Login

कर्माचे फळ (भाग:-२)

बाळासाठी आसुसलेल्या गौरीची ममता आणि करूणेची कथा

जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी - २०२६

विषय:- खेळ नशिबाचा

शीर्षक:- कर्माचे फळ

भाग:-२

देवाच्या कृपेने गणेशची बायको आणि बाळ सुखरूप होते. हे ऐकून गौरी आणि गौतम यांना हायसे वाटले.

ते घरी आल्यावर तो नाराज होत तिला  म्हणाला,"पंढरपूरला जाण्याचे तुझे स्वप्न पुन्हा मागे पडले, साॅरी गौरी."

"अहो, साॅरी कशाला म्हणताय? ताई आणि बाळ सुखरूप आहे. यातच सगळं आलं. आपण पंढरपूरला जाण्यापेक्षा दोन जीव वाचले हे महत्त्वाचे आहे. विठ्ठलानेच आपल्या हातून हे चांगले काम घडवून आणले. राहिला प्रश्न पंढरपूरला जाण्याचे तर असं समजा की विठ्ठलानेच आपले येणे लांबवले असेल. याच्या मागेही काही तरी चांगले होणार असेल." गौरी समंजसपणे म्हणाली.

त्याला गौरीच्या विचारांचे खूप कौतुक वाटत होते. तो खूप प्रेमाने जवळ घेत हळव्या सुरात म्हणाला,"मी खूप नशीबवान आहे की मला इतकी समजूतदार, मोठ्या मनाची बायको भेटली."

"मीही नशीबवान आहेच की मलाही विठ्ठलाने इतका प्रेमळ नवरा दिला." ती त्याला बिलगून म्हणाली.

काही दिवस निघून गेले. तो आशिषला त्याचे पैसे मागायला गेल्यावर त्याने त्याला अपमानित करून हकलवून दिले. आशीषची बायको रिधिमाने ते पाहिले होते. तिने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण तो तिला कडक शब्दात म्हणाला,"माझ्या कामधंद्यात तू नाक खुपसू नकोस, समजलं!"

त्याचा राग पाहून ती बिचारी मूग गिळून गप्प बसली.

गौतमच्या मेहनतीचे पैसे आशिषकडे ठेव म्हणून ठेवायला दिली होती. ते त्याने वापरले होते. आता मागायला गेल्यावर तो देण्यास नकार देत होता.

आशिष त्याची बायको रिधिमा आणि आईसोबत राहायचा. त्याला श्रेया नावाची मुलगी होती, जी काही दिवसांपूर्वी ती मरण पावली होती. त्याचा खूप मोठा धक्का रिधिमाला बसला होता. श्रेयाचा मृत्यू तिला मान्यच नव्हते. ती अजूनही जिवंत आहे असे तिला वाटायचे. ती सतत ती जवळ असल्यासारखे तिच्याशी बोलायची. ती शाळेत गेली, तिने अभ्यास केला. ती हा खाऊ पाहिजे, हा ड्रेस घातले, अशा भ्रमात राहून बडबड करायची. डॉक्टरांनी तिला तिच्या मनासारखे वागायला सांगितले होते. तिचे टेन्शन त्याला आणि त्याच्या आईला होते. त्यामुळे त्याने सगळे टेन्शन गौतमवर निघाले.

तिला सतत समजावूनही ती मानत नव्हती. तिला वाटायचे की श्रेया जिवंत आहे. तीही विठ्ठलाची भक्त होती. पण आशिषला मात्र त्या विठ्ठलाचा राग होता.

जेव्हा रिधिमा म्हणायची,"माझा विठ्ठल माझ्या श्रेयाला काहीच होऊ देणार नाही."

तेव्हा तो रागाने म्हणायचा,"तो फक्त एक काळा दगड आहे. त्याच्यावर काडीइतकाही विश्वास नाही माझा. तू नाव नको त्याच माझ्यासमोर."

"अहो, असे बोलू नका." ती त्याला समजावत होती.

"मग काय बोलू? त्याच्यामुळेच तर आपली .." तो बोलता बोलता थांबला. हातांची मूठ घट्ट आवळत दात ओठ गच्च आवळत दुसरीकडे पाहू लागला.

"आपली काय हं..बोला ना." रिधिमा रोखून पाहत म्हणाली.

"काही नाही, श्रेया उठली का पहा? मी ऑफिसला जातो." असे बोलून तो तडक ऑफिसला रवाना झाला.

एके दिवशी गौरी पाडव्याच्या सणाचा प्रसाद विठ्ठलाला आठवत बनवत होती.

प्रसाद जवळपास पूर्ण बनला होता. तेव्हा एक छोटा मुलगा तिच्यासमोर हात पुढे करत म्हणाला,"मावशी, मला खूप भूक लागली आहे. थोडा प्रसाद खायला दे ना."

त्याने पोटावरून हात फिरवत केविलवाणा चेहरा केला. ते पाहून तिच्यातील ममता जागृत झाली.

'अजून विठ्ठलला नैवेद्य दाखवला नाही. त्या आधीच याला कसं देऊ? पण लहान मुले ही देवाचीच रूप असतात की? याच्या रूपात माझा विठ्ठलच आला असेल. देते थोडासा प्रसाद!' असा मनात विचार करत ती पटकन द्रोणमध्ये थोडा प्रसाद काढून त्याला देत होती. तोच मंदिराचा पुजारी तिच्यावर भडकत म्हणाला,"गौरी, हे काय करत आहेस तू? देवाला नैवेद्य दाखवायच्या आधीच, एका भिकार पोराला प्रसाद देत आहेस. ठेव तो, आधी देवाला दाखवू दे."

"माफ करा, पुजारीबाबा. पोरं भुकेला आहे हो, मुलंही देवाचेच रूप असतात की. मग आज माऊलींच्या आधी याला खायला दिले तर काय बिघडते?" ती नाराज होतं म्हणाली.

"गप्प बस. मी पुजारी आहे. शास्त्र, पुराण, परंपरा मला चांगलंच ठाऊक आहे. तू मला नको अक्कल शिकवूस. ए पोरा, तू अजूनही इथेच आहेस. चल निघ इथून." तो पुजारी आधी तिच्यावर खेकसला आणि नंतर त्या मुलावर बसरला.

बिचारा इवले तोंड करून आशेने गौरीकडे पाहू लागला.

गौरीचे डोळे भरून आले.

"थांब असा नाही ऐकायचास तू? मीच बाहेर काढतो तुला!" पुजारी त्याच्या दंडाला धरून रागाने ओढत बाहेर आणले आणि दारात येताच ढकलून दिले. बिचारा पडतापडता सावरून उभा राहिला. जाणाऱ्या त्याला पाहण्याशिवाय गौरी काहीच करू शकली नाही याचं तिला वाईट वाटू लागले.

क्रमशः

गौरी त्या मुलाला शोधून त्याला प्रसाद देईल का?