Login

कथा : माऊली !

.
ईरा शॉर्ट फिल्म लेखन स्पर्धा जुलै 2026

कथा : माऊली !


" आ.." ती इशारा करत पैसे मागू लागली.
ती जन्मतः मूकबधिर. शर्ट घालून आणि दोन वेण्या बांधून ती आळंदीला राहायची.
आई तिच्या भावाला जन्म देऊन मरण पावली.
वडिलांना तिच्याच काकांनी जमिनीसाठी ठार केले.
ती आपल्या लहान भावाला घेऊन आळंदीला पळून आली. नवीन आयुष्य सुरू करण्यासाठी. तिला जमिनीचा मोह नव्हता. फक्त आपल्या लहान बाळाला जगवायचे होते , वाढवायचे होते.
आईवडील विठ्ठल भक्त होते.
आईवडिलांकडून जमीन जुमला, दागदागिने मिळाले नसले तरी भक्तीचा वारसा मिळाला होता.
पुरूष असूनही भक्तांची " माऊली " बनलेला विठ्ठल हा देव तसा निराळाच !
ती फार फार तर " मा " इतकंच उच्चारायची.
आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्यातच तिने आई गमावली होती.
रक्ताने माखलेल्या वडिलांना पाहिले होते.
शेतीसाठी निर्दोष भावाची हत्या करणारे स्वार्थी काका बघितले होते.
एवढे वाईट अनुभव येऊनही तिची माऊलीवरची श्रद्धा तसूभरही कमी झाली नव्हती.
आता विठ्ठलच तिचा आईबाप होता.
साक्षात ज्ञानेश्वरमाऊलीच्या नशिबी कमी कष्ट आले होते का ?
असे म्हणत ती स्वतःलाच समजवायची.
तिची विठ्ठलाकडे कोणतीच तक्रार नव्हती.
ती तिच्या भावाला आईची माया लावायची.
आळंदीत तिची छोटीशी झोपडी होती. शेजारच्या एका काकूंकडे लहान भावाला सोडून जायची. ती बिचारी निपुत्रिक होती. म्हणून लहान भावाला मुलासमान सांभाळायची. रात्री नवरा दारू पिऊन यायचा. त्याला दुसऱ्याचे लेकरू सांभाळणे आवडत नव्हते.
म्हणून संध्याकाळी नवरा येण्याआधीच ती लहान भावाला हिच्याकडे सुपूर्द करायची.
ही दिवसभर फुले, नारळ, तुळशीमाळा व इतर साहित्य विकणे या कामात गुंग असायची.
येणाऱ्या जाणाऱ्या भक्तांना जमेल तशी मदत करायची.
आज मंदिरात भलतीच गर्दी होती. सलग तीन दिवस सार्वजनिक सुट्ट्या आल्या होत्या. म्हणून बरेच जण माऊलीच्या दर्शनासाठी आले होते. यात चार कॉलेजमध्ये जाणारे टवाळखोर तरुणही आले होते.
" यार , जाम बोर होतंय या लाईनीत." एकजण म्हणाला.
" अरे एकदा व्लॉग शूट होऊ दे. मग रात्री पार्टी करू. मी तर कुठं मोठा भक्त आहे ? पण आषाढी एकादशी येणारे. देहू-आळंदीचा व्लॉग आला की व्युज मिळतील." दुसरा म्हणाला.
" हम्म. बनव बनव. पण तिकडं बघ. माल चाललाय." तिसरा तरूण डोळे मिचकावत म्हणाला.
" ये तो गुंगी गुढीया है. लेडी बर्फी." चौथा मस्करीच्या स्वरात म्हणाला.
" चल ना. तिच्याकडून थोडं सामान घेऊ. "
" चला. तेवढाच टाईमपास."
सर्वजण तिच्याकडे फुले विकत घ्यायला गेले. ती किंमत सांगू लागली. स्वतः मूकबधिर असल्यामुळे ग्राहकांना व्यवहार समजण्यात काही अडचण येऊ नये असाच तिचा प्रयत्न असायचा.
तिच्यासाठी ग्राहक देवासमान असले तरी प्रत्येक ग्राहक देव नसतो, तर काही राक्षसही असतात.
ती टवाळखोर मुले तिची छेड काढू लागले.
तिला घाणेरडे स्पर्श करू लागले.
एकाने तिचा हात पकडला.
ती ओरडत होती. "पैसे नको ,जाऊदे मला" अश्या विनवण्या करत होती.
" दा..दा.." महत्प्रयासाने ती किंचाळली.
टवाळखोर मुले हसू लागली. ती मूकबधिर असली तरी एक स्त्री होती. शेवटी तिच्या संयमाचा अंत झाला आणि तिने एकाच्या थोबाडीत मारली.
" तुझी हिंमत कशी झाली मला मारायची ?" तो तरुण ओरडला.
सुदैवाने लोक जमले. सर्वाना ती परिचयाची असल्याने सर्वांनी तिचीच बाजू घेतली. पोलीस आले. थोड्या वेळाने प्रकरण मिटले. ती तरुण मुले तिथून निघून गेले. तिला वाटत होते घरी जावे. पण पोटापाण्यासाठी काम करणे गरजेचे होते. दिवसभर कष्ट केल्यावरच रात्री भावाला खायला भाकरी मिळणार होती. म्हणून नेत्रातील आसवे पुसून ती पुन्हा कामाला लागली. रात्री थकून घरी जाताना कुणीतरी नाकावर रुमाल ठेवून तिला बेशुद्ध केले. गावाच्या एका अंधारलेल्या कोपऱ्यात तिला जाग आली. सकाळी छेडखानी करणारे तरुण दारू पीत होते.
" उठली बघ आयटम." एकजण म्हणाला.
" आज मस्ती उतरवू हिची." दुसरा अश्लील नजरेने तिच्याकडे पाहत म्हणाला.
ते तरुण त्या मुलीच्या दिशेने येऊ लागले. ती पळणार इतक्यात दोघांनी तिचे हात पकडले. तिने हातपाय जोडले, विनवण्या केल्या, पळून जाण्याचा प्रयत्न केला पण व्यर्थ. तिला तिच्या भावाची आठवण आली.
" भावाला शेजारच्या काकूंनी घरी सोडले असेल. कारण तिच्या दारुड्या नवऱ्याने दोघांना एकत्र बघितलं तर तो मारहाण करतो. माझा भाऊ रडत असेल. भुकेने व्याकुळ होत असेल. आईवडीलांनी दिलेली एकमेव जबाबदारी निभावू शकली नाही मी. " तिच्या मनात विचारांचे काहूर माजले.
समोर संकट उभे होते. तिने माऊलीकडे धावा केला. ते तरुण जवळ येणार इतक्यात तिथे काठी आपटल्याचा आवाज आला. त्या तरुणांनी वळून पाहिले तर एक वृद्ध व्यक्ती तिथं आला होता. त्या अंधारातही तो वृद्ध इसम उजेडून दिसत होता. तरुणांनी धरलेले हात झटकून ती बिचारी आशेने त्या वृद्ध व्यक्तीच्या मागे जाऊन बसली.
" काय चाललंय ?" त्या वृद्ध व्यक्तीने विचारले.
" ए म्हाताऱ्या. निघ इथून. " एकजण म्हणाला.
" आरं लेका स्त्रियांचा आदर करावं. नाही तर महाभारत घडतंय बघ."
" तू नको शिकवू. निघ इथून."
त्या तरूणांना आसमंतात एक दिव्य तेजस्वी स्वर्णरंगाचे सुदर्शन चक्र दिसू लागले. ते चक्र त्या तरुणांच्या दिशेने वेगाने जाऊ लागले. ती टवाळखोर मुले घाबरली. जीवाच्या आकांताने तिथून पळून गेली. तिचा जीव भांड्यात पडला. ते तरुण का पळून गेली तिला कळले नाही. पण तिच्यासाठी तो वृद्ध इसम द्रौपदीचे रक्षण करणारा श्रीकृष्णच होता.
" पोरी, मी सोडतो तुला घरापर्यंत. घाबरायचं नाही. मी कायम सोबत हाय तुझ्या."
तिने त्या वृद्ध माणसाचे चरणस्पर्श केले. दोघेही घराजवळ आले.
" मुली, हा अबीरबुक्का गळ्याला लाव." तो एक पुडी तिला देत म्हणाला.
तिने होकारार्थी मान हलवली.
ती धावत शेजारच्या काकूंकडे गेली.
" अग तुझी मावशी रखमा आली होती. तीच तुझ्या भावाला घेऊन गेली. दिसायला खूप सुंदर आहे बघ तुझी मावशी. पायगुण असा की माझा सुधारला. दारू सोडली आणि मीही आई होणारे. लग्नानंतर इतक्या वर्षांनी मला दिवस गेले. " शेजारच्या काकू आनंदाने म्हणाल्या.
तिही सुखावली. परंतु भावाचे विचार डोक्यात येऊ लागले. ती पुन्हा विचारात पडली. धावत आपल्या झोपडीकडे गेली. कुणीतरी आधीच स्वयंपाक केला होता. भाऊ निवांतपणे झोपी गेला होता. त्याला कुणीतरी आधीच जेवण भरवले होते. भावाला सुरक्षित पाहून तिची काळजी मिटली. तिने आजूबाजूला खूप शोध घेतला. पण भावाची काळजी कुणी घेतली याचा पत्ता लागला नाही. संकटातून वाचणारा तो वृद्ध इसमही गवसला नाही.
***
" केले बघा तुमचे काम. घास भरवून आणि निजवून आले तिच्या लहानग्या भावाला." देवी रुक्मिणी म्हणाली.
" माझी अर्धांगिनी शोभता तुम्ही देवी रुक्मिणी." श्रीकृष्ण म्हणाले.
" का इतका जीव लावता भक्तांवर ?"
" ईश्वर आपल्या भक्तांवर जीव लावणार नाही मग कुणावर लावणार ? भक्तच ईश्वराला "ईश्वर" बनवतात. आणि माझे साधे-भोळे भक्त तर मला "माऊली" म्हणून हाक मारतात. मग आईची कर्तव्ये पूर्ण करायला नको ? फक्त माझ्या एका दर्शनाला व्याकुळ असतात ती. त्यांना माझ्याकडून धन नको, समृद्धी नको. नामस्मरण करत पायी चालत येतात मला भेटायला. माझ्यामुळे त्यांचे अस्तित्व नाही, त्यांच्यामुळे माझे अस्तित्व आहे देवी वैदर्भी. "
***
तिचे लक्ष झोपडीत असलेल्या छोट्यासा विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीकडे गेले. तिच्या नेत्रातून अश्रू वाहू लागले. तिने तो अबीर बुक्का गळ्याला लावला. तिच्या कंठातून एक स्वर फुटला ,

" माऊली !"

©® पार्थ धवन


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →