Login

कर्माचे फळ (भाग:-४)

बाळासाठी आसुसलेल्या गौरीची ममता आणि करूणेची कथा

जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी - २०२६

विषय:- खेळ नशिबाचा

शीर्षक:- कर्माचे फळ

भाग:- ४

आशीष फाटका शर्ट मुठीत धरून संतापाने थरथरत घरात आला. त्याचा अवतार पाहून रिधिमाने त्याला काय झालं म्हणून काळजीने विचारल्यावर तो गौतमवर शिव्यांची लाखोली वाहत रागाने म्हणाला,"त्या विठ्ठल भक्त गौतमची एवढी हिंमत की भर रस्त्यात मला अडवून पैसे मागितले आणि माझी काॅलर पकडून शर्ट फाडला. आता या जन्मात त्याचे पैसे मी परत देणार तर नाहीच शिवाय त्याला जन्माची अद्दल घडवतो की तू बघच."

तिच्या उत्तराची वाट न‌ बघता तो ताडताड पावले टाकत रूममध्ये निघून गेला.

रिधिमा विचार करत थोडावेळ उभी राहिली. नंतर काही तरी मनाशी ठरवत पर्स घेऊन सासूला सांगून ती घराबाहेर पडली.

इकडे जाणाऱ्या कारकडे गौतम दात ओठ खात पाहू लागला. तो तसाच घरी आला. त्याच्या कपाळावरील जखम पाहून गौरीने घाबरून काय झाले म्हणून काळजीने विचारले. तेव्हा त्याने घडलेली घटना तिच्या कानावर घातली.

तिने हळद तेलात मिसळून त्याच्या कपाळावर लावत हळवी होत  म्हणाली,"काय हो तुम्हाला थोडाही राग कंट्रोल करता येत नाही का? का हातापायीवर उतरलात?"

जखम त्याला झाली होती पण वेदना तिच्या चेहऱ्यावर जाणवत होती. तिची काळजी त्याला समजत होती. पण तो चिडून म्हणाला,"मी शांतपणेच बोलत होतो. त्यांनी सुरूवात केली. एक तर ते पैसे परत देत नाहीत. मी बऱ्या बोलाणे फक्त पैसे मागत होतो. त्यांनीच हात उचलला मग मी शांत बसू का?"

"तुमचं म्हणणं पटतंय ओ, पण..जाऊ द्या आता पैसे मागू नका आता. आपल्या नशिबात असेल तर परत मिळतील." ती त्याला समजावत म्हणाली.

तेवढ्यात दार ठोठावण्याचा आवाज आला. तिने दार उघडून पाहिले तर दारात रिधिमा उभी होती. दोघेही एकमेकींना पाहून क्षणभर थक्क झाले.

तो‌ कुठे राहतो हे एकदा तिने ऐकले होते. ती विचारत विचारत तिथे आली होती.

"तुम्ही इथे कसे?" गौरीने तिला विचारले.

गौतम जागेवरच उभे राहून तिला पाहत होता.

"गौतमभाऊ इथेच राहतात ना?" रिधिमाने विचारले.‌

"हो, मी त्यांची बायको आहे. या ना आत या." गौरीने हसून तिचे स्वागत केले.

गौतमने तिला ओळखले होते.

ती आत येत हात जोडत त्याला शांतपणे म्हणाली,"मी आशीषची बायको रिधिमा. हे जे दुपारी तुमच्याशी वागले त्यासाठी त्यांच्यावतीने मी तुमची माफी मागते, भाऊ."

"अहो वहिनी, तुम्ही का माफी मागता? यात तुमची काही चूक नाही. माफी मागून तुम्ही आम्हाला लाजवू नका, प्लीज." तिने माफी मागितली ते गौतमला पटले नाही.

"हा तुमचा मोठेपणा झाला, भाऊ. माझ्या हातात असते तर मी तुमचे सगळे पैसे परत केले असते; पण माझ्याकडे तेवढे पैसे नाहीत. पण  हा मी तुमच्यासाठी एक काम करू शकते. तुमची पंढरपूरला जाण्याची इच्छा पूर्ण करू शकते. तेवढे पैसे आहेत माझ्याकडे." रिधिमाने त्या दिवशी पंढरपूरबद्दल ऐकले होते. ती दोघांकडे पाहून म्हणाली.

ते दोघे एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. ते काही बोलणार तोच रिधिमा तिथे असलेल्या देव्हाऱ्यातील छोट्या विठ्ठल मूर्तीकडे हात जोडून पुन्हा विनंती करत म्हणाली," प्लीज, नाही म्हणू नका. यात माझाही स्वार्थ आहे. मलाही पंढरपूरला जायचे आहे; पण आशीष जाऊ देत नाहीत. माझ्यावतीने विठ्ठल चरणी वस्त्र अर्पण करा आणि त्याला म्हणा की एक विठ्ठल भक्त त्याच्या बोलण्याची वाट पाहत आहे."

"ठीक आहे. विठूरायाच्या दरबारातून बोलावणे आले तर आम्ही कोण नाही म्हणणारे.‌ आम्ही जाऊ, ताई. तुमची कामना त्याच्या दरबारी सांगू." गौरी तिचे जोडलेले हात हातात घेत म्हणाली.

रिधिमा हसून निघून गेली.‌

दुसऱ्या दिवशी ती पैसे आणि अर्पण करायचे कपडे घेऊन आली आणि त्यांना देऊन गेली.

गौरी आणि गौतम पंढरपूरला आले. सर्वत्र 'विठ्ठल .. विठ्ठल..'या नामाचा जयघोष होता. त्यांनी आधी नामदेव पायरीचे दर्शन घेतले आणि मंदिरात प्रवेश केला. सगळीकडे टाळ, मृदुंग आणि चिपळ्यांचा नाद घुमत होता.

सावळ्या विठूरायाचे मोहक रूप पाहून गौरीचे मन भरून घेतले. तिचे डोळे नकळत भरून आले. तिचे मन शांत आणि तृप्त झाले. भक्ती आणि श्रद्धेने ओथंबलेल्या मनाने विठ्ठलाची मनोभावे प्रार्थना करू लागली,"देवा विठूराया, माझा संसार खूप सुखाचा आहे. फक्त बाळाची उणीव सतत सलत राहत आहे. मला आई होण्याच सुख लाभू दे, माझ्या अंगणात बाळांची पाय दुडूदुडू धावू दे. हे एकच मागणे आहे माझे. ते लवकर पूर्ण होऊ दे. ही एकच आस घेऊन तुझ्या चरणी आले आहे. मला निराश करू नकोस, देवा!'

'विठूराया, माझ्या गौरीने जे मागितले ते तिला दे. तिच्या सुखात माझे सुख आहे.' डोळे मिटून प्रार्थना करत असलेल्या सोज्वळ गौरीकडे एक नजर टाकून विठ्ठलाच्या चरणावर डोकं टेकवून मनोभावे नमस्कार करत गौतम मनात म्हणाला.

नंतर त्यांनी रिधिमाने दिलेले वस्त्र अर्पण केले आणि तिच्यासाठीही प्रार्थना केली.

मंदिराच्या बाहेर आल्यावर कळसाचे दर्शन घेतले. प्रसाद घेऊन निघाले होते. तोच त्या दिवशीचा मुलगा तिला भेटला. तिने‌ आश्चर्याने त्याला विचारले,' तू इथे‌ कसा?' तेव्हा तो हसत म्हणाला,"मी तर इथेच राहतो. माझं काम होतं म्हणून मी तिकडे आलो होतो."

"हो का? धर प्रसाद घे." ती हातातला प्रसाद त्याच्या समोर करत म्हणाली.

"नको मला, माझं पोट भरलं आहे. दुसरे कोणते मुलं भेटले तर त्याला दे." एवढे बोलून तो गर्दीतून दिसेनासा झाला.

तिला जरा आश्चर्यच वाटले. ते‌ दोघे पुढे जात होते तर एक छोटी मुलगी मागून तिचा पदर ओढत होती. तिने मागे वळून पाहिले.

तिने मळलेला फ्राॅक घातला होता, केस विस्कटलेले होते. चेहऱ्यावरून भूकेली वाटत होती. म्हणून प्रसादाचा द्रोण तिने तिला दिला आणि ती पुढे जाऊ लागली. तर ती मुलगीही त्यांच्यामागे आली.

तिने थांबून तिला विचारले,"बाळा, तुला अजून प्रसाद पाहिजे का?"

ती काहीच बोलली नाही फक्त पाहत होती.

मग तिने गौतमजवळचा प्रसादही तिला दिला. तरीही ती त्यांच्यामागे येत होती.

"बहुतेक हिला हिच्या आईवडिलांसाठीही प्रसाद पाहिजे वाटतं. पैसे देऊया का?" गौतम विचार करत म्हणाला आणि शर्टाच्या खिशातील पन्नास रुपये काढून गौरीकडे दिले.‌

क्रमशः

कोण असेल ती मुलगी? गौरीची इच्छा पूर्ण होईल का?