Login

जावई दशमग्रह

बालपणीच्या संस्कारांचे महत्त्व
लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल 2026
विषय- निर्लज्जम सदासुखी

जावई दशमग्रह

"मी हक्क सोड पत्रावर सही केलीय अगोदरच." नेहाने बॉम्बस्फोटच केला.
काय सारखं सारखं तेच तेच...तुझा हिस्सा माग ...तुझा हिस्सा माग .
कंटाळली होती ती. स्वतः काही करायचे नाही. आयत्या पिठावर नागोबा.
आज तिच्या संयमाचा अंत झाला होता. उठ सुख माहेरी, उठ सुख माहेरी ‌.मुलांच्या शिक्षणाची काळजी नाही.
आणि माहेरी मिळणारा मानही संपलेला. रोज मरे त्याला कोण रडे? रोजच जर मुलगी जावई घरी येऊन बसलेत तर कोण विचारणार ना?

नरेन अतिशय ऐदी. भाग्याने साथ दिली तोवर निभलं.
घरात चार पिढीची इस्टेट. घरचं थोडं की काय तर त्याच्या आईला माहेराहून मिळालेलं वेगळंच.

नीट राहिला असता तर काही न करता ही आरामात जगला असता.
पण म्हणतात ना अशी इस्टेट लाभी नसते.
एकुलता एक पोरगा कुठे ठेऊ आणि कुठे नाही? मायबापाने फुलासारखं वागवलं.
मुलगा म्हणतो," शाळेत जायचं नाही, कंटाळा आला."
तर आई म्हणायची," राहू दे बाबा झोप माझ्या राजा."
लाड पुरवता पुरवता आई संस्कार द्यायला विसरली.मुलगा शिकलाच नाही.
अशा मुलाला मुलगी कोण देणार?
आईने भावाचीच मुलगी सून करुन घेतली.
इस्टेट म्हणजे काही समुद्राचं पाणी तर नाही आटणार नाही म्हणून.
त्यात पैशा पाठोपाठ येणारे सगळेच शाही शौक.जे शिकवावे लागत नाहीत.
एकदा ओहोटी लागली ती लागली.
बाप समजावून थकला.शेवटी मायबाप दोघेही राहिले नाहीत.

घरात धड खायला नाही.मुलांची शिक्षणं कशी करणार? रोज भांडणं.

आता त्याने बायकोला मारहाण सुरू केली.
येऊन जाऊन तिच्या माहेरी जाऊन राहायचे.इकडे कर्जाचे डोंगर उभे केलेत.ते मनाला येईल तसे बोलायचे.शिव्या घालायचे.

जावई दोन दिवसाचा पाहूणाच बरा वाटतो. पाहुण्याची सरबराई होते.
तो राहायला येऊन बसला म्हटल्यावर कुठला मान राहिला?

भावजया सुद्धा नेहाचा दुस्वास करायला लागल्या.
आई-वडिलांनाही पोरगी जड झाली होती.

ती नवऱ्याला किती समजवायची. आपल्या घरी जाऊ.मीठ भाकर खाऊ .कष्ट करून पोट भरु.

पण हा ऐदी त्याच्याकडून कष्टाची अपेक्षा करणे गैरच होते.

घरी गेल्यावर कर्जवसुलीसाठी येणारे...त्यांचा मुकाबला कसा करायचा?
इकडे आड तिकडे विहीर.त्यापेक्षा त्याने आयते खाणे पसंत केले.

तो निर्लज्जासारखा तिथेच राहायचा. बायकोचे म्हणणे उडवून लावायचा. त्याला कुणाच्या बोलण्याचे काहीच वाटत नव्हते.

'निर्लज्जम सदासुखी' म्हणतात तशी गत.
आता तर इस्टेटमध्ये हिस्सा माग म्हणून तगादा.
नेहा चतुर होती. तिला माहिती होते ही इस्टेट पण हा उधळून लावेल.
तिच्या नावाचं जे काही होतं ते आई-वडिलांनी तिच्यासाठी राखून ठेवलेलेच होते .कारण तिचं भविष्य त्यांना समोर दिसत होतं.

पण आज देऊन उपयोग नव्हता. नेहाला सुद्धा हे कळत होतं.

शेवटी एक दिवस त्याने दारू पिऊन धिंगाणा घातला तेव्हा नेहाच्या भावाने त्याला बखोटं धरून घराबाहेर काढलं ते कायमचंच.नाईलाज होता.

नरेन मुळे त्यांच्या घरातील वातावरण ढवळून निघत होतं.
त्यांच्या घरात वाद विवाद वाढले होते.

नरेन आता रस्तोरस्ती फाटक्यासारखा फिरत होता.
वैभव पचवायलाही भाग्य लागते म्हणतात.
एकेकाळी वैभवात वाढलेला लाडला आज रस्त्यावर फाटक्या कपड्यात फिरत होता.
आता आईला दोष देत फिरतो. म्हणतो,
" आई असती तर तिच्या कानाला चावलं असतं आणि सांगितलं असतं त्यावेळी तू माझं ऐकलं नसतं मला शिक्षा केली असती तर आज ही वेळ आली नसती."

आई म्हणून तुम्ही काय करता...? नरेनच्या आईसारखी आई ...माझा एकुलता लाडला...बघा ठरवा...
समाप्त
©®शरयू महाजन
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →