Login

जांभूळ आख्यान

शॉर्टफिल्म

शॉर्टफिल्म लेखन स्पर्धा जुलै 2026

जांभूळ आख्यान

(पात्र: वसंत, रमा आणि किट्टू)

वसंत: (जांभूळ खात, गुणगुणत असतो) "हो जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी..."

रमा: (घामाघूम होऊन आत येते) "ठेवा ती जांभळं बाजूला. खाली रिक्षा उभा आहे, त्यातून पिंप घेऊन या आधी वर."

वसंत: "पिंप?"

रमा: "आधी घेऊन या, मग सांगते..."

वसंत मोठा पाणी साठवण्याचा बंबा किंवा पिंप घेऊन येतो.

वसंत: "अगं, कशासाठी आणला हा बंबा? दोन आहेत ना आपल्याकडे ऑलरेडी...काहीही खर्च करायचा, उगाच..."

रमा : (रागात) "उगाच काही नाही. हे तुमचे जांभळं सांगत आहेत म्हणून आणला."

वसंत हसायला लागला आणि हसतच म्हणाला,
" बरं वाटत नाही आहे का तुला? डॉक्टरकडे जायचे का?"

रमा अजूनच चिडली.

रमा: तुम्हाला काय वेडी वाटते का मी? अहो, यंदा बाजारात किती जांभूळ आलेत.
दरवर्षी असतात का कधी एवढे जांभूळ?
एक दोन वेळा आणायचे ना तुम्ही फक्त.
आणि आता बघा आठवड्यात तीन वेळा आणले तुम्ही, म्हणजे जांभळांचे पीक खूप आहे यंदा..."

तिचा बोलण्याचा धबधबा थांबवत वसंत म्हणाला,
"अगं बाई, बंब्याचा आणि जांभळांचा काय संबंध?"

रमा काही बोलणार तोच किट्टू आली.

किट्टू म्हणजे उत्साहाचे कारंजे.

आल्या आल्या "मामी, मै आगयी" म्हणत रमाच्या गळ्यांत पडली.

किट्टू रमा आणि वसंतची लाडकी भाची.
मुंबईहून पुण्याला एक दिवसासाठी कामानिमित्त आली होती.
तिला बघून रमा आणि वसंत यांना देखील खूप आनंद झाला.

ते काही बोलणार, विचारणार तोच किट्टू म्हणाली,
"अरे मामा, इतका मोठा पिंप? मोठ्ठा कार्यक्रम आहे वाटतं काहीतरी. आणि मला काहीच माहिती नाही, आमंत्रणही नाही.."

वसंत: "ए बाई, आता तू सुरू नको होऊस.
पिंप म्हणजे राज की बात झालाय.
मलाही माहिती नाही काही.
जांभुळ आणि पिंप कनेक्शन समजतही नाही आहे.
मामीलाच विचार तुझ्या."

रमा मोबाईल मध्ये डोकं खुपसून बसली असते.

रमा: "दोघांनीही मेसेज चेक करा बरं जरा, आताच तुम्हाला पाठवले मी."

दोघेही मेसेज बघतात आणि एकमेकांकडे बघून गालातल्या गालात हसतात.

रमा: "समजले का आता पिंपाचे रहस्य?
यावर्षी जांभुळ खूप पिकलेत म्हणजे निसर्ग काहीतरी सिग्नल देतो आहे.
ही नांदी आहे दुष्काळाची.
असे खूप मेसेजेस येत आहेत सोशल मीडियावर.
बरं झालं मी मेसेज वाचते आणि रिल्स बघते म्हणून. योग्य खबरदारी घेता येईल"

वसंतने डोक्यावर हात मारला.

वसंत: "अगं असं काही नसतं. याला काही प्रूफ आहे का किंवा शास्त्रीय आधार आहे का?"

रमा: "शास्त्रीय फास्त्रीय काही मला सांगू नका तुम्ही.
तुम्हाला काही कळत नाही.
काहीतरी निसर्गाचा संकेत आहे, तो जाणणारे लोक आहेत म्हणून मेसेज पाठवून लोकांना अलर्ट करत आहेत.

किट्टू, तू पण घे बाई एखादा पिंपं. पाणीकपात कधीही होऊ शकते.
आणि हो, धान्यही भरून ठेव.
महागाईपण वाढणार दुष्काळामुळे."

किट्टू मामीजवळ जात लाडाने तिचा गालगुच्चा घेत म्हणाली,
"किती भोळी आहेस गं तू मामी.
अगं असे काही नाही होणार.
सोशल मीडियावर किती विश्वास ठेवायचा आणि किती नाही हे आपल्याला कळायला हवं गं.
तूच नाही असे बरेच लोकं आहेत अगदी डोळे बंद करून सोशल मीडिया किंवा गुगलच्या माहितीवर विश्वास ठेवणारे.
आपलं लॉजिक वापरायला हवं, एका लिमिटपर्यंत या मीडियावर विश्वास ठीक आहे पण अतिरेक नको ...."

रमा: "तू ही मलाच बोल. (वसंत कडे बोट दाखवत) हे एक कमी होते बहुदा म्हणून तू पण मलाच मूर्ख ठरव.
मेसेज पाठवणाऱ्यांना काही समजतच नाही नं, ते पण मूर्खच आहेत, हो नं?"

किट्टू: "अगं असं नाही गं मामी...."

तिला मध्ये थांबवत रमा : "तूच सांग मग आता का आली इतकी जांभळं यावर्षी."

किट्टू: "जांभळं दरवर्षीच येतात पण पाऊस पडला की गळून पडतात आणि म्हणून आपल्याला कमी दिसतात पण यावर्षी पाऊस उशीर करतोय म्हणून जांभळं भरपूर दिसत आहेत."

वसंत: "तेच तर. मी कितीदा सांगतो हिला की सोशल मीडियाचा अतिरेक करू नकोस. पण ही ऐकेल तर शप्पथ ना..."

रमा रागाने वसंतकडे बघते.

वसंत किट्टूला : " तुला गम्मत सांगतो किट्टू, केस गळू नयेत म्हणून ज्या रील मध्ये जो उपाय सांगितला, ज्या पावडरी, तेलं सांगितले त्या सगळ्यांचा भडिमार हिने केला.
हिचे केस गळणे तर बंद झालेच नाही पण उलट या महागड्या उपायांपोटी महिन्याचे बजेट हलले, वाढले आणि माझे केस गळून टक्कल पडायला सुरुवात झाली बघ."

किट्टू आणि वसंत जोरात हसायला लागले.

रमा: "उडवा माझी. नाहीतरी माझी किंमतच नाही कुणाला या घरात."

असा नेहमीचा डायलॉग मारून नवीन आणलेला पिंप घेऊन रमा आत निघून गेली.

आठ दिवसानंतर वसंत पुन्हा गाणं गुणगुणत होता, 'जांभुळ पिकल्या झाडाखाली ....'

रमा बाल्कनीत खुर्ची टाकून हताश बसली होती.

तिकडे जात तिच्याकडे बघत हसत वसंत गण्यातली पुढची ओळ गाऊ लागला,
'हो येंधळं येडं बाळं कुणाचं, झिम्मा फुगडी घालं जी... '

तो आपल्याला इंडिरेक्टली वेंधळी म्हणून हसतो आहे हे लक्षात येऊन रमा फुरगुटून बसली.
आणि समोर पडणारा धो धो पाऊस बघू लागली.

वसंत तिच्या बाजूच्या खुर्चीवर पेपर वाचू लागला.

वसंत: "आजची ताजा खबर. मुंबई आणि पुण्यात पावसाचा कहर.
पूर सदृश्य परस्थिती.
जागोजागी पाणी तुंबले.
जनजीवन विस्कळीत.
शाळांना सुट्टी जाहीर."

पेपर बाजूला ठेवून रमाला चिडवीत म्हणाला,
"काय करावं बरे या पावसाचं. विचारतेस का तुझ्या त्या जांभळांना? हवामानाचा काही अंदाज सांगतात का ते बघ."

रमाने चिडून त्याला खुर्चीवरची उशी फेकून मारली.

वसंत हसत होता तिला चिडवीत होता.

तेवढ्यात किट्टूचा फोन आला.

किट्टू: "मामी तुझी जांभळं हवामान खात्यासारखीच निघाली गं. सगळे अंदाज चुकीचे. आमच्या मुंबईत तर पूर आलाय पूर. पाऊस कधी थांबतोय याची वाट बघतोय आम्ही.
तुझ्या जांभळांना सॉरी म्हणायला सांग यार मामी, तेव्हाच हा रागावलेला पाऊस शांत होईल बहुदा.
तू, तुझी जांभळं आणि त्यांची भविष्यवाणी सगळेच ग्रेट आहात बाबा"

किट्टूने असे म्हणताच रमाच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य पसरले.

कदाचित तिलाही तिच्या अतिरेकी सोशल असण्यातली फोल कळली होती.

ती हसली आणि म्हणाली,
"अगं किट्टू, आता नवीन भविष्यवाणी केली आहे जांभळांनी..."

वसंतही कान टवकारून ऐकू लागला.

रमा: "तर नवीन भविष्यवाणी आहे की, ज्यावर्षी जास्त जांभळ येतीलं, त्यावर्षी जास्त पाऊस पडेल."

आणि तिघेही हास्यकल्लोळात बुडून गेले.

समाप्त।

(सोशल मीडियाचा वाढता वापर बऱ्याच अफवांचे पीक निर्माण करतो आहे, समाजात गोंधळ निर्माण करीत आहे.
प्रत्येक समाजघटकाने जागरुक राहून सोशल मीडियाचा अतिरेकी वापर टाळला पाहिजे. नाहीतर यातूनही सामाजिक भान नाहीसे होण्याची, सारासार विचार करण्याची कुवत गमावण्याची समस्या निर्माण होईल.
तेव्हा प्रत्येकाने सजग राहूया, सोशल मीडियाचा योग्य वापर करूया।)
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →