जलद लेखन स्पर्धा- फेब्रुवारी -२०२६
विषय:- खेळ नशिबाचा
शीर्षक:- कर्माचे फळ
भाग:- ५ (अंतिम)
गौरीने ते पन्नास रुपये तिच्या हातात ठेवले आणि ते दोघे रात्र झाल्याने एका मठाकडे मुक्काम करण्यासाठी आले. तर ती मुलगीही त्यांच्या मागे मागे आली.
त्यांच्या रूमच्या बाहेर उभे राहून केविलवाण्या नजरेने त्या दोघांकडे पाहू लागली.
"अहो, ती मुलगी पाहा ना, आपल्याकडे किती आशेने पाहत आहे. मी तिला घेऊन येऊ का?" तिच्यातील ममता जागी झाली. मायेने तिच्याकडे पाहत तिने गौतमला विचारले.
"वेडी आहेस का तू? ती कोण आहे, कुठली काहीच माहिती नाही. उगीच नसती झंझट मागे लागायची." पेपर चाळणारा गौतम तिला दटावत म्हणाला.
तेवढ्यात आकाशात विजा चमकून ढग गडगडू लागले. त्यामुळे ती मुलगी घाबरून अंग आकसत, गुडघे आवळून दारात बसून गौरीकडे पाहू लागली.
गौरीला आता राहवलं नाही. ती पटकन पुढे जाऊन त्या मुलीला उचलून घेऊन छातीशी कवटाळून घेतले. त्या मुलीनेही तिच्या मायेचा स्पर्श ओळखून तिला मिठी मारली.
तिला आत घेऊन येत तिचे केस सावरत गौरी तिला मांडीवर घेत म्हणाली,"अहो आपण हिला आपल्यासोबत घेऊन जाऊया."
"अगं, पण हिचे आईवडील हिला शोधत आले तर आपल्यावर आरोप करतील. नको उगीच नसते लचांड मागे." गौतम नकार देत म्हणाला.
"हिचे आईवडील असते तर ती अशी आपल्या मागे आली नसती. कदाचित विठूरायाच्या मनात हेच असेल. कोणी आले तर पाहू नंतर ; पण हिला सोबत नेणार." तिने तिचा निर्णय सांगितला.
तिच्यापुढे गौतमचे काही चालले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ते तिला घेऊन घरी आले. घरी येताना तिच्या काही कपडे घेतले.
गौरीने तिला छान न्हाऊमाखू घातले आणि केस विंचरत होती. तोच दारावर थाप ऐकू आली.
गौरीने दार उघडले तर दारात आशीषची आई होती. ती त्यांना ओळखत होती. तिने आत बोलावले पण ती आत आली नाही. ती दारात उभे राहूनच विचारले,"तू आमच्याकडे श्राद्धाचे जेवण बनवायला येशील का?"
गौरीने थोडा विचार केला आणि लगेच हसून होकार दिला. तिने होकार देताच ती निघून गेली.
गौतम सगळं ऐकत होता. ती येताच तो तिला म्हणाला,"तू होकार का दिलास? म्हणजे तिकडे जाण्यासाठी माझी ना नाही पण आजच प्रवास करून आलोय. थकली असशील ना तू! मी चाललोय बाहेर, हिला दत्तक घ्यायला काय करावं लागेल ते वकीलांना विचारून येतो. तूही चाललीस तर हिच्याकडे कोण बघणार?"
"तुम्ही नका काळजी करू. असंही तेथे जायचं होतंच मला. ताईंना विठ्ठलाचा प्रसाद आणि मूर्ती द्यायची आहे. हिला सोबत घेऊन जाईन." ती हसत म्हणाली.
बरं म्हणत तो त्या दोघींना सोडायला आला.
इकडे आशीषने रिधिमाला गोड बोलून माहेरी पाठवून दिले आणि तो श्राद्धच्या पुजेला बसला.
ब्राह्मणाने पुजा चालू केली तोच बेल वाजली. आशीषच्या आईने दार उघडले तर रिधिमाने हसून आत प्रवेश केला. तिला आलेले पाहून दोघे हडबले.
"तू तर माहेरी जाणार होतीस ना?" आशीषच्या आईने आवंढा गिळत विचारले.
"श्रेयाची एक वस्तू राहिली तेच घ्यायला आले होते." ती हसून म्हणाली आणि वळून पाहिले तर ती एकदम हायपर झाली.
"हे सगळं काय आहे? माझी श्रेया जिवंत असताना तिचे श्राद्ध घालताय, लाज नाही वाटत. ए पंडीत, निघ इथून. इथे कोणाचे श्राद्ध नाही होणार." रिधिमा ठेवलेले सर्व सामान उधळत रागाने थरथरत म्हणाली.
तिचा अवतार पाहून ब्राह्मण घाबरून उठून पळून गेला.
तिला सावरणे कठीण होऊ लागले. ती त्या दोघांना ऐकेना. आरडाओरडा करत "माझी श्रेया" अशी बडबडत होती. आशीष आणि त्याची आई खूप घाबरले. तिला कसे सावरावे हे त्यांना समजेना.
तेवढ्यात दारातून गौरी त्या मुलीसह आत आली. त्यांच्या मागोमाग गौतमपण सामानाची पिशवी घेऊन आत आला.
रिधिमाला पाहून ती मुलगी मम्मा म्हणत हात पसरून पुढे आली. पॅनिक झालेली रिधिमा लगेच शांत होत तिला पाहू लागली आणि पळतच जाऊन तिला कडेवर घेत पटापट तिचे मुके घेत "माझी श्रेया.." म्हणत तिला गच्च कावटाळून घेतले.
गौरी, गौतम, आशीष आणि त्याची आई अचंबित होऊन हा सारा नजारा पाहू लागले.
आशीष आणि त्याची आईला तर त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्यांचे डोळे पाण्याने तुडुंब भरले होते.
गौरीने हातातल्या विठ्ठलाच्या मूर्तीकडे नजर टाकली. गौतम तिच्याकडे पाहत होता.
"काय हा खेळ नशिबाचा?" त्याच्या मनात प्रश्न डोकावला.
थोड्यावेळाने परिस्थिती सावरल्यावर आशीषने आधी गौतमची हात जोडून माफी मागितली आणि नंतर आभार मानत भरल्या डोळ्यांनी श्रेयाकडे पाहत म्हणाला,"ही श्रेया आमची मुलगी. मागच्या वर्षी आम्ही पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी गेलो होतो. चंद्रभागेत अंघोळ करत होतो. अचानक वादळ वारा सुटला. नदीचा प्रवाहाचा वेगही वाढला. त्यात श्रेया हरवून गेली. खूप शोधाशोध केली पण ती सापडली नाही. नंतर सरकारने मृत लोकांच्या यादीत श्रेयाचे नाव घोषित केले. तेव्हा रिधिमा सोडून आम्ही तिला मृत समजत होतो. पण हिची भक्ती आणि श्रद्धा खरी ठरली. तुमच्याशी मी इतकं वाईट वागूनही तुम्ही माझ्याशी चांगले वागलात. आमची मुलगी परत मिळाली. कसे आभार मानू कळत नाही मला. मला माफ करा."
आशीष हात जोडून खाली मान घालून अपराधी भावना व्यक्त केले.
"अहो, माफी मागू नका, शेट. आम्ही फक्त माध्यम ठरलो. विठूरायानेच तुमची मुलगी परत करण्यासाठी आमची निवड केली. त्यांची महिमा थोर आहे." गौतम विठ्ठलाची मूर्ती कपाळावर लावत म्हणाला.
"हो, आशीष. विठूरायाचे आभार माना. त्यांची माफी मागा." रिधिमा त्या मूर्तीकडे पाहत म्हणाली.
"हो, माफ कर विठ्ठला. काळा दगड म्हणून तुला नावे ठेवलो, दोष दिला." तो विठ्ठलाची माफी मागत मनोभावे त्याला नमस्कार केला.
गौरी आणि गौतम जाण्यासाठी निघाले तेव्हा रिधिमा तिच्या उदास चेहऱ्याकडे पाहत म्हणाली,"लवकरच तुझ्या मांडीवरही बाळ खेळेल. तुम्ही निराश होऊ नका गौरीताई. तुमच्या चांगल्या कर्माचे फळ विठूराया तुम्हाला नक्कीच देईल. मला पूर्ण खात्री आहे."
ते दोघे निघून गेले. काही दिवसांनी रिधिमाचे बोलणे खरे झाले. गौरीला दिवस गेले. तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिच्या चांगल्या कर्माचे फळ विठूरायाने एका गोंडस मुलीला जन्म दिला.
गौतम आणि गौरी लक्ष्मी घरी आली म्हणून खूप खूश झाले. विठूरायाचे मनापासून आभार मानले.
आता आशीष आणि गौतम चांगले मित्र बनले. त्यांच्यात चांगला घरोबा निर्माण झाला.
गौरी आणि गौतम यांच्या मुलीचे बारसे रिधिमा आणि आशीष यांनी थाटात साजरा केला.
मुलीचे नाव राधा ठेवण्यात आले.
सगळे आनंदाने नांदू लागले.
चौघेही आपापल्या लेकीसह न चुकता दरवर्षी विठूच्या दरबारात दर्शनासाठी जात होते. प्रत्येक वेळी गौरी त्या मुलाला शोधत होती; पण तो काही पुन्हा दिसला नाही.
समाप्त -
चांगल्या कर्माचे फळ कधी ना कधी मिळतेच.
भक्ती आणि श्रद्धा कधीच वाया जात नाही.
भक्ती आणि श्रद्धा कधीच वाया जात नाही.
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा