Login

खेळ नशिबाचा भाग 2

About Life

"कल्पना, आयुष्य म्हणजे नशिबाचा खेळ असतो गं. नियतीने टाकलेला डावच असतो. आयुष्यात आपण अनेक गोष्टी ठरवतो आणि त्या दिशेने प्रयत्नही करत असतो; पण प्रत्येक वेळी आपण ठरवतो तसेच होईल असे नाही. आपण ठरवतो त्यापेक्षा काही वेगळेही घडत असते आणि मग तेव्हा आपण फक्त एकमेकांना दोष देत राहतो. आपण एकमेकांना दोष देण्यात आयुष्य जगत असतो आणि नियती आपले काम करत राहते."

अमृताचे वडील थकलेल्या मनाने आपल्या पत्नीला म्हणाले.

"तुमचे म्हणणे खरे आहे पण अमृताचे आई-वडील म्हणून आपल्याला आता तिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे. शारीरिक दृष्ट्या जरी ती लवकर बरी होईल पण मानसिक दृष्ट्या सावरायला तिला खूप वेळ लागणार आहे. अमेयच्या आठवणीने ती खूप दुःखी राहणार. मला तर खूप टेन्शन आले आहे. कसे होईल पुढे सर्व?"

कल्पनाताई म्हणाल्या.

"जे झाले ते खरंच खूप वाईट झाले पण तू टेन्शन घेऊ नकोस. आपल्याला अमृताला सांभाळायचे आहे. त्यासाठी आपल्याला आपल्या भावनांना आवर घालावाच लागणार आहे. तिच्यासमोर असे निराश व हतबल होऊन चालणार नाही. आपल्याला तिला आधार द्यायचा आहे."

अमृताचे वडील म्हणाले.

"अमेयने आत्महत्या का केली? याचे काय कारण असेल? तो तर नेहमी हसतमुख व टेन्शन फ्री असायचा. सर्वांशी छान मिळून मिसळून राहायचा. त्याला चांगली नोकरीही होती. घरातले तर काही टेन्शन नव्हतेच. वडिलांचा चांगला व्यवसाय होता. लहान भाऊचे शिक्षण सुरू होते. आई वडील स्वभावने चांगले होते. सर्व काही चांगलं असताना अमेयने एवढे टोकाचे पाऊल का उचलले असेल? या प्रकरणात पोलीस आपल्या अमृताकडे चौकशी करतील ना?"

कल्पनाताईंनी मनातील शंका विचारल्या.

"अजून तरी काही कळले नाही काय कारण आहे आत्महत्येचे. सर्व काही चांगले असताना अमेयने असे का केले? या प्रश्नाचे उत्तर खूप विचार करूनही मला मिळत नाही. अमृताला काही माहित नसेल असे मला वाटते, नाहीतर ती आपल्याला बोलली असती याबाबती काही. पोलिसांनी अमृताकडे काही विचारपूस केली तर करू दे ना. तिला जे काही माहित असेल ते ती त्यांना सांगेल आणि आपण आहोत ना तिच्या मदतीला काही झाले तर. काही घाबरण्याचे कारण नाही. तू काही काळजी करू नको. अमृताची तब्येत चांगली होऊन ती घरी आली की, थोडे दिवस तू आणि ती तुझ्या बहिणीकडे जाऊन या. हवा पालटही होईल आणि थोडा चेंज वाटेल तिला. थोडेसे मनही रमेल तिचे इतर गोष्टीत."

अमृताचे वडील कल्पनाताईंना धीर देत म्हणाले.


क्रमश:
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all