Login

करिष्मा – एका धैर्याची कथा

एका साध्या मुलीच्या धाडसाची गोष्ट…
करिष्मा – एका धैर्याची कथा


करिष्मा खूप साधी मुलगी होती. ती कधीच कोणाशी मोठ्या आवाजात बोलत नसे. चिडचिड करणे, रागावणे तिला मुळीच जमत नसे. कोणत्याही वस्तूसाठी ती हट्ट करत नसे. तिचे आई-बाबा गरीब होते, पण करिष्मासाठी काहीच कमी पडू देत नव्हते. ते छोट्या गावात राहत होते. करिष्मा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकत होती.

करिष्मा खूप सुंदर होती. नाजूक बांधा, छान मोठे डोळे आणि कमरेपर्यंत लांब केस होते. गावातील आणि कॉलेजमधील अनेक मुले तिच्यावर फिदा होती. पण करिष्मा कधीच कोणाकडे लक्ष देत नसे. तिची एक जिवलग मैत्रीण होती, तिचे नाव पूजा.

करिष्मा आणि पूजा रोज एकत्र कॉलेजला जात असत. दोघींची मैत्री खूप घट्ट होती. कोणतीही गोष्ट त्या एकमेकींपासून लपवत नसत.

त्याच गावात सरपंचाचा मुलगा प्रकाश राहत होता. त्याला करिष्मा खूप आवडत होती. त्याने एकदा आपल्या आई-वडिलांना सांगितले होते आणि त्यांनी करिष्माच्या आई-वडिलांकडे लग्नाची बोलणीही केली होती. पण करिष्माच्या आई-वडिलांनी सरळ नकार दिला. कारण त्यांना माहिती होते की प्रकाश चांगला मुलगा नाही. तो दारू पित असे, वडिलांच्या पैशावर ऐश करत असे. तो कधीच काही काम करत नसे. त्याच्यात माणुसकी नव्हती आणि कोणाशी कसे बोलावे हेही त्याला कळत नव्हते.

करिष्माच्या आई-वडिलांनी नकार दिल्यामुळे प्रकाश खूप रागावला होता.
“मी इतका श्रीमंत आहे, माझ्याकडे सगळं आहे… तरी मला नाही म्हणतात!”
हा राग त्याच्या मनात साचत गेला. शेवटी त्याने एक वाईट प्लॅन केला.

एक दिवस करिष्मा आणि पूजा कॉलेजला जात होत्या. करिष्मा अभ्यासातही खूप हुशार होती. ती रोज वेळेवर कॉलेजला जात असे आणि पुजालाही सोबत घेऊन जात असे.

त्या दिवशी सगळ्या मैत्रिणी क्लासरूममध्ये गेल्या. सगळी लेक्चर्स अटेंड केली.

तेवढ्यात करिष्माची एक मैत्रीण म्हणाली,
“करिष्मा, आपण संध्याकाळी लायब्ररीत येऊ या. त्या वेळी तिथे कोणीच नसतं. आपल्याला शांतपणे अभ्यास करता येईल.”

करिष्मा म्हणाली,
“हो, ही तर खूप चांगली कल्पना आहे. आता परीक्षा जवळ आल्या आहेत. घरी अभ्यास करायला लाईट जातो. मग चिमणीच्या उजेडात अभ्यास करावा लागतो… त्यात नीट दिसतही नाही.”

पूजा म्हणाली,
“मी पण येते. आपण दोघी सोबत जाऊ.”

पण त्यांचे हे बोलणे कोणी तरी लपून ऐकत होते…

करिष्मा आणि पूजा घरी गेल्या.

प्रकाशचा एक मित्र त्याला म्हणाला,
“करिष्मा आज लायब्ररीत येणार आहे. तुझा प्लॅन आजच पूर्ण होऊ शकतो.”

प्रकाश हसत म्हणाला,
“बस… मग कामाला लागायचंच.”

करिष्मा घरी गेल्यावर तिने घरची कामे केली. थोडा आराम केला. तिचे आई-बाबाही शेतातून घरी आले होते. करिष्माने चहा करून त्यांना दिला आणि स्वतःही घेतला.

थोड्या वेळाने पूजा तिला बोलवायला आली.

करिष्माची आई विचारते,
“करिष्मा, आता कुठे जात आहेस?”

करिष्मा म्हणाली,
“आई, आम्ही कॉलेजच्या लायब्ररीत जात आहोत. तिथे अभ्यास करू.”

आई म्हणाली,
“जा, पण दोघीही लवकर परत या.”

करिष्माने कपडे नीट केले, केसांची वेणी घातली आणि दोघी कॉलेजकडे निघाल्या.

कॉलेजमध्ये त्यांच्या अजून मैत्रिणीही आल्या होत्या. करिष्मा आणि तिच्या मैत्रिणी पुढे गेल्या, पण पूजा थोडी मागे राहिली होती. अचानक कोणीतरी तिला मागून खेचले. ती खूप घाबरली.

तिथे प्रकाशचा माणूस उभा होता.

तो म्हणाला,
“तुला जे सांगतो ते कर… नाहीतर तुझ्या आई-बाबांना आणि भावाला आम्ही पकडून आणू.”

पूजा घाबरून म्हणाली,
“त्यांना का पकडणार? त्यांनी काय केलं आहे?”

तो हसत म्हणाला,
“तू काही नाही केलं… पण आता आमचं काम कर.”

आई-बाबा आणि भावाच्या भीतीने पूजा तयार झाली. ती लायब्ररीत गेली, पण तिचं अभ्यासात लक्ष लागत नव्हतं. ती सतत चुळबुळ करत होती.

करिष्माच्या लक्षात आलं.

“पूजा, काय झालं? काही टेन्शन आहे का?” ती विचारते.

पूजा रडत रडत सगळं सांगते.

करिष्मा शांतपणे म्हणाली,
“तू बाकी सगळ्यांना घेऊन घरी जा. आणि बाबांना सगळं सांग. बाकी मी बघते.”

पूजा घाबरून म्हणाली,
“तो खूप वाईट आहे. तुझ्यासोबत काही केलं तर?”

करिष्मा ठामपणे म्हणाली,
“तो माझ्यासोबत काही करू शकणार नाही.”

पूजा बाकी मैत्रिणींना घेऊन निघून गेली. करिष्मा मात्र तिथेच थांबली.

सगळ्या गेल्या हे पाहून प्रकाश लायब्ररीत आला. त्याने खूप दारू प्यायली होती. त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं.

तो करिष्माजवळ आला आणि म्हणाला,
“करिष्मा… मला तू खूप आवडतेस. मला तू हवी आहेस.”

तो तिच्या अंगाला हात लावायला गेला. पण दारूमुळे तो नीट उभाही राहू शकत नव्हता. कधी इकडे तर कधी तिकडे जात होता.

त्याने करिष्माचे हात पकडले आणि तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला.

करिष्माने त्याला जोरात ढकलले.

प्रकाश रागाने म्हणाला,
“मला जवळ येऊ देत नाहीस? थांब… आता तुला सोडत नाही!”

तो पुन्हा तिच्याकडे आला. पण यावेळी करिष्माने त्याला खूप जोरात ढकलले आणि तिथून जायला लागली.

तेवढ्यात ती थांबली.

कारण तिचे बाबा, पुजाचे बाबा, गावातील काही लोक आणि प्रकाशचे बाबा तिथे आले होते.

करिष्मा तिच्या बाबांजवळ जाऊन उभी राहिली.

प्रकाशचे बाबा रागाने प्रकाशजवळ गेले आणि त्याच्या कानाखाली एक थप्पड दिली.

ते करिष्माकडे वळून म्हणाले,
“मुली, मला माफ कर. माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली.”

ते पुढे म्हणाले,
“आजपासून प्रकाश गावात दिसणार नाही.”

ते प्रकाशला घेऊन तिथून निघून गेले.

करिष्मा आणि बाकी सगळे घरी गेले.

प्रकाशच्या बाबांनी त्याला शहरात पाठवून दिले.

त्या दिवसानंतर गावातील मुली निर्धास्तपणे जगू लागल्या… आणि करिष्माच्या धाडसाची सगळीकडे चर्चा होऊ लागली.