Login

जगावेगळी अंतिम इच्छा

हेकेखोर, विक्षिप्त स्वभावामुळे झालेले नुकसान
लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल 2026
विषय - अंतिम इच्छा
जगावेगळी अंतिम इच्छा

"मला माझ्या नवऱ्याशी बोलायचं आहे.खूप अन्याय केलय मी त्याच्यावर.क्षमा मागायची आहे त्याची."

रेवतीने आपली अंतिम इच्छा लिहिलेला कागद लिफाफ्यात बंद करून तिच्या टेबलवर ठेवला होता.
रेवती कॅन्सर सारख्या दुर्धर रोगाशी झुंज देत होती.

ती गेल्यानंतर तिच्या एकुलत्या एक मुलीनी तो लिफाफा उघडून बघितला आणि...
तिचे डोळे भरून आले.

कुणी अडवलं होतं?
जेव्हा होता तेव्हा कशी वागलीस त्याच्याशी? साधं बोलणं तर सोडच, त्याला जगणं नकोसं केलंस.

तो तर देवमाणूस.सगळं समभावाने सहन करत राहिला. न कुरकुर करता, कुणाला दोष न देता, आनंदाने जगत राहिला.

एवढ्या अल्प आयुष्यात
अत्यंत समाधानाने सत्कर्म करत, सर्वांसाठी सगळं यथास्थित करून सर्वांच्या हृदयात आपली जागा ठेवून सहजतेने अलविदा करता झाला...

तेव्हा मी आठ वर्षांची होते.अधेड वय असलं तरी कळत होतं मला.

"बाबाच माझं विश्व होता.
माझं सगळं तोच करायचा.कळत नव्हतं तेव्हा आंघोळी पासून शी सू पर्यंत सगळंच.
नंतर कळायला लागल्यापासून मी करायचे.पण तो शाळेत जातांना छान तयार करून द्यायचा मला.मस्त दोन चोटीपण घालून द्यायचा.
तू फक्त टिफीन बनवून द्यायचीस.त्यातही तो तुला मदत करायचा.दाळ तांदूळ धुवून ठेवणे,भाजी चिरून ठेवणे त्याचेच काम.

पण तो सर्व आनंदाने हसतमुखाने करायचा. मला शाळेत घेऊन जाणे, घेऊन येणे, धार्मिक वर्गाला घेऊन जाणे, घरी शिकवणे त्याचेच काम.
तोच रात्री मला छान छान गोष्टी सांगून झोपवायचा.

सगळ्या नातेवाईकांना प्रिय होता तो कारण त्याचं हेल्पिंग नेचर त्याचा साधा सरळ स्वभाव.
मला घेऊन सगळ्यांशी व्हिडिओ कॉल वर बोलायचा तो.

त्याचं बोट धरूनच मार्गक्रमण चालू होतं माझं. तोच... अचानक एक्झिट घेतली गं त्याने.
माझं भावविश्व ढवळून निघालं.
समजेना काय घडतेय ?काय करावे?

त्यात तो मामा कंसाच्या आणि शकुनी मामाच्याच जातकुळीतला.

बाबाचे प्रेत दवाखान्यातून घरीही यायचे राहिले होते तेव्हा मला सांगत होता ,

"बाबा देवा घरी गेला ...आता विचारायचे नाही... आता बाबा ची आठवण काढायची नाही ...त्याचे नावही घ्यायचे नाही.आईला त्रास द्यायचा नाही."

मला त्या निष्पाप वयात कळेना गं मी नेमकं काय करू? ज्याने माझं भावविश्व व्यापलं होतं, त्याच्याबद्दल काही काही बोलायचं नाही,विचारायचं नाही.

चुकून कधी काही विचारलं तर मामा मला रागवायचा ,"तुला काय सांगितले मी." म्हणत.

अगदी पहिल्याच दिवशी तू आणि तो मामा यांना फक्त पैसा हवा होता.सगळं दुःख विसरून गेले तुम्ही.

बाबांना जाऊन पुरता दिवसही लोटला नव्हता, काही तास झाले होते फक्त ,तर तुम्ही सगळे फाईल बाडबिस्तान काढून बसलात.

जे काम पुढे दोन दिवसांनी पण करता आले असते किंवा घरच्या लोकांनी केले असते ‌.

तरी आजीआजोबा शांत राहिले.कारण पुत्रवियोगाचे दुःख.

किती कष्ट सहन करून, जीवनात संघर्ष करून ,आपली हौसमौज बाजूला ठेवून पोराला शिकवले, घडवले.

त्यांच्यावर तर दुःखाचा डोंगरच कोसळलेला होता. शब्दातीत होतं त्यांचं दुःख.
ते नि:शब्द.डोळ्याला धारा लागलेल्या. काय बघतोय आपण समोर...?
तू त्या दिवशीच नातं तोडलंस गं त्या लोकांशी. तुमचं पुढचं सगळं प्लॅनिंग झालेलं होतं.फक्त एक देखावा म्हणून,शेवटचे सोपस्कार पुर्ण होईस्तोवर तू थांबलीस गावाकडे.
त्यानंतर तुला माहेर जवळचं वाटलं.

पण एकदा लग्न झालं की मुलगी माहेरी परकी होते हे विसरून गेलीस तू .
तिथेही जेव्हा चटके सोसावे लागले तेव्हा आपली अलग चुल मांडलीस.

'मोडेन पण वाकणार नाही' हा तुझा बाणा. विक्षिप्त स्वभाव...

पण त्याची झळ मला सोसावी लागली.खूप चटके सोसलेत
आजी आबा ,मोठे आई, बाबा सगळे नातेवाईक दूर केलेस तू.

बाबा तर गेलाच होता गं दूर ...
पण मला जी लोक जवळची वाटत होती त्यांना तू दूर केलंस माझ्यापासून...

त्यांच्या माझ्या भेटीत तू अडसर निर्माण केलेस.पूर्णतः खलनायकी भूमिका निभवलीस तू.

तू बाबाच्या माघारी एकटीने वाढवलंस मला म्हणून आणि जन्म दिला म्हणून ,एक आई या नात्याने तुझ्याविषयी खूप प्रेम,आदर मनात आहे....

तरी मनात खोलवर कुठेतरी का होईना पण अढीची गाठ निश्चित आहे.

आई आपल्या घरचे लोक खूप चांगले होते गं...पण त्या चांगल्या लोकांना खूप यातना दिल्यास तू.

तू त्यांच्याशी एवढं वाईट वागूनही आणि त्यांचा मुलगा या जगात नव्हता तरी त्यांनी कधीच चुकीचे पाऊल उचलले नाही .
आधीपासून जशी त्यांनी प्रेमाची वागणूक दिली, तिच कायम होती शेवटपर्यंत.

आता तू गेल्यानंतर मी एकटी पडेल किंवा पोरकी होईल असं तरी कसं म्हणू?

कारण जी आपली माणसं तुझ्यामुळे माझ्यापासून दुरावली होती त्यामुळे एकटेपण जाणवायचं.पण तुझ्याजवळ व्यक्त होता येत नव्हतं.तू झिडकारून टाकायची त्यांना.

आई, तुला माझ्याही भावना नाही समजल्या...हे दुर्दैव.

ती माणसं आजही माझ्या जवळ आहेत उलट त्यांच्या सहवासात आनंदाने राहील मी.

आता तुझी अंतिम इच्छा...

अगं कसं शक्य आहे गं ते?

तू तुझ्या दृष्ट वागणुकीने कोणती गती बांधलीस हे तळहातावरच्या फोडा इतकंच ढळढळीत सत्य आहे.

आणि बाबा!तो तर कधीच सद्गतीला गेलाय.

त्याची तुझी भेट......अशक्य...अशक्.....

आई! तू इतकी जगावेगळी अंतिम इच्छा व्यक्त केलीस ना की....

जी कधीच पुर्ण होऊ शकणार नाही.
समाप्त
©®शरयू महाजन
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →