जायचं नाही भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगांवकर
" जायचं नाही, स्वाती ताई येणार आहे परवा मुलांना घेऊन. मुलांना सुट्ट्या लागल्या आहेत म्हणून. तू गेलीस तर इथे काम कोण करणार ? ते काही नाही, ताई असेपर्यंत तू माहेरी जायचं नाहीस. " रत्नाबाई मोनालीला म्हणजेच आपल्या सुनेला कडक शब्दात बोलत होत्या.
" अहो आई, असं काय करताय ? गेल्या दोन वर्षांपासून तुम्ही हेच बोलताय. उन्हाळाच्या सुट्ट्या लागल्या की ताई येतात, दिवाळीच्या सुट्टीत येतात, अगदी गणपतीच्या सुट्टीत सुद्धा येतात. आणि त्या आल्या की मी जायचं नाही. मग मी जायचं कधी ? माझ्या मुलांना सुद्धा तेव्हाच सुट्ट्या लागतात ना ? मग मी कधी जायचं ? जशी ताईंना तुमची आणि तुम्हांला ताईंची आठवण येते, भेटावसं वाटत. तसंच मला आणि माझ्या आईला सुद्धा वाटत असेलच ना ? आणि माझ्या सर्व चुलत - मावस बहिणी येणार आहेत. थोडे दिवस बाहेर एकत्र फिरायला जायचा प्लॅन बनवला आहे सर्वांनी. " मोनालीने आज बोलायच ठरवलंच होत.
" सरळ सांग ना, स्वाती इथे आलेली तुला आवडत नाही. माझ्या मुलीशी तुझी तुलना करू नकोस. कळालं ? आणि ताई गेली की जाऊन ये दोन दिवसात. पण दोन दिवसात परत यायचं. मला आता काम होत नाहीत. " रत्नाबाईंनी सरळ हात वर केले.
" ताई इथे महिना - दीड महिना राहणार ? आणि की दोन दिवसात यायचं ? " मोनाली.
"हो मग माझ्याकडून काम होत का आता या वयात ? काही तरी वाटू दे तुला. दोन दिवसांची परवानगी देतेय ना मी. " रत्नाबाई.
' मग ताईंच्या सासूबाईंचं सुद्धा वय झालं आहे, तरी माहेरी महिना दोन महिने राहतातचं ना ? तेव्हा हे ज्ञान स्वतःच्या लेकीला का नाही देत ? की तूझ्या सासूच सुद्धा वय झालं आहे. तू इथे जास्त राहिलीस तर त्यांना त्रास होईल काम करून. ' मोनाली मनातल्या मनात म्हणाली. मोनालीला खूप राग येत होता पण जास्त बोलून वाद वाढवायचा नव्हता तिला.
" तोंड काय बघत उभी आहेस ? जा कामाला लाग. ताई उद्या सकाळी येणार आहे. तिच्या आवडीचं सर्व बनव. काही नसेल ते मागवून घे. " रत्नाबाई मोनालीला सूचना देऊन गेल्या.
हे आता दरवेळचं झालं होत. स्वाती सुद्धा आली की पाय पसरून बसायची. मुलं धुडघूस घालायची. सर्वांचं सर्व मोनाली करायची. तिला सुद्धा वाटायचं की थोडे दिवस आईकडे जाऊन यावं. पण रत्नाबाई नेहमी खोडा घालायच्या. ना त्यांना ना त्यांच्या लेकीला असं वाटायचं की ' स्वाती असेपर्यंत आठवडा - पंधरा दिवस राहून ये. ' असं बोलावं. नेहमीच्या त्रासाने मोनाली पुरती कंटाळाली होती. याचा कायमचा निकाल लावायचा असं मोनाली ठरवते.
मोनाली एक कॉल करते आणि काही बोलून फोन ठेवते. त्यानंतर तिच्या चेहऱ्यावर एक गूढ हसू येत.
क्रमश :
मोनालीने कोणाला कॉल केला होता ? मोनाली नक्की काय करणार आहे ? सासूबाई आणि स्वातीमध्ये फरक खरंच पडेल का ?
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
