"लेक : परक धन" भाग - १०
दिनकरला अटक झाली आणि त्यामुळे त्या माणसासोबतचे मीनाचे लग्न टळले याने वंदना आणि मीना आनंदात होत्या. चंद्रकला बाहेर गेली होती. दिनकर तुरुंगात होता. घरात खेळीमेळीचे वातावरण होते.
मीना आणि कल्पना जेवण बनवत होत्या. इतर मुली गौरी सोबत खेळत होत्या. वंदना भिंतीला टेकून बसली होती.
तेवढ्यात दरवाजातून "मीने... ऐ मीने..." असा आवाज येतो. सगळ्यांचे लक्ष दरवाजाकडे जाते. दरवाजात दिनकर उभा होता. दिनकर परत आला आहे हे बघून चंद्रकला लगेच घराकडे येते.
दिनकरला दरवाजात बघून सर्वांनाच धक्का बसतो. मीना एकटक आईकडे बघत होती, आणि जणू नजरेनेच विचारत होती, "आई, आता काय करायचे?"
वंदना थरथरत होती. तिचे पाय लटपट करीत होते. मुलींचा आनंद क्षणात नाहीसा झाला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर तणाव स्पष्टपणे दिसत होता. दिनकर घरात येतो. चंद्रकलाच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. दिनकरच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हास्य होते.
"मी घरी आलो आहे, याचा आनंद नाही झाला वाटतं?" दिनकर वंदनाच्या समोर उभे राहून बोलतो.
"नाही तसं नाहीये काही." वंदना घाबरून बोलते.
"मी तुला लहान मुलगा वाटलो का? का मला काही कळत नाही? तूच सुहासला माझ्या विरोधात तक्रार करायला सांगितली ना?" दिनकर बोलताना त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हास्य होते. पण त्या हसण्यामागे बरेच काही लपून होते.
"नाही... तसं..." वंदना बोलत असते तोच तिच्या गालावर सपकन एक चपराक बसते. मीनाच्या हातातला ग्लास धपकन खाली पडतो. घरात एकच शांतता पसरते. वंदनाला माहित होते की आपल्या आता काहीही झालेतरी फटके बसणारच आहे तर मग शांत तरी कशाला राहायचे.
"हो मीच केला होता सुहासला फोन. तुला तुरुंगात पाठवायचे होते. तू काय सुख दिले रे आतापर्यंत मला आणि माझ्या मुलींना? सुख जाऊदे, आम्हाला या घरातलं तरी समजलं का तू आणि तुझ्या आईने? फक्त आम्हाला तुमच्या इशाऱ्यावर नाचवले. तू आणि तुझी आई उठ म्हटलं की उठायचे, तुम्ही बस म्हटला की बसायचे. कधीही आम्ही कोणीच काहीच बोललो नाही. गप्प सर्व सहन केले आणि तीच आमची चूक झाली. पण आता मात्र पाणी डोक्यावरून चालले होते. तू या निरागस जीवाचे, तिला अजून जगाची एवढी एवढी पण समज नाहीये. तिचं तिच्या दुप्पट वयाच्या माणसाशी लग्न लावायला निघाला. त्याला तिच्यापेक्षा थोडासा लहान मुलगाय हेही तू विसरला? एवढी तुला पैशांची हाव आहे." वंदनाचा उद्रेक झाला होता. तिच्या श्वासांचा वेग वाढला होता.
वंदनाचे हे रूप बघून चंद्रकला आवाक झाली होती. दिनकर त्याच्या जागेवर शांत उभा होता.
"झाले का तुझे? तुझे झाले असेल तर सांग मला." दिनकर असे बोलत जसे त्याला वंदनाच्या बोलण्याच्या काहीच फरक पडला नाही.
वंदना दिनकरच्या नजरेला नजर देत होती. दिनकर वंदनाचे केस पकडून बोलतो, "लायकीत राहायचं. काय आहे माहितीका, पायातली चप्पल पायातच शोभते."
"दिनकर हिला चांगलीच अद्दल घडव! हिची जीभ आजकाल जास्तच चालायला लागली आहे." चंद्रकला दिनकरला अजून भडकवते.
दिनकर वंदनाला केसं पकडून आतल्या खोलीत घेऊन जातो. खोलीचा दरवाजा आतुन बंद करतो. आणि मग नेहमीसारखाच तोच पट्ट्याचा आवाज..., वंदनाचा किंचाळ्यांचा आवाज... येऊ लागतो. मीना आणि कल्पना दरवाजा ठोकत होत्या. बाकीच्या मुली रडत होत्या. पण दिनकरला काहीच फरक पडत नाही.
सकाळ झाली होती. घरातील वातावरण नेहमीसारखेच गंभीर होते. रात्री दिनकरने वंदनाला इतके मारले होते की तिला चालणे देखील कठीण झाले होते. दिनकर खुर्चीवर बसून चहा पित होता. तेवढ्यात त्याला कुसुमाचा फोन येतो.
"हॅलो कुसुम बोल, काय बोलते? आणि आमचे होणारे जावईबापू काय म्हणताय?" दिनकर बोलतो.
"दादा, म्हणजे तू सतीशरावांना जावई मानले तर." कुसुम हसून बोलते.
"त्यांनी मला तुरुंगातून बाहेर काढले. मग झालेना माझे जावई." दिनकरही हसत बोलतो.
"मग ऐक, तुझ्या त्या जावयाचाच फोन आला होता. आज भेटायचं बोलत होते. काय करायचे मग? काय सांगू त्यांना?" कुसुम दिनकरला विचारते.
"त्यात काय सांगायचं! ते बोलताय आज भेटायचे तर मग ये घेऊन त्यांना." दिनकर बोलतो.
"बरं ठीक आहे चालेल. सगळी तयारी करून ठेवा. आणि दादा तयारीत काही कमी ठेवू नका." कुसुस बोलून फोन कट करते.
"आई, कुसुमाचा सांगत होती पाहुणे आज यायचे बोलत होते. तर मग ते आज येऊ राहिले. मी दुकानातून गरजेचे सामान घेऊन येतो. तू यांच्याकडून तयारी करून घे. तयारीत कसलीही कमी नाही राहिली पाहिजे." दिनकर बोलतो.
"जा तू निर्धास्त. मी आहे घरातलं सगळं बघायला." चंद्रकला दिनकरला बोलते.
"आई, मी नसताना यांनी नाटकं केली तर एकेकीला हाताखालून काढ." दिनकर चंद्रकला सांगून दुकानात जायला निघतो.
दिनकर बाहेर गेला होता. चंद्रकलाही थोड्या कामासाठी बाहेर गेली होती. तोच सुहासचा फोन वंदनाला येतो.
"हॅलो, बोल सुहास." वंदना एकदम बारीक आवाजात बोलते.
"ताई तुझ्या आवाजावरूनच मला कळतंय, तिथं काय झालं असेल." सुहास बोलतो.
"सुहास तू तक्रार का परत घेतलीस?" वंदना सुहासला विचारते.
सुहास जे काही त्याच्या घरी घडले ते सर्व वंदनाला सांगतो.
"आरे देवा! तुला जास्त नाही मारलं ना त्या गुंडांनी." वंदना सुहासला विचारते.
"ताई माझे जाऊदे. तिथं काय चालू आहे?"
"आत्ताच कुसुमचा फोन आला होता. आज येणार आहे ते." वंदना हतबल होऊन बोलत होती.
"ताई, आपण आपल्या पद्धतीने सर्व प्रयत्न केले पण नशिबाच्या पुढे कोणाला जातं आलं! काळजी घे तुझी आणि मुलींचंपण."
"हम्म... तू पण काळजी घे."
दुपार झाली होती. मोरेंच्या घरात पाहुण्यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू होती. किंबहुना ती करून घेतली हात होती. कुसुम पाहुण्यांच्या अगोदरच आली होती.
"जर पाहुण्यांच्या समोर कोणी नाटकं केली तर याद राखा गाठ माझ्याशी आहे. एकेकीला सोलून काढेल." दिनकर सगळ्यांना धमकी देतो.
मीनाला कुसुमने तयार केले होते. पण मीनाचा चेहरा भावशून्य होता. ना तिच्या आनंद होता, ना दुःख, ना इतर कुठल्या भावना. जणू एखादा पुतळा कोणीतरी उभा केला आहे असेच वाटत होते.
थोडावेळ गेल्यावर सतीश आणि त्याच्या घरातील मंडळी मोरेंच्या घरासमोर येतात. मोठमोठ्या गाड्या आणि त्यातून आठ-नऊ माणसं खाली उतरतात. दिनकर जोरात त्यांचे स्वागत करतो. त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता.
वंदनाची नजर सतीशला शोधत होती. बघताचं पस्तीशीच्या वर वाटणारा, दाढी वाढलेली, डोक्यावर अर्धे टाकले, पोट सुटलेले, गळ्यात चैनी घातलेला सतीश घरात आला आणि वंदनाला धसकाच बसला.
सर्वजण घरात बसलेले असतात. कुसुम सगळ्यांची ओळख करून देते. सतीशची माणसं त्यांनी आणलेल्या भेटवस्तू घरात होत्या. त्यात महागड्या साड्या, कपडे, खाण्याचे पदर्श, मिठाई भरपूर प्रमाणात होतं. हे सगळे बघून दिनकरचे डोळे चमकत होते.
"सतीशराव, तुमचे खरंच खूप उपकार झाले. तुम्ही नसता तर मी तुरुंगातून बाहेर आलोच नसतो." दिनकर सतीशला बोलत होता.
"आपल्या माणसांसाठी नाही करायचे तर कोणासाठी करायचे सासरेबुवा. सासरेबुवा... म्हणू शकतो ना तुम्हाला?" सतीश हसून बोलतो.
"अहो नक्कीच, तुम्ही नाही बोलायचे तर कोणी बोलायचे." दिनकर देखील हसून बोलतो.
थोडावेळ अशाच गप्पा चालू राहतात. सतीशचे वडील मुलीला बोलवायला सांगतात. मग कुसुम मीनाला घेऊन येते.
मीनाच्या चेहऱ्यावर कोणतेच भाव नव्हते. तिला असे एखाद्या पुतळ्यासारखे बघून वंदनाचे डोळे पाणावतात. तेवढ्यात वंदनाची नजर सतीशवर जाते. सतीशची नजर मीनावर होती. पण त्याच्या नजरेत वासना स्पष्टपणे दिसत होती.
वंदनाला वाटत होते जाऊन एक त्याच्या कानाखाली ठेवावी पण तिचे हात बांधलेले होते. मीनाला पाटावर बसवले जाते. प्रश्न विचारले जातात.
वंदना हे सर्व बघत होती. पण वंदनाला तिचे दिवस आठवतात. तिचेही लग्न अशेच जबरदस्तीने झाले होते. मीना पाटावर बसलेली होती पण वंदनाला तीच पाटावर दिसत होती.
काळ बदलला होता पण परिस्थिती मात्र तिच होती. स्त्रीचे नाव बदलले होते पण तिची परिस्थिती तीच होती...
काळ बदलला होता पण परिस्थिती मात्र तिच होती. स्त्रीचे नाव बदलले होते पण तिची परिस्थिती तीच होती...
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा