Login

धडा कर्माचा (अंतिम भाग)

कर्माचे फळं कुणालाच चुकले नाही...

धडा कर्माचा (अंतिम भाग)

     दुसऱ्या दिवशी अमित नेहमीप्रमाणे ऑफिसला निघून गेला, पण तो खरं तर गेलाच नव्हता. तो घराच्या मागच्या अंगणातून  गुपचूप आत आला आणि अडगळीच्या खोलीत जाऊन लपून बसला.थोड्याच वेळात हॉलमधून ओरडण्याचा आणि वस्तू फेकण्याचा आवाज आला. अमितने पायऱ्यांवरून चोरून पाहिले....

   सासू आजारी आनंदीवर ओरडत होती, "काय ग महारानी, अजून चहा झाला नाही? तुझ्या बापाच्या घरी दुपारी चहा मिळायचा का?"

तेवढ्यात दीर राहुल तिथे आला आणि त्याने आनंदीला ढकलून दिले, "तुला नीट काम करता येत नसेल तर चालती हो इथून, माझ्या भावाचे आयुष्य बरबाद केलेस तू! तुझा हा रडका चेहरा पाहून मला राग येतो."
आनंदी खाली जमिनीवर बसून रडत होती आणि ते दोघे तिच्या हतबलतेवर क्रूरपणे हसत होते. हे पाहून अमितच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याचा राग अनावर झाला. आपली आई आणि भाऊ इतके नीच असू शकतात, यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता.
तो धावत पायऱ्यांवरून खाली आला आणि सिंहासारखा गर्जला, "थांबा!"

    अमितला अचानक समोर पाहून सासू आणि राहुलचे चेहरे पांढरे पडले. राहुलच्या हातातील आनंदीचा फोन खाली पडला. त्यांच्या तोंडून शब्द फुटेना....
अमितने धावत जाऊन राहुलची कॉलर पकडली आणि त्याला भिंतीला ढकलले, "तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोवर हात उचलायची? भाऊ झालास म्हणजे स्वतःला काय समजतोस? आणि आई, तू? तू तर या घराची मोठी आहेस ना? हेच संस्कार दिलेस का तू राहुलला? माझ्या पाठीमागे तुम्ही दोघे मिळून माझ्या बायकोचा जीव घेत होता?"


    अमितने खाली बसलेल्या आनंदीला प्रेमाने उठवले, तिचे अश्रू पुसले आणि तिची माफी मागितली. "मला माफ कर आनंदी, मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. पण आता मी तुला या घरात सुरक्षित ठेवेन."

    अमितने त्याच दिवशी राहुल आणि आईला स्पष्ट शब्दांत सुनावले, "आई, जर यापुढे आनंदीला एक जरी शब्द बोललात किंवा राहुल, तू तिच्या वाटेला गेलात, तर मी हे घर सोडून कायमचा निघून जाईन आणि तुमच्याविरुद्ध पोलिसांत घरगुती हिंसाचाराची तक्रार करेन...

     अमितचा हा रौद्र अवतार पाहून सासू आणि राहुल काही वेळ गप्प बसले, पण त्यांचा अहंकार आणि क्रूरता अजून संपली नव्हती. अमित ऑफिसला गेल्यावर काही दिवसांनी सासू पुन्हा म्हणाली, "हा दोन दिवसांचा राग आहे त्याचा, शेवटी तो माझा मुलगा आहे, माझ्या शब्दाबाहेर नाही तो!" आणि राहुलनेही आनंदीला लपून-छपून टोमणे मारणे चालूच ठेवले. त्यांना वाटले अमित फक्त धमकावत आहे, तो काहीच करणार नाही.
पण अमितने आता त्यांच्यावर विश्वास ठेवणे पूर्णपणे बंद केले होते. त्याने आनंदीच्या चेहऱ्यावरील भीती आणि तिची ढासळत चाललेली प्रकृती पाहिली होती....

   आई आणि भावाच्या स्वभावात अजूनही काहीही फरक पडत नाहीये हे लक्षात आल्यावर अमितने एक मोठा निर्णय घेतला.एका रविवारी सकाळी अमितने आपले आणि आनंदीचे सगळे सामान बॅगेत भरले. हे पाहून सासू आणि राहुल धावत आले. सासू म्हणाली, "अमित, हे काय चाललंय? तू घर कुठे चालला आहेस का ?"

       अमित शांत पण खंबीर आवाजात म्हणाला,
"मी आनंदीला घेऊन दुसरीकडे राहायला चाललोय. ज्या घरात माझ्या बायकोच्या अस्तित्वाचा आणि सन्मानाचा आदर केला जात नाही, तिथं मी एक क्षणही राहणार नाही. तुम्ही दोघांनी सुधारण्याची संधी गमावली आहे."
राहुल मोठ्या ऐटीत म्हणाला, "जाऊ दे ना आई, भाऊ कमावतो तर काय झालं? घर तर आपल्या नावावर आहे, आपल्याला दरमहा पैसे पाठवतच राहील ना तो कारण त्याने वडिलाना वचन दिले होते तसे!" राहुलला वाटले की अमित दूर गेला तरी घरखर्च आणि त्याचे वैयक्तिक खर्च अमितच भागवणार....पण अमितने मनात काही वेगळेच ठरवले होते. तो आनंदीचा हात धरून त्या घरातून बाहेर पडला आणि त्यांनी शहरात एक छोटा, सुंदर फ्लॅट भाड्याने घेतला. नवीन घरात आल्यावर आनंदीने सुटकेचा श्वास घेतला. अमितच्या प्रेमामुळे आणि सुरक्षित वातावरणामुळे ती हळूहळू आजारपणातून बरी होऊ लागली.

   अमित दुसरीकडे राहायला गेल्यानंतर पहिल्या महिन्यात त्याने घरात नेहमीप्रमाणे पैसे पाठवले. पण सासू आणि राहुलच्या वागण्यात कोणताही पश्चात्ताप नव्हता. राहुल अजूनही मित्रांसोबत पार्ट्या करत फिरत होता.... अमित च्या काही मित्रांनी त्याला सांगितले...हे ऐकून अमितने दुसऱ्या महिन्यापासून घरात खर्च पाठवणे पूर्णपणे बंद केले.

    राहुलने जेव्हा अमितला फोन करून पैशांची मागणी केली, तेव्हा अमितने स्पष्ट सांगितले, "तू आता लहान नाहीस, जवान आहेस....स्वतः कमवायला शिक आणि आईला सांभाळ... माझ्याकडून आता एक रुपयाही मिळणार नाही."

  राहुल काहीच काम करत नसल्यामुळे  घरात धान्याचा तुटवडा झाला... घरात रेशन आणायला आणि लाईट बिल भरायलाही पैसे उरले नाहीत.राहुलचे उनाड मित्र पैशांशिवाय त्याला सोडून गेले. नोकरी नसल्यामुळे त्याला पैशा पैशासाठी लाचार व्हावे लागले.

     जेव्हा घरात उपासमारीची वेळ आली, तेव्हा सासू आणि राहुलचा सगळा माज उतरला. त्यांना समजले की आनंदी या घरात असताना किती काम करायची, आणि अमितच्या पैशामुळेच त्यांची समाजात प्रतिष्ठा होती. आनंदीवर केलेल्या मानसिक छळाची हीच देवाने दिलेली शिक्षा होती.

     सहा महिन्यांनंतर, सासू आणि राहुल रडत रडत अमित आणि आनंदीच्या नवीन घरी आले. सासूची गर्विष्ठ मान आता खाली झुकली होती. तिने आनंदीचे हात धरून तिची माफी मागितली, "आनंदी, मला माफ कर. आम्ही तुझ्यावर खूप अन्याय केला, त्याचीच फळं आज आम्ही भोगतोय." राहुलनेही दादा आणि वहिनीसमोर कान पकडून माफी मागितली आणि आश्वासन दिले की तो आता सुधारेल आणि नोकरी करेल.अमित आणि आनंदीने त्यांना माफ केले, पण अमितने पुन्हा त्या घरात राहण्यास साफ नकार दिला.

तो म्हणाला, "आम्ही इथेच सुखी आहोत. तुम्ही दोघे स्वावलंबी व्हा, मी फक्त आईच्या औषधांचा खर्च करेन, बाकी जबाबदारी राहुल तुझी आहे."

आनंदीला शेवटी तिचा हक्काचा आदर आणि स्वातंत्र्य मिळाले होते...आणि कर्माचे फळं कुणालाच चुकले नाही हे तर आपल्याला माहीतच आहे...

समाप्त...

स्नेहा डाखरे

कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा...

©®


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →