भाग १पुन्हा तुझ्या बहिणीला पैसे पाठवलेस. एक-दोन वेळा ठीक आहे, पण असं सारखं सारखं केलेलं मला चालणार नाही.नवऱ्याचे हे बोल ऐकून सुमनला वाईट वाटलं. ती नवऱ्याला म्हणाली, "अहो, नेहमी नेहमी कुठे? गरज असेल तरच मी देते."नवरा म्हणतो, "मान्य आहे की तुझ्या मोठ्या बहिणीला पैशांची अडचण आहे. पण म्हणून दरवेळी आपल्या खिशातून देणं आपल्याला नाही परवडणार. तिने आता स्वतःची सोय बघायला हवी."हे ऐकून सुमन म्हणाली, "अहो, तिने आजपर्यंत कधीही माझ्याकडे एक दमडीही मागितलेली नाही. तेवढी ती स्वाभिमानी आहे. पण तिची एकंदरीत परिस्थिती बघता मीच स्वतःहून बळजबरीने तिच्या हातात पैसे टेकवते. कारण शेवटी बहिण म्हणून माझंही काही कर्तव्य आहेच ना."नवरा म्हणतो, "हो, कर्तव्य आहे ना. हवं तर तू तिला दुसरी मदत कर. तिच्या घरी जा, तिला घरकामात मदत कर, तिच्या मुलांसाठी काहीतरी कर. पण ही जी तू मदत करते ना, ती मी कमावलेल्या पैशातून करते आहे. त्यामुळे माझ्या जीवावर दुसऱ्यांना मदत करत जाऊ नकोस."शेवटी मुद्दा पैसे कमावण्यावर आल्यावर सुमनला शांत बसावं लागलं. तिला नवऱ्याचा रागही आला की शेवटी नवऱ्याने दाखवूनच दिलं की घरात तो कमावून आणतो आणि त्याच्यावर त्याचाच हक्क आहे.सुमनने पर्समध्ये ठेवलेले पैसे पुन्हा नवऱ्याच्या हातात दिले आणि तिथून रागाने निघून गेली.नवऱ्यानेही विचार केला, "जाऊ दे, बरंच झालं. राग आला तरी चालेल. पण शेवटी कितीही म्हटलं तरी पैशाचं सोंग घेता येत नाही."त्याच दिवशी संध्याकाळी ऑफिसमधून परत आल्यानंतर सुमनच्या नवऱ्याला माळ्यावरून एक फाईल काढताना एक डायरी दिसली. डायरी बरीच जुनी होती. त्याने ती सहज झटकली आणि तारीख बघितली. तारीख आणि साल त्याच्या लग्नाच्या वर्षीचं होतं.मग त्याच्या लक्षात आलं की ऑफिसमध्ये त्यांना जी डायरी मिळत असे, ती डायरी त्याने आपल्या बायकोला, म्हणजेच सुमनला, वापरायला दिली होती. त्या कंपनीचं नाव आणि लोगो त्याला दिसला आणि जुन्या आठवणी ताज्या झाल्या. त्याला आठवलं. ही साधीशी डायरी बायकोला दिली तरी ती किती खुश झाली होती.त्याने डायरीवरची धूळ झटकली आणि तिची पानं उलथून पाहिली. त्या डायरीमध्ये लिहिलेला मजकूर बघून त्याला धक्का बसला. तो दोन पावलं मागे सरकला आणि त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली.असं काय लिहिलं होतं त्या डायरीमध्ये, ज्यामुळे त्याच्या डोळ्यांत पाणी आलं आणि त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली...?क्रमशः...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
