शीर्षक:- कर्तव्य
भाग:-१
"रस्त्यावरचे दिवे लागले तरी या बाईचा अजून पत्ता नाही. आता संध्याकाळचा चहा काय आम्हाला जेवण्याच्या वेळेला मिळेल काय? आणि मग जेवण कधी करायचं रात्री अकरा वाजता? आधीच डोकं भणभण करत आहे. एक कप चहा मिळेल तर शप्पथ! "डोक्याला हात लावत तोंड वाकड करत बडबडत होत्या.
तेवढ्यात वर्क फ्रॉर्म होम करणारा त्यांचा मुलगा विनोद अंग मोडत रूममधून बाहेर आला.
"काय रे विनू, किती उशीर झाला, श्वेता अजून कशी आली नाही? फोन कर बरं तिला. आमची चहाची वेळ झाली, कधी मिळणार चहा?" टिव्हीवर बातम्या ऐकणारे गोविंदराव करड्या आवाजात त्याला विचारले.
त्यांची बायको कांता त्यांच्या शेजारीच बसल्या होत्या. तो काय उत्तर देईल याची वाट पाहू लागल्या.
"आई-बाबा, तिला जरा उशीर होईल." तो सोफ्याजवळच्या खुर्चीवर बसत म्हणाला.
"का बरं?" कांतांनी लगेच रागाने विचारले.
"अगं, ती माहेरी गेली असेल. तिच्या आईला बरं नाही. त्यामुळे ऑफिस सुटल्यावर ती तिकडे जाऊन येणार आहे." तो टिव्हीकडे पाहत म्हणाला.
"काय! हे तू आता सांगतोस. आम्हाला सांगायची पद्धत नाही का? घरात सासू सासरे आहेत हे विसरली वाटतं तुझी बायको. माहेर एकाच शहरात असलं की हे असंच होणार माहिती होतं मला. काय रे का जातेय ती उठसूठ माहेरी?" कांता तनतन करू लागल्या.
"आई, तिच्या आईची शुगर वाढली होती. त्या चक्कर येऊन पडणार होत्या. नशीब तिचे बाबा, तिथे होते म्हणून. ती त्यांना बघून लगेच येईल." विनोदने स्पष्टीकरण दिले.
"हे बरं आहे, तिला माहेरी जायचे निमित्त भेटले अजून काय?" त्या बडबडत होत्या तेवढ्यात श्वेता आली. तिला आलेलं पाहून कांता शांत झाल्या
कांताचे शब्द तिच्या कानावर पडले, तिला वाईट वाटले.
"कोठे गेली होतीस, बेटा? ही का वेळ झाली का घरी येण्याची? आम्हाला तुझी काळजी वाटत होती." गोविंदराव नरमाईने तिला विचारले.
"आईकडे गेले होते, बाबा. ह्यांना सांगितले होते मी. ते आईची तब्येत अचानक..."
तिचे बोलणे मध्येच तोडत कांता तिला म्हणाल्या,"काय सारखं आईच्या घरी. एकाच शहरात माहेर असणं म्हणजे...जाऊ दे सर्व, सोड. जा पटकन चहा टाक बाई,
डोकं खूप दुखत आहे. केव्हापासून तलब लागली होती. आज चहा मिळणारच नाही असं वाटतं होतं."
डोकं खूप दुखत आहे. केव्हापासून तलब लागली होती. आज चहा मिळणारच नाही असं वाटतं होतं."
त्यांच्या बोलण्यात टोमणा स्पष्ट दिसत होता. श्वेताने फक्त विनोदकडे एक नजर टाकली आणि "हं...टाकते चहा..." एवढं बोलून ती आत जात होती तर त्या म्हणाल्या,"दिवसभराच्या भांडीही पडलीत घासून घे जरा. मला बाई या डोकेदुखीने काही सुचेना."
ती तोंड बारीक करून मान डोलावत निघून गेली.
ती नाराज झाली हे विनोदला तिच्या चेहऱ्यावरून लक्षात आलं. तोही लगबगीने तिच्या मागे गेला.
ती किचन ओट्याला पाठ टेकवून उभी होती.
"श्वेता, नाराज आहेस का? हे बघ आईबाबांचे बोलणे मनावर घेऊ नकोस. ते जुन्या विचारांचे आहेत, तुला तर ते माहिती आहे ना गं. त्यात तिचे डोक दुखत आहे ना." विनोद तिचा हात हातात घेऊन तिला समजावत म्हणाला.
"मी नाराज नाही ओ, पण त्यांनी एकदाही माझी आई कशी आहे हे विचारले नाही, याचं वाईट वाटलं. आल्याबरोबर कामाचा पाळा वाचला. मी काय फक्त मोलकरीण म्हणून राबायचे का?" ती त्याच्या हातातून हात सोडवून घेत म्हणाली आणि चहा करू लागली.
तेवढ्यात बाहेरून कांताचा आवाज आला,"श्वेता, चहात जरा आलं टाक, बाई."
"हो, टाकते." श्वेता विनोदकडे पाहत सुस्कारा टाकत म्हणाली.
"तसं काही नाही श्वेता, अशी कशी बोलतेस तू?" विनोद तिला म्हणाला.
"मग काय बोलू मी? वेळेवर चहा, नाश्ता आणि जेवण देणे एवढंच नातं आहे या घराशी माझं, नाही का?" श्वेता फ्रिजमधील दूध काढत नाराजीने म्हणाली.
"तू चुकीचे समजत आहेस, श्वेता. थोडं समजून घे ना. त्यांच्यावर जुन्या विचांराचा पगडा आहे गं. बाकी काही होऊ दे, मी तर नेहमीचं तुझ्यासोबत असेन." तो तिच्याकडे पाहत म्हणाला.
"तुम्ही सोबत असूनही काय होणार आहे हो? जाऊ द्या, तुम्ही बाहेर जा, मी चहा घेऊन येते." ती दाटत्या कंठाने म्हणाली.
तिच्या बोलण्यावर तो काहीच बोलला नाही. सुस्कारा टाकत तो बाहेर निघून गेला.
क्रमशः-
काय होईल पुढे?
