जलद लेखन स्पर्धा:- फेब्रुवारी- २०२६
विषय:- खेळ नशिबाचा
शीर्षक:- कर्माचे फळ
भाग:-३
पुजारी एक जळजळीत कटाक्ष गौरीकडे टाकत तावातावाने निघून गेला. तो निघून जाताच तिची पावले आपोआपच त्या मुलाच्या दिशेने जाऊ लागली. तसे त्या मुलाने हळूच दारातून डोकावून पाहत पोटावरून हात फिरवत केविलवाणेपणे तिला प्रसाद देण्याचा इशारा केला.
ती गालात हसून त्याला थांबवण्याचा इशारा करून पटकन द्रोणमधला प्रसाद त्याला दिला. त्याला मटामटा तो प्रसाद खाताना पाहून तिच्या मनाला खूप शांती मिळाली.
'देवा विठ्ठला, माफ कर रे, तुझ्या आधी या भूकेल्याला खाऊ घातले.' तिने मनातून विठ्ठलाची माफी मागितली.
तो मुलगा खाऊन झाल्यावर आनंदाने ढेकर देत तेथून निघून गेला.
त्याच मंदिरात दर्शनासाठी रिधिमा आली होती. तिने मनोभावे विठ्ठलाचे दर्शन घेतले आणि विठूच्या सुंदर मूर्तीकडे पाहत मनात म्हणाली,"मला श्रेयाला घेऊन तुझ्या दर्शनाला पंढरपूरला यायचे आहे. पण आशिष काही ऐकत नाहीत. असं काहीतरी कर की ते स्वतः आम्हाला घेऊन तिकडे येतील."
तिने पुन्हा एकदा मूर्तीकडे मन भरून पाहून घेतले आणि ती जाण्यासाठी निघाली होती तर तिला एका वृद्धाने प्रसाद घेऊन जा म्हणून सांगितले. त्यांच्या चेहऱ्यावर विलक्षण तेज होते. त्याचे म्हणणे ती टाळू शकली नाही. तिथे मंदिराच्या पाठीमागे अन्नछात्रालय होते. ती तेथे गेली. बरीच माणसे तिथे प्रसाद खात होती.
त्या ठिकाणी तिला गौरी दिसली. तिची आणि गौरीची ओळख भाजी घेताना मार्केटमध्ये झाली होती. तिला तिथे पाहून आश्चर्य वाटले.
तेवढ्यात एक माणूस प्रसाद खाऊन तृप्त होऊन तिला आनंदाने म्हणाला,"गौरीताई, प्रसाद खूप छान झालाय. काय टाकता हो, इतकी छान चव येण्यासाठी?"
"धन्यवाद दादा, मी मनापासून श्रद्धेने प्रसाद बनवते, विठ्ठलाची भक्ती टाकते. मग तो विठ्ठलच माझ्याकडून सगळा प्रसाद बनवून घेतो." गौरीने हसून उत्तर दिले.
रिधिमा तिच्याजवळ येत तिला म्हणाली,"तुम्ही प्रसाद बनवलाय का? (गौरीने होकारार्थी मान डोलावली.)छान हं. मी मदत करू का वाढायला? तेवढीच माझ्याकडून विठ्ठलाची सेवा होईल."
"हो, का नाही. वाढा ना." गौरीने हसून हातातले प्रसादाचे पात्रे तिच्याकडे दिले.
ती हसतमुखाने प्रसाद वाढू लागली.
तो माणूस गौरीला पुन्हा म्हणाला,"ताई, यावेळी तरी पंढरपूरला येणार ना तुम्ही?"
गौरी उदास होत म्हणाली,"नाही ओ दादा, या वेळीही नाही जमणार. तुम्ही जाऊन या. विठूराया जेव्हा बोलावेल तेव्हा जाईन."
रिधिमा त्यांचे बोलणे ऐकत होती.
गौरीने तिला कसे आले विचारल्यावर ती म्हणाली,"माझी सहा वर्षाची मुलगी आहे. तिच्यासाठी प्रार्थना करायला आले होते. तुम्हाला किती मुले, ताई?"
तिच्या प्रश्नावर गौरी उदास होत म्हणाली,
"विठू माऊलीची कृपा कधी होते काय माहिती? अजून तर काही नाही."
"विठू माऊलीची कृपा कधी होते काय माहिती? अजून तर काही नाही."
"काळजी करू नका, लवकरच छोटा विठ्ठल तुमच्या घरी येईल." रिधिमा तिला दिलासा देत म्हणाली.
"माऊलींच्या मनात तसेच येवो आणि तुम्ही म्हणता तसेच होवो." गौरी मोकळे हसत म्हणाली.
रिधिमा हसून निघून गेली.
असेच काही दिवस निघून गेले. श्रेयाचे वर्ष श्राद्ध जवळ आले होते. तिचे करण्याचा आशीष आणि त्याची आई विचार करत होते. पण रिधिमा असताना ते शक्य नव्हते. म्हणून आधी तिला त्याबाबत समजावयाचे. असे म्हणून तो रूममध्ये आला तर ती श्रेया समोर या भ्रमात तिच्याशी बोलत होती. ते पाहून त्याला वाईट वाटले. तो तिला काही बोलणार तोच ती त्याला हसत म्हणाली,"बरं झालं आशीष तुम्ही आलात. सांगा तुमच्या लाडक्या लेकीला, आज थालीपीठ खा म्हणून."
"मी काय म्हणतो ते नीट ऐक, रिधू. श्रेया या जगात नाहीये. हे तू एक्सेप्ट का करत नाहीस." तो तिचे दोन्ही खांदे धरून तिला काकुळतीने समजावू सांगत होता.
"नाही तुम्ही खोटं बोलताय. माझी श्रेया मला सोडून कुठेही गेली नाही. दिसत नाही का तुम्हाला हे पाहा ती इथेच आहे?" ती हात झटकून त्याला बेडकडे बोट दाखवून रागात म्हणाली.
तो हर तऱ्हेने तिला पटवून देण्याचा प्रयत्न करत होता ; पण ती ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. त्यातच तिला पॅनिक अटॅक आला. त्याने आईला बोलावून घेतले. गोळी देऊन तिला कसेबसे झोपवले.
दुसऱ्या दिवशी तो तिची ट्रिटमेंट चालू असलेल्या डॉक्टरांकडे गेला. त्यांना सगळी परिस्थिती समजावून सांगितली तेव्हा ते म्हणाले,"सध्याची त्यांची मानसिक अवस्था पाहता त्यांना त्याच भ्रमात राहू द्या. सध्या जे नाटक चाललंय तेच चालू ठेवा. त्याशिवाय दुसरा ऑप्शन नाहिये. कारण पुन्हा तुम्ही सांगितले तर त्यांना खूप धक्का बसेल जो त्यांच्या जीवावर बेतेल. राहिला प्रश्न श्राद्धचा तर श्राद्ध होईपर्यंत त्यांना त्यांच्या माहेरी पाठवा."
तो निराश होत तेथून निघाला. तो त्याच विचारात कारचा दरवाजा उघडून आत बसला.
तेथून थोड्या अंतरावर गौतम रिक्षा थांबवून मित्राशी बोलत होता. त्याचे लक्ष आशीषकडे गेले. मित्राला बाय करून तो त्याच्याकडे आला. कारच्या काचेवर टकटक केली. आधीच वैतागलेला आशीष त्याला पाहून अजून वैतागत बाहेर येऊन चिडून म्हणाला,"आता काय तू रस्त्यावर पैसे मागणार आहेस का?"
"त्याशिवाय चारा ठेवला आहे का तुम्ही?" गौतमही थोडा चिडून म्हणाला.
आशीषला राग अनावर झाला. त्याने गौतमचे डोके धरून धाडकन कारच्या खिडकीवर आपटले. ज्यामुळे गौतमच्या कपाळाला दुखापत झाली.
तो डोक्याला हात लावून विव्हळला आणि स्वतःला सावरत त्याने रागाने आशीषचा शर्ट धरून ओढला, त्यामुळे त्याच्या शर्टाची जवळपास सगळी बटणे तुटली.
आशीषचा राग उफाळून आला. तो चावताळून त्याच्यावर धावून आला आणि त्याने जोरात त्याला ढकलून दिले. तो जमिनीवर पडला. तो उठायच्या आधीच तो कारमध्ये बसून निघून गेला.
क्रमशः
रिधिमा भ्रमातून बाहेर पडेल का? गौरी पंढरपूरला जाईल का? आशीष श्रेयाचे श्राद्ध घालेल का?
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा