Login

कोण होता तो?..

संकटात एका अनोळखीने कार्तिकचा जीव कसा वाचवला, त्या व्यक्तीबद्दल त्याला कळेल का? जाणून घ्या या कथेत..
लघुकथा लेखन स्पर्धा- एप्रिल:-२०२६

विषय:- एक अनोळखी भेट

शीर्षक:- कोण होता तो?..

"ओह! शिट्..या गाडीला आत्ताच बंद पडायचे होते का? बोनेट उघडून बघतो, काय झाले आहे ते?" कार्तिक बंद पडलेली गाडी कित्येक वेळा चालू करण्याचा प्रयत्न करत होता; पण ती चालूच झाली नाही तेव्हा तो वैतागत मनात म्हणाला.

सूनसान रस्त्यावर रात्रीच्या वेळी त्याची गाडी बंद पडली होती. तो स्वतःवरच वैतागत गाडीतून खाली उतरला. मोबाईलचा टाॅर्च चालू केला आणि गाडीच्या पुढच्या बाजूला आला. बोनेट उघडून टाॅर्चच्या उजेडात पाहू लागला. गाडीचे इंजिन गरम झाले हेच फक्त लक्षात आले, बाकी काही कळलेच नाही.

"ओह गाॅड! काय करु आता? आता ह्या आडरानात गॅरेज कुठे शोधू? जवळपास कोठे आहे का? ते मोबाईलवर सर्च करून पाहतो." असे स्वतःशीच म्हणत त्याने मोबाईल सुरू केला तर मोबाईलला रेंजही नव्हती. म्हणून त्याची अजून चिडचिड होत होती.

कार्तिकला गावाकडची जमीन विकायची होती. त्याच विक्रीसाठी तो ऑफिस सुटल्यावर डायरेक्ट गावाकडे निघाला होता. बऱ्याच वर्षांनी तो गावी जात होता. इतक्या वर्षात गावाचा कायापालट झाला असेल असे त्याला वाटले होते. त्या अनुषंगाने रात्रीपर्यंत गावी पोहोचू या अंदाजात तो निघाला होता. गावात एखाद्या हाॅटेलमध्ये थांबून जेवण करू असेही त्याने ठरवले होते. ठरवलेले कधीच होत नसते तेच त्याच्याबाबतीत झाले होते. सोबतीला कोणीच नव्हते. रात्रीचा प्रवास असेल तर नेहमी तो एकटाच जायचा.

त्या रस्त्यावर चिटपाखरूही नव्हते. रातकिड्यांच्या किरकिर शिवाय कसलाच आवाज येत नव्हता. कोणीतरी येईल या अपेक्षेने तो बराच वेळ गाडीजवळ थांबला ; पण त्याचा अपेक्षाभंग झाल्याने त्याने गाडी लाॅक केली आणि एक हात खिशात घालून पायी चालू लागला.

थोडे अंतर पार गेल्यावर रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेल्या दाट झुडूपातून त्याला कुजबुज ऐकू आली. त्याच्या अंगावर काटा आला आणि मनात धडकी भरली. तरीही सावध पवित्रा घेत तो झपझप पावले टाकत निघाला.

अचानक चेहऱ्यावर रूमाल बांधलेल्या दोन माणसांनी त्याची वाट अडवली आणि चाकूचा धाक दाखवत त्याला म्हणाले,"ए जे काही तुझ्याजवळ असेल, ते पटकन काढून दे. नाही तर हा चाकू तुझ्या आरपार गेलाच म्हणून समज."

तो प्रचंड घाबरला आणि पटकन जवळ असलेले पाकीट, सोन्याचे लाॅकेट, किमती घड्याळ काढून देत होता.

तोच 'धाड ऽ..ऽ..' एका चोराच्या पाठीवर एक जाडजूड लाकडाचा प्रहार झाला. दुसरा वळून बघायला गेला तोच त्याच्याही डोक्यावर प्रहार झाला.

अचानक काय झाले हे कळायलाही अवधी त्या दोघांना मिळाला नाही. ते दोघे घाबरून धडपडत उठले आणि पळून जाऊ लागले.

सगळ्याला घाबरून कार्तिक दोन पावलं मागे सरकला.

पण त्या चोरांनी जाता जाता एक चाकूचा वार कार्तिकच्या दंडावर केला.

"आह ऽ!.. दंडाला धरून तो वेदनेने कळवला.

"च्या मारी तुमच्या तर. पुन्यांदा भेटा साल्यांनों, मग बघतो तुम्हास्नी." त्या पळणाऱ्या चोरांच्या दिशेने दगड भिरकावत एक भारदस्त आवाज घुमला.

मग तो कार्तिककडे धावत येत म्हणाला,"ए पोरा, लय लागलय व्हयं रं. बघू दे मला."

कार्तिक दंडावर हात दाबून धरत खाली बसला होता. मोबाईल बाजूला पडला होता. त्यामुळे त्याचा टाॅर्च बंद पडला होता.

अंधार असल्याने दोघांनाही एकमेकांचे चेहरे दिसत नव्हते.

"हो, खूप दुखतंय. रक्त पण खूप येत आहे." कार्तिक विव्हळत कसेबसे म्हणाला.

"तू काय बी चिंता करू नकोस. इथं जवळच एक दवाखाना हाय. माझी सायकल हाय, चल म्या नेतो तुला. थांब आलोच." असे म्हणत तो व्यक्ती निघून गेला. फक्त त्याचा पावलांचा आवाज येत होता.

आताच चोर आडवे आले. आता ह्या अनोळखी भेट झालेल्या व्यक्तीवर विश्वास ठेवावा का? भलेही त्याने त्या चोरांपासून त्याला वाचवले होते. असा संभ्रम कार्तिकच्या मनात निर्माण झाला.

थोड्याच वेळात तो व्यक्ती छोटा टाॅर्च आणि सायकल घेऊन कार्तिक जवळ आला. आता त्याची जखम पाहून त्याच्या चेहऱ्यावर वेदनेचे भाव उमटले. त्याने त्याच्या पायजमामधला रूमाल काढून त्याच्या जखमेवर बांधले.

टाॅर्चचा पुरेसा प्रकाश नसल्याने कार्तिकाला त्याचा चेहरा नीट दिसला नाही. त्याने त्याला सायकलवर मागे बसायला सांगितले. त्याला घेऊन तो तेथून जवळच असलेल्या एका दवाखान्यात घेऊन गेला. त्याच्यावर उपचार झाले.

त्याला त्याने येण्याचे कारण विचारले. त्याने सांगितल्यावर 'आता आराम कर. सकाळी तिथे जा, तुला मेकॅनिक भेटेल.' असे तो म्हणाला.

हाॅस्पिटलमध्येच त्याला नाष्टा दिला गेला. ते खाऊन तो गोळी खाऊन झोपला. तो झोपल्यावर तो व्यक्ती निघून गेला.

सकाळी जेव्हा कार्तिकला जाग आली. तो व्यक्ती त्याला कुठेच दिसली नाही. तेव्हा त्याने त्याची चौकशी केली ; पण कोणालाच त्याच्याबद्दल माहिती नव्हते.

रात्री वेदनेमुळे कार्तिकला त्याचे नाव विचारायचे, आभार मानायचे सुचलेच नाही.

तो तेथून त्याच्या बंद पडलेल्या गाडीजवळ आला. तर त्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे तिथे खरंच एक मेकॅनिक उभा होता. कदाचित याला त्या व्यक्तीबद्दल माहिती असेल अशी आशा त्याच्या मनात निर्माण झाली; पण जेव्हा त्यालाही काही माहिती नाही हे कळले तेव्हा तो नाराज झाला.

गाडी दुरुस्त करून तो गावात आला. जमिनीची विक्री झाली. त्या व्यक्तीबद्दल त्याने जाणून घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याच्या हाती काहीच लागले नाही. तो निराशेने घरी निघाला. पूर्ण वाटेत तो त्याच्याबद्दल विचार करत होता.

तो भेटला नसता तर आपले काय झाले हा विचार करून त्याच्या मनाचा थरकाप उडाला.

नंतर तो कितीतरी वेळा त्या गावी गेला, त्याच रस्त्याने ..कदाचित ती व्यक्ती भेटेल या एकाच आशेवर..पण पुन्हा तो कधी भेटलाच नाही.

पण आजही मनोमन त्याच्यासाठी तो देवाला प्रार्थना करतो.

ती अनोळखी व्यक्ती आणि त्याची भेट कायम त्याच्या मनात घर करून राहिली. त्याच्या मनात आजही एकच प्रश्न घोळत आहे..कोण होता तो?..

समाप्त -

©️ जयश्री शिंदे


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →