं जन्माला घालणारी मशीन एवढेच मीनाचे भविष्य वंदनाला डोळ्यांसमोर दिसत होते.

अक्षता पडल्या. मंगलाष्टके पूर्ण झाली. मीनाच्या गळ्यात सतीशने मंगळसूत्र बांधले आणि एका सोळा वर्षाच्या मुलीचे बालपण कायमचे संपले. जे असेही तिने कधी अनुभवले नव्हते.

काही वेळातच पाठवणीची वेळ आली. मीना आईजवळ गेली पण दोघींच्याही डोळ्यात अश्रू मात्र नव्हते. त्यांना माहित होते त्यांच्या अश्रूंना काहीच अर्थ नाहीये. मीना आईचा आशीर्वाद घेते आणि गाडीत बसते.

दिनकरचा आनंद मात्र गगनात मावत नव्हता. एक मुलगी लग्न करून घराबाहेर गेली आणि त्याच सतीश सारखा पैसेवाला मासा गळाला लागला अशी त्याची धारणा होती.
चंद्रकला, कुसुम देखील आनंदात होत्या. सतीश कुसुमच्या गावचा, त्याचा गावात रुतबा होता. परिणामी त्याचा फायदा आता तिलाही होणार होता.

गाडी सुरू झाली आणि धूळ उडवत सतिशच्या गावाकडे निघून गेली. गाडी नजरेच्या आड जाईपर्यंत वंदनाची नजर गाडीवर होती.

प्रत्येकाने स्वतःच्या स्वार्थासाठी एका मुलीच्या निरागसपणचा बळी दिला होता.सतिशच्या त्या अनोळखी जगात मीनाच्या नशिबात कोणते भोग होते, हे फक्त येणारा काळच सांगणार होता...

क्रमश:
0

🎭 Series Post

View all