Login

.. खिडकी ..

खिडकीच्या माध्यमातून उलगडत जाणारी उत्कंठावर्धक, रहस्यमय कथा
ईरा लघुकथा लेखन स्पर्धा मे-जून :-२०२६

विषय - रहस्य कथा

शीर्षक:- खिडकी

"अरे त्या बंगल्यात म्हणे भूत आहे." मितेश एका दुमजली बंगल्याकडे बोट करत त्याचा मित्र सुदेशला म्हणाला.

ते दोघे त्या बंगल्याच्या जवळून चालले होते.

"चल बे, काहीही फेकू नकोस. आजच्या जगात कुठे असतो भूत! उगीच आपलं काही तरी बरळू नकोसं." त्या बंगल्याकडे एक नजर टाकत सुदेश त्याची खिल्ली उडवत हसत म्हणाला.

"अरे यार, मी खरंच सांगतोय." मितेश पटवून देण्याचा प्रयत्न करत आर्जवीने म्हणाला.

"तू काय टाकून आलास काय घरातून येताना? बेहकल्यासारखा का बोलतोय? तुला कोणी सांगितलं असं?" सुदेशने पुन्हा त्याची खिल्ली उडवत विचारले.

"अरे हा बंगला, माझ्या बाबांच्या मित्राने भाड्याने घेतला आहे. मी त्यांना परवा दिवशी भेटायला गेलो होतो तर ते सांगत होते की खिडकीतून एक भूत डोकावून त्यांना पाहत होता म्हणे. मलाही आधी खरं वाटलं नव्हतं. म्हणून मी काल तिथे थांबलो होतो खरंच भूत आहे का ते पाहायला? आणि रात्री बारानंतर त्यांच्या खिडकीच्या बाहेर एक आक्राळ विक्राळ, भयंकर चेहरा मलाही दिसला. जाम फाटली होती राव माझी! रात्रभर झोपलो नाही मी. जसा दिवस उजाडला तसं तेथून धूम ठोकली यार मी!" मितेश घाबरलेल्या सुरात चेहरा कसानुसा करून म्हणाला.

त्याच्या चेहऱ्यावरचा उडालेला रंग पाहून सुदेश मात्र खळखळून हसू लागला.

"गप रे, मित्या. तुम्हाला भास झाला असेल. भूत वगैरे काही नसतं? तू तर फट्टू निघालास." सुदेश पुन्हा हसत म्हणाला.

त्याच्या बोलण्यावर त्याला जराही विश्वास नव्हता. मुळात भूत असतो अशा गोष्टींवर त्याचा विश्वास नव्हता.

"हस बेट्या तू! पण जेव्हा तुला त्या भुताचं दर्शन होईल ना, तुझं हेच हसू क्षणात गायब होईल, मी चॅलेंजने सांगू शकतो." मितेशला त्याचा हसण्याचा रागच आला होता. पण राग आवरत तो त्याला म्हणाला.

"अस्सं!" सुदेश एक भुवई उंचावत म्हणाला,"चल घेतलं तुझं चॅलेंज! मी सिद्ध करून दाखवेन की तिथे भूत नाही म्हणून. मग सांग काय चॅलेंज लावणार?"

"आधी सिद्ध कर. मग बघू." मितेश त्याला चॅलेंज देत म्हणाला.

सुदेशने त्याचे चॅलेंज स्वीकारले आणि सुट्टीच्या आधीच्या रात्री म्हणजे शनिवारी रात्री अकरा नंतर त्या बंगल्यात भेटायचे ठरवले. तत्पूर्वी मितेशने त्या बंगल्यात भाड्याने राहणाऱ्या लोकेश काकांना ते दोघे येणार असल्याचे कळवले.

त्या आधी सुदेशने त्याच्या एका पोलीस आणि डिटेक्टिव्ह मित्रां मार्फत त्या बंगल्या विषयी माहिती काढली तेव्हा त्याला कळले की त्या बंगल्याचा मालक ज्योतीचंद अग्रवाल हिऱ्यांचे प्रसिद्ध व्यापाऱ्याचा काही महिन्यांपूर्वी त्यांचा रहस्यमय खून झाला होता. त्यांची एक पुतणी शलाका सोडली तर जवळचे असे त्यांचे कोणीही नातेवाईक नव्हते. ते खूपच कंजूस, विक्षिप्त, शिष्ट स्वभावाचे होते. म्हणून फारसे कोणीही त्यांच्याकडे येत-जात नसतं.

शलाकाचे लग्न लहान वयात झाले होते. ती गेले पाच वर्षांपासून त्यांच्यासोबत राहत होती.

पुरावे सापडले नसल्याने त्यांचा खून कसा झाला हे पोलीस तपासात निष्पन्न झाले नाही. तेव्हा पोलिसांनी एका डिटेक्टिव्हची मदत घ्यायची ठरवले होते. तो डिटेक्टिव्ह ओजस हा सुदेशचा चांगला मित्र होता.

खून झाल्यानंतर काही दिवसांनी शलाकाला त्या बंगल्यात एकटीला राहायला भीती वाटू लागल्याने ती ज्योतीचंदचा वकील मित्र परेश यांच्या घरी राहत होती. मग तिला काही आर्थिक मदत मिळावी म्हणून परेश यांनी तो बंगला लोकेश यांना भाड्याने दिला होता.

मुळात लोकेश सधन होते. त्यांचा मुलगा त्यांची संपत्ती त्याच्या नावावर करून देण्यासाठी त्यांच्या मागे लागला होता. त्यासाठी त्यांच्या जीवावरही उठला होता. त्या धक्क्याने त्यांना हार्ट ॲटॅक येऊन गेला. त्या नंतर ते बरे झाल्यावर या बंगल्यात येऊन राहिले होते.

जेव्हा पहिल्यांदा त्यांना खिडकीतून तो चेहरा दिसला होता तेव्हा ते खूप घाबरले होते. पण त्यांच्या मुलाने हे त्यांना घाबरवण्यासाठी केले असेल असे वाटले. म्हणून ते निडर होऊन तिथे राहत होते. त्यांना भेटायला आलेल्या काही लोकांनाही ते भूत दिसले होते, ज्यात मितेशही होता.

ते भूत कदाचित ज्योतीचंद यांचा प्रेतात्मा असावा असे लोकांचे म्हणणे होते. कारण अजूनही त्यांचा खून कोणी व का केला असेल हे कळले नव्हते. त्यामुळे त्यांची आत्मा भटकत आहे, असे लोक कुजबुजत होते.

खिडकी पंधरा-वीस फुट अंतरावर होती. विशेष म्हणजे तिथे वरती जाणारा कोणताही मार्ग नव्हता. मग एवढ्या उंचीवर माणूस चढून कसा भीती दाखवेल? हा प्रश्न होता. सामान्य माणसाचे हे काम नाही. ते भूतच करू शकतो, ही गोष्ट खरी वाटू लागली.

अग्रवाल यांच्या खूनानंतर शलाकाची कसून चौकशी केल्यावर तिने सांगितले की ज्योतीचंद वरच्या मजल्यावर एकटेच राहत होते. त्यांच्या व्यापाराबद्दल तिला काहीच माहिती नव्हती. तिच्या आईवडिलांच्या मृत्यूनंतर त्यांनी तिला सांभाळले पण नंतर लहान वयात तिचे लग्न लावून दिले. पण लग्नानंतर काही दिवसांतच तिचे सासू- सासरे वारले. नवरा काम शोधायला जो गेला तो परत आलाच नाही. म्हणून त्यांनी परत तिला आपल्याकडे ठेवून घेतले. कामाव्यतिरिक्त ते तिला रूममध्ये येऊ देत नव्हते. खून झाला त्या दिवशी तिला कसालाही आवाज आला नाही. ती दिसायला ठीकठाक आणि साधी-भोळी वाटली.

पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार त्यांचा खून त्यांच्याकडे असणाऱ्या हिऱ्यांसाठी झाला असावा. पण चोरी झाल्याचा कोणताही पुरावा मिळाला नव्हता. पोस्टमार्टम रिपोर्ट नुसार गळा आवळून खून झाला होता हे कळले होते; पण गळ्यावर खून्याचे बोटांची ठसे दिसत नव्हते. त्यामुळे पोलीसही बुचकळ्यात पडले होते.

ठरल्याप्रमाणे सुदेश आणि मितेश शनिवारी रात्री अकरा नंतर त्या बंगल्यात आले. तत्पूर्वी लोकेश यांना दोन दिवस दुसरीकडे राहायला पाठवले. जेणेकरून तो बंगला रिकामा आहे असा भास निर्माण करून खून्यापर्यंत पोहोचता येईल असा शिंदे आणि ओजस यांनी खुन्याला पकडण्यासाठी सापळा रचला होता.

ते चौघेही दबा धरून तिथे बसले होते.  साधारण रात्री साडे अकरा नंतर त्यांना ठकठक असा आवाज आला. बंगला थोडा शहरापासून दूर असल्याने सुमसाम शांततेने सगळे काही ऐकू येत होते. बंगल्यातल्या सगळ्या लाईट बंद केल्या होत्या.

आधी खिडकीतून एक विचित्र, भयानक असा मास्क घातलेला चेहरा डोकावला. एकदम पाहिले तर माणूस घाबरूनच जाईल असा. तो चेहरा पाहून मितेश घाबरला ; पण सुदेश बाकी असल्याने तो जरा सावरला.

त्या चेहऱ्याने खिडकीतून आत कोणी नसल्याची खात्री करून घेतली आणि कानोसा घेत तो खिडकीतून आत आला. त्याने आधीच त्या खिडकीचे गज काढून ठेवल्याचे जाणवले. कारण तो अगदी सराईतपणे ते गज काढून आत आला.

त्याने भिंतीवर टाॅर्च मारून भिंत चाचपडायला सुरूवात केली. एके ठिकाणी त्याला काही तरी हाताशी लागले. सोबत आणलेल्या वस्तूने तो भिंत खरवडू लागला. थोड्याच वेळात त्याच्या हातात एक चमचमणारी वस्तू मिळाली, जो की हिरा होता.

सुदेश आणि मितेश दोघेही आवाक होऊन पाहत होते. ओजसने इन्स्पेक्टर शिंदे यांना आधीच याची कल्पना दिल्याने ते अजून काय करतो हे पाहत होते. अजून एक दोन हिरे काढल्यावर मात्र ओजसने शिंदेना इशारा केला तसे ते लगेच त्याच्या दिशेने धाव घेतली. सुदेशने रूममध्ये लाईट लावल्याने लख्ख प्रकाश पडला. त्यामुळे तो चोर हडबडून पळ काढणार तोच शिंदेंनी त्याला धरले.

जेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा मास्क काढला गेला तेव्हा त्याचा चेहरा पाहून सगळे अवाक झाले. तो दुसरा कोणी नसून शलाकाचा नवरा विक्रम म्हणजेच काही दिवसांपूर्वी मितेश आणि सुदेश यांना क्लबमध्ये भेटलेला धीरज होता.

पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने मान्यच केले नाही. जेव्हा इन्स्पेक्टर शिंदे यांनी त्याचा यथेच्छ पोलिसी पाहुणचार केला तेव्हा तो पोपटासारखा बोलायला लागला.

विक्रम उर्फ धीरज हा सर्कशीत काम करत होता. लग्न झाल्यावर त्याने सुरवातीला शलाकाशी गोड बोलून ज्योतीचंदकडून पैसे वसूल केले. ते कंजूस असला तरी पुतणीला मुलगी मानत होता. त्यामुळे सुरुवातीला त्यांनी तिला पैसे दिले. नंतर त्याचे मनसुबे लक्षात आल्यावर त्यांनी पैसे देणे बंद केले. मग विक्रमने कामधंद्याच्या शोधात सर्कसची टीम गाठली.

घरी काही न सांगता गेल्याने काही दिवस वाट बघून शलाकाला ज्योतीचंद आपल्याकडे घेऊन आले.

सर्कशीमध्ये विक्रम बरेच खेळ शिकला. त्यात तो दोन बांबूवर चालायला शिकला होता. त्याच्याच वापर त्याने खिडकी चढण्यासाठी केला होता.

तब्बल पाच वर्षांनंतर तो या शहरात सर्कस करण्यासाठी आला होता. त्यावेळी सर्कस पाहण्यासाठी शलाकाही आली होती. तिथे त्यांची भेट झाली. पतीप्रेम आणि पती सुखाला आसुसलेली शलाका त्याला पाहून मनात खूप सुखावली होती. दोघेही रोज चोरून  भेटू लागली. त्याने गोड बोलून ज्योतीचंदची सगळी माहिती काढून घेतली.

एके दिवशी त्याने सगळं काही चोरून तिला घेऊन जाण्याच बोलला. सुरूवातीला तिने नकार दिला. पण पतीप्रेम उफाळून आले. ती तयार झाली. त्याने तिला सगळा प्लॅन सांगितला.

ठरल्याप्रमाणे तो त्या दिवशी रात्री तिकडे गेला. रूममध्ये ज्योतीचंद गाढ झोपले होते. त्याने तिजोरी उघडली पण त्यात हिरे नव्हते फक्त काही रक्कम होती. त्याला हिरे हवे असल्याने त्या रकमेला काही हात लावला नाही.

ज्योतीचंद खूप अवलिया होते. त्यांनी हिरे भिंतीत छिद्रे पाडून त्यात लपवले होते. त्यामुळे त्याला ते सापडले नव्हते.

पण विक्रमच्या आवाजाने त्यांना जाग आली. ते ओरडण्या आधीच घाबरून त्याने त्यांचा गळा आवळल्याने त्यांचा मृत्यू झाला. हे सर्व पाहून शलाका खूप घाबरली होती.

ती जर गप्प राहिली तरच तो तिला सोबत घेऊन जाईल, नाहीतर तिला तो कधीच नेणार नाही अशी त्याने धमकी दिल्याने ती गप्प राहिली.

त्याने तिला रूमबाहेर पाठवले आणि आतून दार लावून घेतले. ज्योतीचंदच्या गळ्यावरील व तिजोरीवरील त्याचे बोटांचे ठसे रूमालाने पुसून टाकून तो खिडकीचे गज काढून तेथून पसार झाला.

नंतर क्लबमध्ये त्याची भेट मितेश आणि सुदेश यांच्याशी झाली. गोड बोलून त्याने मैत्री वाढवली. तो बऱ्याचदा त्या बंगल्यात त्याच्यासोबत यायचा तेव्हा रूममधला प्रत्येक कोपरा तो न्याहळून पाहायचा. अखेर त्याला कळले की हिरे कोठे आहेत. मग त्याने मास्क वापरून लोकेश यांना भीती घालून घाबरवण्याचा प्रयत्न केला. जेणेकरून ते घाबरून तो बंगला सोडून जातील म्हणजे तो आरामात हिरे घेऊ शकेल. पण ओजस आणि शिंदेंनी त्याचा डाव उलटून लावला.

अखेर खिडकीतील भुताच्या रहस्यावरचा पडदा उठला.

समाप्त:-

खुनी कितीही चालाख असला तरी एक धागा त्याला अडकवू शकतो.

©️ जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →