जलद लेखन स्पर्धा - फेब्रुवारी - २०२६
विषय:- खेळ नशिबाचा
शीर्षक:- कर्माचे फळ
भाग:-१
"अहो, आपण या वर्षी विठ्ठल दर्शनासाठी पंढरपूरला जाऊ या का? माझी खूप इच्छा आहे." गौरी तिचा नवरा गौतमला भावूक होत म्हणाली.
"हो, जाऊ या. आशिषशेटंना आपले पैसे परत करण्यास सांगतो. ते भेटले की नक्की जाऊ या." तो तिला आश्वासन देत म्हणाला खरा पण पुण्याहून पंढरपूरला जायचे म्हणजे खूप पैसे लागतील त्याचे नियोजन कसे करायचे याचा विचार तो मनात करू लागला.
त्याला विचारात गुंतलेले पाहून गौरीने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. तसा तो दचकला.
ती काळजीने त्याला म्हणाली,"अहो, कशाचा इतका विचार करताय? पुरेसे पैसे नसतील तर काळजी करू नका. मी गेले काही दिवस पैसे साठवत आहे. तेच पैसे घेऊन जाऊ. थांबा एक मिनिट, हं.. पाहू या किती आहेत ते? "
तिने पैसे साठवलेला छोटा स्टीलचा डब्बा माळ्यावरून काढला आणि त्याच्या हातात दिला. तो आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागला.
गौतम एक रिक्षा चालक होता. तर गौरी एका विठोबाच्या मंदिरातील अन्नछात्रालयात स्वयंपाकाचे काम करायची. तिच्या हाताला चांगली चव होती. त्यामुळे तिच्या हातच्या नेवैद्य आणि प्रसादाला खूप मागणी होती. अन्नछात्रालयाशिवाय ती कोणाच्या घरी कसली पुजा असेल तर तसा प्रसाद बनवून द्यायची किंवा जास्त प्रमाणात बनवायला असेल तर ती त्या ठिकाणी जायची.
दोघेही नाकासमोर चालणारे, गरीब, प्रामाणिक आणि मदत करणारे होते. खाऊन-पिऊन सुखी होते. फक्त एकच कमी होती त्यांच्या जीवनात. ती म्हणजे बाळाची. लग्नाला सहा वर्षे झाली तरी त्यांच्या संसार वेलीवर अजूनही फूलं उमलेले नव्हते. यांची त्यांना खंत वाटायची. खास करून गौरीला. महिन्याची पाळी चुकली की तिच्या आशा पल्लवित व्हायच्या; पण नंतर पाळी आली की ती हिरमुसून जायची. गौतमला तिची अवस्था बघवत नसायची. तिचा हिरसमुसलेला चेहरा पाहून त्याचंही मन दुःखी व्हायचं.
असं नव्हतं की त्यांनी उपचार घेतले नव्हते. पोटाला चिमटा काढून त्यांनी उपचारासाठी खर्च केला होता. पण नेहमीच हाती निराशाच यायची. दोघांच्याही कमाई म्हणावी तेवढी नव्हती. तरीही त्यांना बाळासाठी प्रयत्न केले होते.
त्याला कधी रिक्षाचे भाडे लागायचे तर कधी लागायचे नाही. तिलाही जास्त पगार नव्हता. ते मेहनत करायचे. दोघेही विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते. कधी ना कधी तो प्रसन्न होईल, आपली कुस उजवेल याची तिला खात्री होती. शेवटी खेळ नशिबाचा असतो. नियतीच्या मनात काय हे कोणाला कळते?
तिने दिलेल्या डब्यातून चार हजार रुपये निघाले. ते पाहून तो खूश झाला आणि म्हणाला,"एवढ्या पैशात आपण आरामशीर पंढरपूरला जाऊन येऊ शकतो."
"हो ना. मग कधी जाऊ या पंढरपूरला?" तिने उत्साहाने विचारले.
"उद्याच जाऊ या." तो तिला जवळ घेत हसत म्हणाला.
ती खूश होऊन त्याला बिलगली. तेवढ्यात दारावर जोरिची थाप ऐकू आली.
त्याने दार उघडले तर समोर गणेश उदास चेहऱ्याने थरथरत उभा होता. गौतमला पाहत तो रडत म्हणाला,"गौतम, हिला दवाखान्यात ॲडमीट केलंय रे. डाॅक्टरांनी ताबडतोब ऑपरेशन करायला सांगितले आहे. नाही तर ती किंवा बाळ दोघांपैकी कोणीतरी.."
"अरे, तू आधी शांत हो, नक्की काय झालं ते सांग." गौतम त्याला घरात घेत खुर्चीवर बसवत म्हणाला.
गौरीने पटकन ग्लासमध्ये पाणी आणत त्याच्यासमोर धरले. गौतमने त्याला पाणी प्यायला लावले. त्याने कसे बसे दोन घोट पाणी घेतले आणि म्हणाला,"गौतम मला चार हजार रुपये कमी पडत आहेत. तुझ्याकडे असले तर दे. मी नंतर देईन. नसले तर कोणाकडून तर घेऊन दे. माझ्या बायको आणि बाळाचा प्रश्न आहे रे, नाही म्हणू नकोस."
गौरीने पटकन त्या डब्यातले पैसे गणेशच्या हातात ठेवले आणि म्हणाली,"भाऊजी, हे घ्या पैसे. पटकन जा. ताई आणि बाळाला काही होणार नाही. विठ्ठलावर विश्वास ठेवा. दोघेही सुखरूप असतील."
तिच्या कृतीने गौतम भारावून गेला. तो भरल्या डोळ्यांनी तिला पाहत होता. तो काही बोलणार तोच ती त्याला म्हणाली,"अहो, जा तुम्ही जा भाऊजींना आपल्या रिक्षात घेऊन. मी ताईंसाठी खायला बनवून मागून येते."
"खूप उपकार झाले, वहिनी." गणेश तिचे आभार मानत बाहेर पडला.
तिच्याकडे एक नजर प्रेमाने टाकत तो गौतमही त्याच्यामागे गेला.
क्रमशः
गौरीची विठ्ठल वारी पूर्ण होईल का? विठ्ठल तिची इच्छा पूर्ण करेल का?
©️ जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा