Login

खेळ नशिबाचा भाग 4

About Life

"कल्पना, अमेयच्या मित्राचा फोन आला होता. अमृताच्या तब्येतीविषयी विचारत होता. तेव्हा त्याच्याकडून कळले की,अमेयने खूप जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते व ते सर्व पैसे त्याने एका कंपनीत गुंतवले होते. पण ती कंपनी फ्रॉड निघाली. अमेयचे सर्व पैसे बुडाले. यामुळे त्याला खूप टेन्शन आले आणि त्यातच त्याने आत्महत्या केली. पोलीस तपासात हे सर्व समजले.

या गोष्टीसाठी अमेय असे काही करेल. असे त्याच्या वागण्याबोलण्यातून मला कधी जाणवले नाही. जीवनाकडे नेहमी सकारात्मक दृष्टीने पाहणारा, आपल्या छान अशा लिखाणातून इतरांना प्रेरणा देणारा, नेहमी हसतमुख असणारा व इतरांना आनंद देणारा अमेय असा चुकीचा निर्णय कसा घेऊ शकतो? या विचाराने माझे डोके सुन्न झाले आहे."

अमृताचे वडील कल्पनाताईंना म्हणाले.

"आजकालच्या मुलांना पैसा, प्रसिद्धी, आनंद या सर्व गोष्टी खूप पटकन हव्या असतात. त्यांच्यात धीर हा कधी नसतोच. अमेयला चांगली नोकरी होती. वडिलांचा व्यवसाय होता. सर्व व्यवस्थित असताना कर्ज काढून कंपनीत पैसे गुंतवणे याची काय गरज होती? आणि असे काही करण्यापूर्वी निदान त्याच्या आई-वडिलांशी, तुमच्याशी किंवा अजून कोणाशी बोलायला हवे होते ना! त्या कंपनीविषयी माहिती काढली असती.
ती कंपनी फ्रॉड निघाली. पैसे बुडाले. यात आपली चूक झाली असे समजून पुन्हा अशी चूक केली नसती. प्रत्येकाच्या आयुष्यात यश अपयश येतच असते. पण जीवन जगावेच लागते. अपयश आले म्हणून आत्महत्या का करावी? लोनचे पैसे परत करता आले असते, पैसे कमवता आले असते. अजून खूप आयुष्य होते पुढे. कोणाशी काही बोलला असता तर काहीतरी मार्ग निघाला असता. पण आता गेलेला जीव परत येईल का? पैशासाठी जीव का दिला? जगाला शहाणपण शिकवणारा अमेय मूर्खासारखा का वागला? काही समजत नाही."

कल्पनाताई रडत रडत म्हणाल्या.


"लवकर पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात लोक नको त्या ठिकाणी पैसे गुंतवतात. जुगार, लॉटरी व वेगवेगळ्या स्कीम्स या सर्व गोष्टी म्हणजे नशीबाचा खेळच असतो. एकदा पैसे मिळाले म्हणून पुन्हा पुन्हा मिळतीलच असे नाही. एकदा नशीब साथ देईल म्हणून पुन्हा पुन्हा देईलच. असे कशावरून? या गोष्टींचे व्यसन खूप वाईट असते. या व्यसनामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे.
पैशाचा, नशीबाचा हा खेळ खेळत असताना जीवनाचा खेळ कधी संपतो. हे ही कळत नाही. आणि कळते तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

कष्टाने हळूहळू पैसा कमवता येतो पण तो शेवटपर्यंत टिकतो आणि वाईट मार्गाने पैसा लवकर येतो पण जातोही तितक्याच लवकर.

आजकाल शॉर्टकटचा जमाना आला आहे. सर्व काही कमी वेळात हवे असते. त्याचेच हे सर्व परिणाम आहेत. अमेय खूप महत्त्वकांक्षी होता. मेहनती व हुशार होता पण लवकर सर्व काही मिळविण्याच्या प्रयत्नात त्याने चूक केली आणि ती सुधारण्याऐवजी आत्महत्या करून दुसरी चूक केली."

अमृताचे वडील हताशपणे म्हणाले.

क्रमश:
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all