Login

जशास तसे - भाग १

कधी कधी जशास तसे वागलेले बरे असते. नाहीतर लोकं आपल्या चांगुलपणाचा गैरफायदा घेतात.
जशास तसे - भाग १


"अग काय हे तुझं वागणं! तुला साधं घरात कोणी आलेलं सुद्धा सहन होतं नाही का?"
अमितच तिच्यावर रागारागात बोलणं सुरु होतं आणि ती मात्र त्याच्याकडे जरा सुद्धा लक्ष न देता आपलं आपलं काम करण्यात मग्न होती.


"स्वाती, अग तुझ्याशी बोलतोय मी!"
अमित अजूनही तिच्याकडे बघून चिडून बोलत होता.


"मला आज अजिबात काही सांगू नका. मी खूप बिझी आहे. मला आधीच घरात कामं कमी आहेत का? आणि त्यात भर म्हणजे तुमचे ते नको असलेले पाहुणे!"
स्वाती तिचे हातातले काम करता करता बोलत होती. तिला मान वर काढायला पण उसंत नव्हती इतके काम पडले होते.


"हे काय उत्तर झालं का? मी काय बोलतोय त्याकडे आधी लक्ष दे. आणि नको असलेले म्हणजे काय ग? पाहुणे हे पाहुणे असतात.. त्यात आवडते आणि नावडते काय? तसेही माझ्याकडचे पाहुणे आल्यावर तुझं तोंड नेहमी वाकडंच असतं."
अमित आता त्याच्या मनात असलेलं बोलत होता. त्याला आज काय तो सोक्ष मोक्ष लावूनच टाकायचा होता.


"माझं तोंड वाकडं? मग माझं तोंड वाकडं का होतं? ह्याच उत्तर सुद्धा तुम्हाला माहिती आहे; त्यामुळे मला जास्त बोलायला नका लावू. उगाच आपल्यात भांडणं होतील. आणि तिसऱ्याच कोणा व्यक्तीमुळे आपल्यात भांडणं झालेलं मला आवडणार नाही; त्यामुळे मी शांत राहते."
स्वाती अजूनही तिच्या या वागण्यावर ठाम होती, कारण तिला वाटतं होते की ती जे वागली ते अगदी बरोबर होते आणि अमित उगाच तिच्यावर चिडचिड करत आहे.


"काय प्रोब्लेम काय आहे तुझा नेमका? नाही आज मला कळूच दे! तिकडचे कोणी आले की नेहमी तू त्यांना टाळत असतेस. त्यांना जेवायला थांबवत नाही की त्यांची उठबस करत नाही. मध्येच उगाच काहीतरी कुचक्या सारखं बोलून निघून जातेस. काय वाटतं असेल त्यांना?"
अमित बिचारा काळजी करत बोलत होता.

"काही वाटतं नाही त्यांना! आणि काही वाटलंच असतं तर उगाच परत परत आले नसते ते आपल्या घरी. उठलं सुटलं की आलेच तोंड घेऊन. जरा सुद्धा काही वाटतं नाही त्यांना, की समोरच्यांना नाही आवडत आपण त्यांच्या घरी गेलेलं मग नको जायला.. पण नाही! येतातच ते काही ना काही कारण घेऊन. कशाला येतात देव जाणे."
स्वातीच्या तोंडाचा पट्टा सुरूच होता.


"स्वाती आता बास हा! मी ऐकून घेतोय म्हणजे तू काहीही बोलशील का त्यांच्याबद्दल! मी अजिबात असलं काही ऐकून घेणार नाही."
अमित आता जास्तच जोरात बोलत होता; त्यामुळे स्वातीचा पण आवाज थोडा चढला.

"मग मी काय ठेका घेऊन ठेवला आहे का सगळ्यांचा! जो तो येतो आपली सोय बघतो. इथे काय.. मी आहेच घरातली आयती नोकर! स्वाती हे दे ग, ते दे ग.. बसल्या जागी सगळं आणून देते हा. माझ्या मदतीला म्हणून तुम्ही स्वतः तरी उठतात का कधी?"
स्वाती पण आता चांगलीच चिडली होती. अमितला असे बोलल्यावर तो सुद्धा तिच्यापुढे काही बोलू शकत नव्हता.


क्रमशः


सौ तृप्ती कोष्टी ©®
रायगड


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →