ईरा शॉर्ट फिल्म लेखन स्पर्धा जुलै 2026 !
कथा : काळ !
दुपारचा प्रहर होता. कॉफी शॉपमध्ये एक लहान मुलगा रडत होता. जवळपास सात वर्षांचा असावा. यश त्याच्यापाशी गेला. यश पंचवीस वर्षांचा एक तरुण होता. यशने त्या लहान मुलाला जवळ घेतले. त्या लहान मुलाचा मुखचंद्रमा यशच्या लहानपणीच्या चेहऱ्याशी मिळताजुळता होता.
" नाव काय तुझे?" यशने विचारले.
" यश पवार." तो लहान मुलगा हुंदके देत म्हणाला.
" माझेही नाव यश पवार आहे. तू का रडतोय?"
" माझी एक बेस्ट फ्रेंड पूजा मला सोडून गेली. तिच्या पप्पांना दुसरीकडे जॉब लागला. "
यश हसला. त्याला समजायचे ते समजले. तो लहान मुलगा यशचेच लहानपणीचे प्रतिबिंब होता.
" अरे हा. पूजा पाटील ना ?"
" हा."
" मोबाईल असेल ना तिच्याकडे. तुम्ही टचमध्ये राहू शकता."
" तिचे पप्पा स्ट्रिक्ट आहेत. मोबाईल वापरू देत नाहीत तिला."
" हम्म. एक सिक्रेट सांगू का?"
" काय?"
" मी तुझ्या फ्युचरमधून आलोय. मला तुझं फ्युचर माहिती आहे."
" मग मला सांगा की माझी आणि पुजाची भेट कधी होईल?"
यशला वाईट वाटले.
" कधीच नाही."
त्या लहान मुलाचा चेहरा पडला.
" पण तुझ्या आयुष्यात अजून नवीन फ्रेंड्स येणारे. जे तुझे क्लोज फ्रेंड्स बनतील. गौरव, प्रशांत आणि वैष्णवी."
" खरच? पण मला पुजाच पाहिजे."
" हे सर्वजण पुजापेक्षा बेटर आहेत, स्मार्ट आहेत. तू पूजाला विसरून जाशील."
" ठिके. तुम्ही का रडत होते? मी मघाशी बघितले तुम्हाला?"
" हम्म. माझं ब्रेकअप झाले आहे माझ्या गर्लफ्रेंडसोबत."
" मग तुमच्याही आयुष्यात नवीन लोक येतील ना."
" आम्हा मोठ्यांचे इतकं सोपं नसतं. तुम्हाला नवीन खेळणी द्या तुम्ही जुनी विसरून जातात. आम्ही मात्र गुंतून पडतो एकाच माणसात."
यशच्या कानावर काठी आपटल्याचा आवाज आला. तिथून एक वृद्ध व्यक्ती जात होता.
" हॅलो." तो वृद्ध व्यक्ती म्हणाला.
" हाय." यश म्हणाला.
" मी यश पवार." तो वृद्ध व्यक्ती म्हणाला
" बसा."
" बसायला नाही तर काही तर सांगायला आलोय. रडून फायदा नाही. वैदेहीची माफी मागूनही फायदा नाही. तू डोकं जरी आपटलं तरी ती परत येणार नाही. "
" हम्म."
" पण तुझ्या आयुष्यात मिताली येईल. ती तुझ्यावर मनापासून प्रेम करेल. इतकं की तू वैदेहीला विसरून जाशील. म्हणून आता दुःखात वेळ वाया घालवू नको."
" प्रत्येक ताटातूट आपल्याला नवीन काही तरी शिकवत असते नाही का. आपल्याला मानसिकदृष्ट्या खंबीर बनवत असते आणि नात्यात कोणत्या चुका टाळायचा हे शिकवत असते."
" खरंय. काळ प्रत्येक जखमेचे उत्तर आहे. जुन्या लोकांना हृदयातून काढशील तेव्हाच नवीन लोकांसाठी जागा बनेल. माझं ऐक आणि लवकरात लवकर मुव्ह ऑन कर. आज माझे ऐकशील तर उद्या आनंदात राहशील. येतो. "
ते आजोबा आणि तो लहान मुलगा अचानक अदृश्य झाले. यश झोपेतून उठला. पुन्हा पूजाला मेसेज करणार होता पण त्याने स्वतःला रोखले आणि नवीन आयुष्याला सुरुवात केली.
©® पार्थ धवन
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
