Login

कागाळी

जर घरातील भांडे बोलू लागले आणि एकमेकांची कागाळी करू लागले तर....

शीर्षक:- कागाळी

"ए शुक शुकऽऽ.." कोणी तरी मला हाक मारली. मी चोहोबाजूंनी नजर फिरवली. पण कोणीच दिसले नाही. कदाचित मला भास झाला असेल, असं समजून मी किचन ओटा आवरू लागले.

"अगं ए, तुला ऐकू येत नाही का?" मला पुन्हा तोच आवाज ऐकू आला.

मी घाबरून पुन्हा इकडे-तिकडे पाहू लागले.

"अगं जयू, घाबरू नकोस बाई. आम्ही आहोत गं, भांडी. जरा सिंकमध्ये डोकावून बघ बाई. कधीपासून आम्हाला पाण्यात ठेवलेस. कुडकुडून गेलो की आम्ही! लवकर स्वच्छ करून ठेव बाई, या थंड पाण्यातून! उन्हाळा असता तर काही वाटलं नसतं; थंडीच नको वाटतं बाबा." सिंकमधून आवाज आला आणि मी खूप घाबरले.

"बाई गं, काही भुताटकी शिरली की काय सिंकमध्ये? राम! राम...!" घाबरून मी मनात रामचं नाव घेत हळूच सिंकमध्ये डोकावून पाहिले आणि काय आश्चर्य!

सगळी भांडी कुडकुडत माझ्याकडे केविलवाण्या नजरेने पाहत होती. माझे डोळे जागीच विस्फारले गेले. हे स्वप्न आहे की भास आहे म्हणून मी डोळे चोळत पुन्हा एकदा पाहिले; पण ते सत्य होतं.

"अगं बाई, अजून असंच बघत बसणार आहेस का? धुवून घे की पटकन आम्हाला?" कपबशीचे जोडपं म्हणाले.

"व्हयं बाई, ह्या मेल्या कुकरची नजर चांगली नाही. मगाशी मला बघून सारखा शिट्टी वाजवत होता आणि आता पण बघा की कसा रेटून बसला आहे." बशीने माझ्याकडे कुकरची कागाळी केली.

"काय? त्याची एवढी हिंमत! मी असताना त्याने तुला पाहून शिट्टी वाजवली." कपाने रागाने बशीला विचारले.

"अगं, ए कपबशी, गप्प बसा रे, तुम्ही!कधीपासून तुमच्या तोंडाचा पट्टा चालू आहे. ए बशी, मी काय तुला बघून शिट्टी वाजवत नव्हतो. मला जळत्या गॅसवर ठेवलं म्हणून मी ओरडत होतो. ज्याचं जळत त्यालाच कळतं." कुकर तोंड वाकडं करत कपबशीला म्हणाला.

"बरोबर आहे रे तुझं. माझ्यातही जेव्हा उकळता चहा ओततात ना, माझ्या अंगाचीही लाहीलाही होते. वरून माझे कान पण कसेही धरतात." कपही तोंड बारीक करून म्हणाला.

"होय रे, तुझ्यातून मग माझ्यात चहा ओततात थंड करण्यासाठी. लय जाम चटके बसतात राव!" बशीही आपली व्यथा सांगत म्हणाली.

"तुम्हा दोघांचं एक बरं आहे रे, तुम्हाला नंतर ओठांना लावून फुंकर तरी घालतात. पण आमचं कुठे तेवढं नशीब!" कुकरला कपबशीचा हेवा वाटला, म्हणून तो नाराजीने कपबशीला म्हणाला.

"हो बाबा, तेवढी एक गोष्ट चांगली आहे, प्रेमाने फुंकर घालून ओठांना लावतात. पण ती फुंकर आम्हाला थोडीच असते. ते तर त्या चहासाठी असतं." कपबशी एकसाथ म्हणाले.

मी मात्र त्यांचे संभाषण ऐकून चाटच पडले. मग मी पटपट त्यांना धुवून लगेच त्यातील पाणी निथळायला भांड्याच्या जाळीत ठेऊ लागले तर कप ओरडला, "अगं ए, किती जोराने माझा कान पिळलास आणि आता पण कशी आपटतेस गं? जरा प्रेमाने ठेव की बाई."

"अय्यो, सॉरी बरं. तुम्हीच म्हणालात ना, थंडी वाजतेय म्हणून मग थोडी घाई केली. इथून पुढे लक्षात ठेवेन हं मी. तुम्हा सगळ्यांशी प्रेमाने वागेन." मी त्या कपाला प्रेमाने कुरवाळत म्हणाले.

"काय गं, त्यालाच प्रेम देणार काय? आम्ही काय मांजर मारले आहे काय गं?" कुकर लगेच हॅंडल नाचवत म्हणाला.

"अरे बाबा, तू नीट ऐकलं नाहीस वाटतं. मी तुम्हा सर्वांशीच प्रेमाने वागेन. असं म्हटलं ना मी! तुम्हीही एकमेकांची कागाळी करू नका. आनंदाने राहा." मी कुकराला प्रेमाने समजावत त्यालाही धुवून जाळीत ठेवत म्हणाले.

"बरं बाई, तुझ्यासारखं आम्हाला प्रत्येकाने समजून घेतलं तर किती छान होईल ना." स्वच्छ झालेला कुकर आनंदाने म्हणाला.

"हो ना, माणसांनी असं एकमेकांना समजून घेतलं तर किती छान होईल ना..." मीही विचार करत म्हणाले.

"हो ना..." सगळी भांडी एकसुरात म्हणाली आणि मी झोपेतून जागी झाली.

©️ जयश्री शिंदे

सदर कथा पूर्णतः काल्पनिक आहे.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →