ह्या वर्षी दिवाळीचा सण खूप छान साजरा झाला. त्यामुळे मी खूप आनंदात होते. यथासांग फराळही छान झाला होता. म्हणजे कुठलाही पदार्थ फसला नव्हता. मला धुळीची ॲलर्जी आहे त्यामुळे घरची साफसफाई करताना भिती वाटत होती की ऐन दिवाळीत आजारी पडते का? पण तसे काही झाले नाही.
दिवाळीचे चार दिवस छान साजरे झाले आणि मला खोकला चालू झाला. मी आपले घरगुती उपाय म्हणजे दुधहळद, जेष्ठमधाची पावडर घेतली पण खोकला काही थांबायचे नाव घेत नव्हता. खोकून खोकून पोट, बरगड्या दुखायला लागल्या. जेवल्यानंतर पित्त होऊन उलटी व्हायला लागली. रात्री खोकल्यामुळे झोप होत नाही त्यामुळे तोंडात लवंग ठेवायचे त्यामुळे झोप लागायची थोडा वेळ पण त्यामुळे तोंड आले. खोकल्याचे एक वैशिष्ट्य असते. तो दिवसा कमी येतो आणि रात्री जास्त येतो. त्यामुळे रात्री झोपले की खोकला चालू व्हायचा तो थांबतच नसे. त्यामुळे माझ्या सोबत घरातल्या लोकांच्या झोपेचे खोबरे व्हायला लागल्यावर मी डॉक्टरकडे गेले. डॉक्टरकडे गेल्यावर डॉक्टरांनी मला तपासताना सांगितले खोका पण त्या वेळी नेमका खोकला आलाच नाही. डॉक्टरांनी मला तपासून खोकल्यावरची औषधे दिली आणि सांगितले की तुम्ही दिवाळीचा फराळ करताना तळण केले त्यामुळे खोकला झाला आहे. तुम्हाला पित्ताचा त्रास आहे त्यामुळे तुरडाळ खाऊ नका, खोकला आहे त्यामुळे दही, ताक नको.
डॉक्टरांकडून घरी आल्यावर औषध घेतली आणि मला वाटले आता मला बर वाटेल. माझ्याबरोबर घरातल्यांची झोपा सुद्धा पूर्ण होतील. पण कसले काय? चार दिवस औषध घेऊन सुद्धा खोकला थांबायचे नाव घेत नव्हता. खोकल्यामुळे रात्री झोप नाही. त्यामुळे चिडचिड होत होती. त्यात सकाळी उठल्यावर रोजची कामे करावीच लागत होती. त्यात मुख्य म्हणजे स्वयंपाक. रोज मुलाला व नवऱ्याला बाहेर खा कसं सांगणार आणि सांगितले तरी माझ्यासाठी मला काहीतरी बनवावेच लागायचे. औषधासाठी, पोट पूजेसाठी. जेवण बनवताना पण भात बनवला तर मुगाचे वरण बनवावे लागे. पित्तामुळे तुरडाळ खायला डॉक्टरांनी नाही सांगितले होते. तोंडाला चव नाही म्हणून लोणचं घ्यावे तर खोकला.
चार दिवस डॉक्टरांचे औषध घेऊन सुद्धा खोकला थांबायचे नाव घेत नव्हता. शेजारीपाजारी आपल्या परीने घरगुती उपचार सांगत होते. ते पण मी करुन बघत होते. पण फरक काही पडत नव्हता. त्यामुळे मी परत डॉक्टरकडे गेले त्यावेळी मला डॉक्टरांनी औषध बदलून दिले. आणि मग कुठे आता माझा खोकला थांबला आहे आणि मी रात्रीची निवांत झोपू शकत आहे. तरीपण आता झोपताना भितीच वाटते खोकला येईल आणि माझी झोप उडेल.
ह्या खोकल्यामुळे मला जाणवले की खोकल्याचा नाद नाही करायचा. तो तुम्ही डॉक्टरांची औषध, घरगुती औषध घेऊन सुद्धा तुमची झोप उडवतो आणि अजून एक म्हणजे कोणालाही खोकला थांबण्यासाठी उपाय नाही सांगायचा कारण खोकल्याचे सुद्धा अनेक प्रकार आहेत आणि तो त्याला जेव्हा थांबायचे तेव्हाच थांबतो.
ह्याबाबतीत माझा अजुन एक अनुभव. माझी नागपूरची मैत्रीण, विद्याला मागच्या महिन्यात खूप खोकला झाला होता. डॉक्टरांची औषध, घरगुती उपचार करुन सुद्धा खोकला थांबत नव्हता. त्यामुळे ती कंटाळली होती आणि मी तिला फोनवरुन खोकला थांबवण्यासाठी उपाय सांगत होते.
डॉक्टर बदल, जेष्ठमधची काडी तोंडात ठेव, दुधहळद पी. ती शांतपणे सगळं ऐकून घेत होती. पण तिला त्यावेळी किती त्रास होत असेल हे मला स्वतःला खोकला झाल्यावर समजले.
आजारी पडलेल्या माणसाला सल्ला देणे सोपे असते. पण तो माणूस आजारामुळे कंटाळलेला आहे आणि आपण सल्ले देत बसलो तर तो आपल्यालाही कंटाळतो. खरं आहे ना. तुमचे काय मत आहे ह्यावर?
माझा खोकला शेवटी महानगरपालिकेच्या दवाखान्यात मिळणाऱ्या खोकल्याच्या औषधाने बरा झाला.
©️®️ ज्योती प्रशांत सिनफळ
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
