Login

"लेक : परक धन" भाग - ९

स्त्री जन्माची व्यथा मांडणारी कथा.
"लेक : परक धन!" भाग - ९

सकाळची वेळ होती. मोरेंच्या घरात नेहमीसारखीच शांतात होती. दिनकर घरात खुर्चीवर चहा पित बसला होता. तेवढ्यात पोलिस गाडीच्या सायरनचा आवाज येतो. पोलिसांची गाडी दिनकरच्या घरासमोर येऊन उभी राहते. पोलिस दिनकरच्या दरवाजात येऊन उभे होते.

पोलिस आल्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले होते. लोकांची कुजबूज चालू झाली होती.

दरवाजात पोलिसांना बघून मात्र दिनकरला काहीच सुचत नव्हते. त्याच्या काळजात धस्स झालं. दिनकर आहे त्याच जागेवर उभा राहून पोलिसांकडे बघत राहतो.

"दिनकर मोरे कोण आहे?" इन्स्पेक्टर मोठ्या आवाजात विचारतात.

"मी... मीच आहे साहेब. काय झालं?" दिनकर थरथरत्या आवाजात पुढे येऊन बोलला.

"तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलीचे लग्न करत आहात. अशी बालविवाहाची तक्रार आमच्याकडे आली आहे." पोलीस बोलतात.

हे ऐकताच दिनकरचे पाय लटपटायला लागले. आतल्या खोलीतून चंद्रकला, वंदना, आणि मुली बाहेर आल्या.

"साहेब, तुम्हांला कोणीतरी खोटी माहिती दिली आहे?" दिनकर बोलतो.

"तुमच्या बायकोच्या भावाने तक्रार केली आहे. तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलीचे लग्न करत आहात." पोलीस बोलतात.

पोलीस असे बोलल्यावर दिनकर वंदनांकडे रागाने बघत होता. वंदनाची नजर जमिनीकडे होते.

"मीना कोण आहे? तिला आमच्या समोर बोलवा."

पोलिसांनी बोलल्यावर मीना त्यांच्या समोर जाऊन उभी राहते. मीनाचा थरकाप होत होता. मीनाला बघताच पोलिसांना तिच्या वयाचा अंदाज आला होता.

"बाळा, तुझे नाव काय?" इन्स्पेक्टर शांतपणे विचारतात.

"मीना..." ती सावकाश बोलते.

"तुझे वय काय आहे? खरं सांग. घाबरू नकोस, आम्ही तुला मदत करायला आलो आहोत." पोलीस मीनाला दिलासा देतात.

मीनाने एक नजर वडिलांकडे टाकली. दिनकरचे डोळे रागाने लाल झालं होते. जणू त्याच्या नजरेत एक धमकी होती. त्या नजरेचा अर्थ मीनाला कळाला होता.

"साहेब, मी अठरा वर्षाची आहे. आणि मी माझ्या मर्जीने लग्न करत आहे." मीना मान खाली घालून बोलते.

हे ऐकून वंदनाला धक्का बसला. "या पोरीने सगळे खरे सांगायचे तर कशाला खोटं बोलली." असा विचार वंदना करत होती.

"बघितले साहेब, मी म्हटलं होतं तुम्हाला खोटी माहिती मिळाली आहे." दिनकर आता आत्मविश्वासाने बोलत होता.

पोलिसांना मात्र मीना खोटं बोलत असल्याचा संशय आला होता. तिचं थरथरणारं शरीर, डोळ्यातील भीती आणि वारंवार वडिलांकडे बघणे हे पोलिसांच्या नजरेत आले होते.
एक महिला पोलिस पुढे येऊन मीनाशी बोलण्याचा प्रयत्न करते.

"हे बघ पोरी, कोणाच्या दबावाखाली बोलू नकोस. पोलिस तुझ्या बरोबर आहे. त्यामुळे तुला घाबरण्याची काहीच गरज नाहीये." महिला पोलीस मीनाला समजावण्याचा प्रयत्न करते.

पण मीना गप्प होती.

"तिने एकदा सांगितले ना तुम्हांला. तुम्ही का परत परत तिला विचारत आहे?" दिनकर थोडा वरच्या आवाजात बोलतो.

"ऐ जरा खालच्या आवाजात बोल. नाहीतर अशा जागेवर फटके देईल की परत कधीच आयुष्यात खाली बसता येणार नाही. चल मुलीचे आयडी प्रूफ घेऊन ये. आम्हाला तिची जन्म तारीख बघायची आहे." पोलीस बोलतात.

"आठवत नाहीये आता तिचे कागदपत्रे कुठे ठेवली आहे." दिनकर उडवाउडवीचे उत्तर देतो.

"हा केव्हापासून उडवाउडवीची उत्तरं देत आहेत. घ्या याला पोलीस स्टेशनला, म्हणजे याला सगळे आठवेल." इन्स्पेक्टर बोलल्यानंतर दोन हवालदार दिनकरला पकडून गाडीकडे घेऊन जातात. आजूबाजूचे सर्व लोकांची नजर दिनकरवर होती.

पोलीस दिनकरला घेऊन गेलेले असतात. आतापर्यंत पोलिसांमुळे गप्प असलेल्या चंद्रकलाचा पारा मात्र चढतो.

"वंदे... तुझ्या भावाने माझ्या मुलाला तुरुंगात पाठवले. तूच सांगितलं ना त्याला पोलीसात तक्रार करायला? लाज नाही वाटली का तुला नरवाऱ्याला तुरुंगात पाठवताना?" चंद्रकला वंदनावर ओरडत होती.

"तुमच्या मुलगा तुरूंगात गेला याचा तुम्हांला त्रास होतोय. आणि माझ्या मुलीला तुम्ही नरकात पाठवीत होते त्याचे काहीच नाही का?" वंदनाच्या बोलण्यात विद्रोह होता.

"गप्प बस! मला तोंड वर करून बोलते. एवढाच पोरींचा पुळका आसल तर तुझ्या पोरी घेऊन निघ घरच्या बाहेर." चंद्रकला वंदनावर धाऊन जाते तिला मारते.

मीना मध्ये जाते. चंद्रकला मीनाच्या पाठीवर मारून बोलते, "कारटे तुझ्यामुळे झाले हे सगळं. काळतोंडी कुठली!"

वंदना सर्व मुलींना आतल्या खोलीत घेऊन जाते आणि खोलीचा दरवाजा आतुन बंद करते. बाहेर चंद्रकलाची बडबड चालू होती.

चंद्रकला लगेच कुसुमला फोन करून झालेला प्रकार सांगते.

"आई, तू काळजी नको करू. मी लगेच सतीशरावांना फोन करून सांगते. त्या सुहासला वाटत असेल तो जास्त शिकलेला आहे पण सतीशरावांच्या खूप मोठ्या ओळखी आहे. दादा लगेच सुटेल." कुसुम चंद्रकलाला दिलासा देते.

"हा कर बाई काही तरी कर. आता तुझ्याकडूनच अपेक्षा आहे." चंद्रकला बोलते.

वंदनाने खोलीत गपचूपपणे सुहासला फोन केला आणि सर्व प्रकार सांगितला.

"सुहास, खरंच तुझे खूप उपकार झाले बघ. आज तुझ्यामुळेच त्या माणसाबरोबरचं मीनाचं टळलं." वंदना बोलते.

"ताई, आभार कसले मानते. मीना मला परकी आहे का!" सुहास बोलतो.

"सुहास तुझाच आधार आहे रे मला."

"ताई काहीही काळजी करू नको. मी मीनाच्या बाबतीत काहीही चुकीचे होऊन देणार नाही."

वंदना आणि सुहास मीनाचे लग्न होणार नाही या कारणाने आनंदित असतात. पण त्यांचा आनंद फार काळ टिकणार नव्हता.

दुपारची वेळ होती. सुहास घरात बसला होता. तेवढ्यात दोन मोठ्या गाड्या घरासमोर येऊन थांबल्या होत्या. त्यातून नऊ-दहा माणसं उतरतात. त्यांच्या हातात मोठ्या साखळ्या, हॉकी स्टिक्स होत्या.

एकजण थेट सुहास जवळ जाऊन त्याची कॉलर पकडून बोलतो, "सुहास तूच आहे का रे?"

सुहास आणि घरातील कोणालाच काय चालू आहे हे कळत नव्हते. ही माणसं कोण आहे? कशाला आली आहे? असे प्रश्न त्यांना पडतात.

"हो, मिच सुहास आहे. तुम्ही कोण?" सुहास घाबरून बोलतो.

"लई माज आला का तुला. त्या दिनकर मोरे विरोधातली तक्रार गपगुमानं माग घ्यायची." गुंड सुहासला धमकी देतो.

"आरे पण तुम्ही कोण आहात?"

"आम्हाला सतीश शेठने पाठवले आहे. तू त्यांच्या सासऱ्याच्या विरोधात तक्रार केलीसना. आता तुला त्याचे परिणाम भोगावे लागतील."

ही माणसं कोणी पाठवले हे सुहासच्या लक्षात येते.

"तुम्ही काही केले तरी मी तक्रार मागे घेणार नाही."

सुहास असे बोलताच एकजण घरातील टीव्हीवर हॉकी स्टिक्स मारून टीव्ही फोडतो.

"तक्रार मागं घेतली नाहीतर या टीव्ही सारखंच तुला फोडू."

"तुम्ही मला मारून जरी टाकलं तरी मी तक्रार मागे घेणार नाही."

सुहास असे बोलताच ती गुंड सुहासला बेदम मारहाण करायला लागतात. महेश्वरी धावत जाऊन त्या माणसांचे पाय पकडून सुहासला सोडण्यासाठी विनंती करते. ती गुंड थांबतात.

"ऐ बाई, तुला तुझा नवरा त्याचा पायांवर चालावा असे वाटत असेल ना तर सांग तुझ्या नवऱ्याला तक्रार मागे घ्यायला." गुंड महेश्वरीला धमकी देतो.

"अहो, आपण सर्वसामान्य माणसं. आपण कशाला यांच्या नादाला लागायचे. घ्या मागे तक्रार." महेश्वरी रडत सुहासला बोलते.

"काही झालं तरी मी तक्रार मागे घेणार नाही." सुहास एकदम ठामपणे बोलतो.

"ऐ... ऐ... कशाला डोक्याला शॉर्ट देतोय. आरे तुझी मुले शाळेत गेलीना. त्यांना घरी येऊ द्यायचे की नाही तुला." गुंड सुहासला बोलतो.

"माझ्या मुलांना काही झाले ना मी कधीच तुम्हांला माफ करणार नाही. तुम्ही तक्रार मागे घेताय की मी मुलांना घेऊन माझ्या माहेरी निघून जाऊ." महेश्वरी थरथरत बोलत होती.

काहीक्षण घरात शांतता पसरते. महेश्वरी सुहासकडे बघत होती. तिच्या नजरेत राग आणि काळजी दोन्ही होते. सुहास नजरेत मात्र माघार दिसत होती.

"मी घेतो तक्रात मागे. पण माझ्या मुलांना काही करू नका."

सुहास अखेर त्या गुंडासोमर झुकतो. त्याच्यासमोर दुसरा कुठला पर्याय पण नव्हता. गुंड निघून जातात. महेश्वरी सुहासला जिथे जिथे लागले होते तिथे तिथे बर्फाने शेकवत होती. तिच्या नजरेत एक भिती होती.

इकडे मोरेंच्या घरी चंद्रकला बाहेर गेली होती. घरामध्ये आनंदाचे वातावरण होते. मीनाचे त्या माणसाबरोबरचे लग्न टळले म्हणून मीना आणि वंदना दोघीहींच्या चेहऱ्यावर हसू होते. सर्वजणी गौरी बरोबर खेळत होत्या. तेवढ्यात दरवाजात आवाज येतो, "मीने"...

क्रमश:
0

🎭 Series Post

View all