खरा आरसा

Na

घरातील सगळ्यांचे आवडते वाक्य एकच होते, "आमच्या सासूबाईंच्या मते सून ही मुलगीच असते!"
पण या वाक्याची खरी परीक्षा तेव्हा झाली, जेव्हा मयुरी गरोदर राहिली. सुरुवातीचे तीन महिने मळमळ आणि थकव्यात गेले. मयुरीची आई दूरच्या गावाहून धावत आली. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत मयुरीच्या आईचे पाय जमिनीवर टेकत नव्हते. कधी ताजं मेथीचं सूप, कधी पौष्टिक लाडू, तर कधी मयुरीच्या पाठीवरून फिरणारा मायेचा हात. "बाळा, तू फक्त विश्रांती घे," हे आईचं वाक्य मयुरीला रोज नवी ताकद द्यायचं.
पण चौथा महिना लागला आणि अचानक एक नाट्य घडले. सासूबाईंच्या स्वतःच्या मुलीला (नणंदेला) अचानक वाटले की तिला तिच्या शहरातल्या नवीन घरी शिफ्ट व्हायला आईची गरज आहे. सासूबाईंनी एका रात्रीत बॅग भरली. मयुरीच्या आईला म्हणाल्या, "विहीणबाई, तुम्ही आहातच ना इथे? माझी मुलगी तिकडे एकटी पडेल, तिला माझी गरज आहे. मयुरी तर माझी मुलगीच आहे, तिला तुम्ही सांभाळालच."
असे म्हणत सासूबाई निघून गेल्या. चौथा, पाचवा, सहावा, सातवा आणि अगदी आठवा महिना उजाडला! या पाच महिन्यांत सासूबाईंनी स्वतःच्या मुलीचे संसार थाटण्यात वेळ घालवला. मयुरीच्या फोनवर त्या नेहमी म्हणायच्या, "मयुरी, मला तिकडे यावंसं वाटतंय गं, पण काय करू? मुलगी शेवटी मुलगी असते, तिच्यासाठी धावपळ करावीच लागते."
या सर्व काळात मयुरीच्या आईने स्वतःच्या शरीराची पर्वा न करता, दिवस-रात्र एक करून मयुरीची काळजी घेतली. आठव्या महिन्याच्या शेवटी, जेव्हा बाळंतपणाचे दिवस जवळ आले, तेव्हा सासूबाई अचानक हसत-हसत परत आल्या.
घरात पाऊल ठेवताच त्या मयुरीच्या आईला म्हणाल्या, "विहीणबाई, खूप आभार हं! आता तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता. शेवटी ही माझी मुलगीच आहे, पुढचे सगळे मी बघेन."
मयुरी शांतपणे उठली. तिने सासूबाईंना पाण्याचा ग्लास दिला आणि अत्यंत नम्र, मऊ आवाजात म्हणाली, "आई, तुम्ही आल्याबद्दल खूप धन्यवाद. पण तुम्ही ना यापुढे मला कधीही 'मुलगी' म्हणू नका आणि तसा दावाही करू नका."
सासूबाई एकदम थबकल्या. मयुरीने तिच्या आईचा हात हातात घेतला आणि हळुवारपणे पुढे म्हणाली, "चौथ्या ते आठव्या महिन्यापर्यंत जेव्हा मला तुमची खरी गरज होती, तेव्हा तुम्ही तुमच्या 'खऱ्या मुलीकडे' होतात. कारण संकटात किंवा गरजेच्या वेळी आठवते ती 'मुलगी' असते. माझी आई स्वतःचे सगळे सोडून पाच महिने इथे माझी काळजी घेत राहिली, कारण मी तिची मुलगी होते. मी तुमची खूप आदरणीय 'सून' आहे, आणि सून म्हणूनच मला राहू द्या. मुलीचा दर्जा देऊन पुन्हा मला 'एकटं' पाडण्याची संधी नका देऊ."
मयुरीच्या आवाजात कटुता नव्हती, फक्त एक स्पष्ट आणि शांत सत्य होते. तिच्या शब्दांत इतकी नम्रता होती की सासूबाईंना रागहीवता आला नाही, पण स्वतःच्या चुकीची जाणीव मात्र नक्की झाली. त्या दिवशीनंतर सासूबाईंनी कधीही 'सूनेला मुलगी मानण्याचा' खोटा दावा केला नाही.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →