धडा कर्माचा(भाग१)
आनंदीचा विवाह अमितसोबत झाला तेव्हा ती डोळ्यांत अनेक सुंदर स्वप्ने घेऊन या घरात आली होती. अमित स्वभावाने खूप चांगला, प्रामाणिक आणि कष्टाळू होता, पण एका खाजगी कंपनीत मोठ्या पदावर असल्याने तो कामाच्या निमित्ताने बऱ्याचदा घराबाहेर असायचा. घरात अमितची आई (सासू) आणि त्याचा लहान भाऊ (दीर - राहुल) हे दोघेच असायचे. राहुल हा 22-23 वर्षाचा एक तरुण, उनाड आणि व्यसनी मित्रांच्या संगतीत राहणारा मुलगा होता...आईच्या लाडाने वाया गेलेला अस आपण समजू कारण अमित घरात पैसे कमवून आणायचा आणि सासू लहान मुलाचे लाड पुरवायची...
सुरवातीचे काही दिवस कसेबसे चांगले गेले, पण अमित ऑफिसला गेला की घराचे रूप बदलायचे. सासू आणि दीर राहुल या दोघांनी मिळून आनंदीवर मानसिक अत्याचार सुरू केले. राहुल तरुण असल्यामुळे त्याला घरात कसलीच शिस्त नव्हती. अमित घरात नसताना तो आनंदीवर हुकूम गाजवायचा.
एक दिवस राहुलने आपल्या टवाळ मित्रांना घरी बोलवले. आनंदीने सर्वांसाठी चहा नेला, तेव्हा मित्रांसमोर स्वतःचा रुबाब दाखवण्यासाठी राहुलने मुद्दाम तिच्या हातातील चहाचा कप खाली पाडला. चहा तिच्या पायावर उडाला, पण राहुल जोरात ओरडला, "तुला साधी चहाची कपडिश नीट धरता येत नाही का? काय शिकवलंय तुझ्या आई-वडिलांनी?" मित्रांसमोर झालेल्या या अपमानाने आनंदी आतून तुटली, आणि सासूनेही राहुलला समजवण्याऐवजी आनंदीलाच चार शब्द सुनावले.
आनंदीला तिच्या आई-वडिलांशी किंवा अमितशी मन मोकळे करता येऊ नये, म्हणून सासू आणि राहुलने मिळून एक चाल खेळली. एकदा आनंदी गॅलरीत उभी राहून तिच्या आईशी फोनवर बोलताना रडत होती. तेवढ्यात मागून राहुल आला आणि त्याने तिच्या हातातील फोन हिसकावून घेतला. सासूने तिला धमकावले, "या घरात काय चालतं ते बाहेर जाता कामा नये. जर माहेरी काही सांगायचा प्रयत्न केलास, तर तुझ्या भावाला खोट्या केसेसमध्ये अडकवू." तिचा फोन राहुलने स्वतःच्या ताब्यात ठेवला, ज्यामुळे ती घरात एका कैद्यासारखी झाली... अमित चा कॉल आला की दीर फोन स्पीकर वर ठेवायचा आणि तेवढाच बोलू द्यायचा...
इतकेच नाही तर, एक दिवस आनंदी दिवसभर काम करून जेवायला बसणार, तेवढ्यात राहुलने जेवणाचे ताट तिच्यासमोरून ओढले आणि म्हणाला, "तुझ्या माहेरून काही हुंडा आला नाहीये, जे फुकटचं खायला! आधी घरातली सगळी भांडी घास, मग काय उरेल ते खा." सासूने स्वयंपाकघराला कुलूप लावले. त्या रात्री आनंदी मागच्या अंगणात येऊन रडत होती तेव्हा शेजारी बाईने तिला थोड खायला दिलं कारण ती शेजारीण नेहमी बघायची आनंदीला सहन करताना...
या सततच्या मानसिक आणि छळवादी त्रासामुळे आनंदीच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ लागला. ती हळूहळू बारीक होऊ लागली, तिच्या डोळ्यांखाली काळी वर्तुळे आली. ती दिवस-रात्र अस्वस्थ असायची. पण सासू अमितला फोन करून सांगायची, "तुझी बायको दिवसभर माझ्यासमोर आणि राहुल समोर आजारी असल्याचे सोंग करते, जेणेकरून तिला काम करावे लागू नये." यानंतर तर हद झाली राहुल ने तिच्या चारित्र्यावरही संशय घेण्यास सुरुवात केली होती....
एक दिवस आनंदीला तीव्र ताप होता, तरीही राहुलने तिला पाण्याचे जड बकेट उचलण्यास भाग पाडले. बकेट उचलताना चक्कर येऊन आनंदी किचनमध्येच कोसळली. सासू आणि राहुलने तिला उठवले आणि डॉक्टरकडे नेण्याऐवजी उलट धमकावले.... आगाऊपणा करू नको आणि तुझे नाटके माहित आहे आम्हाला...बापाने नोकर नाही पाठवले तुझ्या... गपगुमान कामे कर...
त्या दिवशी आनंदीच्या सहनशक्तीचा बाण फुटला. तिने ठरवले की आता बस झाले! त्या रात्री अमित घरी आल्यावर आनंदीने हिंमत एकवटली आणि त्याला रडत रडत सर्व काही सांगितले. ती म्हणाली,
"अमित, तुमचे कुटुंब मला मानसिकदृष्ट्या मारत आहे. आई आणि राहुल रोज माझा छळ करतात, मला उपाशी ठेवतात. मी आता अधिक सहन करू शकत नाही. मला इथून घेऊन जा, नाहीतर मी माझा जीव देईन."
"अमित, तुमचे कुटुंब मला मानसिकदृष्ट्या मारत आहे. आई आणि राहुल रोज माझा छळ करतात, मला उपाशी ठेवतात. मी आता अधिक सहन करू शकत नाही. मला इथून घेऊन जा, नाहीतर मी माझा जीव देईन."
पण अमितचा त्याच्या आईवर आणि भावावर आंधळा विश्वास होता. तो म्हणाला, "आनंदी, आई असं कधीच करणार नाही. राहुल अजून लहान आहे. तुझा काहीतरी गैरसमज होतोय. तू जास्त विचार करून आजारी पडतेयस." अमितने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. आणि त्याच्या या शब्दांमुळे आनंदी पूर्णपणे खचली...तिने आता हळूहळू जीव देण्याचा विचार करायला सुरुवात केलीच होती...
आनंदीला खिडकीतून रडताना आणि राहुल-सासूला तिच्यावर ओरडताना त्यांच्या शेजारी राहणाऱ्या काकूंनी अनेकदा पाहिले होते. दुसऱ्या दिवशी अमित जेव्हा ऑफिसला जायला निघाला, तेव्हा शेजारच्या काकूंनी त्याला रस्त्यात बाजूला घेतले.
काकू म्हणाल्या, "अमित, तू कामात व्यस्त असतोस, पण घरात काय चालतंय याकडे जरा लक्ष दे. तुझी आई आणि राहुल त्या बिचाऱ्या आनंदीचा छळ करतात. काल तर राहुलने तिच्यासमोरून जेवणाचे ताट ओढून घेतले. ती मुलगी रोज आतल्या आत रडतेय. एका दिवशी मोठा अनर्थ होईल, मग तुला पश्चात्ताप करायलाही वेळ मिळणार नाही."
शेजाऱ्यांच्या या बोलण्याने अमित हादरला. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याला आनंदीचे रडणे आणि तिची खालावलेली प्रकृती आठवली. त्याने स्वतः डोळ्यांनी सत्य पाहण्याचे ठरवले.
