Login

इश्क तेरा... भाग:४०

क्रिस जुलियानाच्या लग्नाची तयारी
इश्क तेरा...
भाग: ४०


रोजच्या प्रमाणे रोमा जिममध्ये व्यायाम करत होती. तिचे शरीर जरी व्यायाम करत असले तरी मन मात्र कुठेतरी हरवलेले होते. तिचे हात न थांबता चालतच होते. विशाल तिला पाहत होता.

"मॅडम..." तिला न थांबलेले पाहून विशालने हाक मारली.
पण रोमापर्यंत त्याचा आवाज पोहोचलाच नाही. ती आपल्याच विचारात मग्न होती.
"मॅडम, तुमचा सेट पूर्ण झाला आहे." विशालने जरा मोठ्या आवाजात म्हटले.
आता मात्र त्याचा आवाज तिच्या कानावर पडला.
"हं, काय म्हणालास?" तिने विचारले.
"तुमचा सेट कम्प्लीट झाला आहे मॅडम." विशालने पुन्हा सांगितले.

"ओह सॉरी." असे म्हणत रोमाने आपला व्यायाम थांबवला.
"काय झाले मॅडम, काही टेन्शन आहे का?" विशालने विचारले.

"नाही, तसे काही नाही. जुन्या आठवणी डोळ्यांसमोर आल्या होत्या." रोमा म्हणाली.
"अशा कोणत्या आठवणी होत्या त्या, ज्यात तुम्ही स्वतःलाच हरवून बसला होता?" विशाल हसला.
"काही नाही, माझ्या आणि क्रिसच्या." रोमा सहज बोलून गेली.

"काय, क्रिस सरांच्या?" विशाल आश्चर्याने म्हणाला.
"ओह म्हणजे, नाही म्हणजे, हो." रोमा गडबडली.

"हो, नाही, काय चालवले आहे. तुम्ही काहीतरी लपवत आहात मॅडम." विशालने विचारले.

"कुठे काय. काहीही लपवत नाही मी." रोमा म्हणाली.
"तुमच्या बोलण्यावरून ते सहज लक्षात येत आहे. सांगा ना, काय चालले आहे तुमच्या मनात." विशालने पुन्हा विचारले.
"काही नाही विशाल." रोमा म्हणाली.
"मॅडम, रागावणार नसाल तर एक विचारू." विशालने विचारले.
"हो, विचार ना." रोमा म्हणाली.

"तुम्ही क्रिस सरांच्या प्रेमात पडला आहात का?" विशालने सरळ सरळ विचारले.
रोमाने उत्तर दिले नाही.

"काय झाले मॅडम, राग आला का? सॉरी मी चुकीचे विचारले. पण मला तसे वाटले म्हणून विचारले." विशाल म्हणाला.
"तुझा अंदाज खरा आहे विशाल." रोमा म्हणाली.
"म्हणजे खरंच तुम्ही क्रिस सरांवर प्रेम करत आहात." विशालने विचारले.
"हो, पण एकतर्फी. माझे प्रेम तो समजूच शकला नाही. मी मात्र जीव ओतून त्याच्यावर प्रेम करत राहिले आणि कदाचित असेच करत राहणार." रोमा म्हणाली.
"पण आता उशीर झाला आहे मॅडम." विशाल म्हणाला.
"कसला उशीर." रोमाने विचारले.
"कारण क्रिस सरांच्या जीवनात आता दुसरी मुलगी आली आहे." विशाल म्हणाला.
"म्हणून काय झाले? मी माझ्या मनाला त्याच्यावर प्रेम करण्यापासून रोखू शकत नाही. त्याच्या जीवनात एक काय, हजारो मुली आल्या तरी माझे प्रेम असेच अबाधित राहणार." रोमा म्हणाली.
"पण तो आता जुलियाना मॅडमसोबत लग्न करणार आहे." विशाल म्हणाला.
"माहीत आहे मला. पण त्याने मला काहीच फरक पडत नाही." रोमा म्हणाली.
"मॅडम, क्रिस सर जुलियाना मॅडमवर मनापासून प्रेम करतात." विशाल म्हणाला.
"क्रिसला कोणावर प्रेम करायचे आहे ते करू दे. माझे प्रेम मी करत राहणार." असे म्हणत रोमा तिथून उठून गेली.
क्रिस आणि जुलियाना क्रिसची गाडी धुवत होते. जुलियाना हातात स्पंज घेऊन कार साफ करत होती आणि क्रिस पाण्याचा स्प्रे मारत होता. जुलियानाची जरा गंमत करावी असा विचार करून त्याने आपल्या हातातील पाईपचे तोंड जुलियानाच्या दिशेने वळवले.

"मला भिजवू नका. आताच आंघोळ करून दुसरे कपडे घातले आहेत." जुलियाना जरा लांब जात म्हणाली.
"अच्छा, तर मग हे घे." असे म्हणत क्रिसने हसत हसत पाण्याचा स्प्रे जुलियानावर मारला.

"नाही, माझे कपडे ओले केले तुम्ही. काय हे." जुलियाना तोंडावर पडलेले पाणी हाताने झटकत म्हणाली.
"तू भिजलेली छान दिसतेस." क्रिस म्हणाला.
"चूप गदेढा. नेहमी काही ना काही खोड्या करत असतो. लहान मूल आहात का तुम्ही." जुलियाना खोट्या रागाने म्हणाली.
"तुझ्या या भिजलेल्या तोंडातून गदेढा हा शब्द जास्त शोभतो." क्रिस पुन्हा हसला.
"द्या तो पाण्याचा पाईप. दाखवते तुम्हाला. मग कळेल भिजल्यानंतर कसे वाटते." जुलियाना म्हणाली.
दोघांचेही छोटेखानी शाब्दिक युद्ध चालू होते. क्रिस त्या लढाईची मजा घेत होता. तेवढ्यात डॉक्टर मुख्य गेटजवळ आले.
"क्रिस." डॉक्टरांनी हाक मारली.
"डॉक्टर, या ना. रस्त्यावरच का उभे आहात." क्रिसने गाडीवर स्प्रे मारता मारता म्हटले.
"तुम्ही काम करत आहात असे वाटते. मग येतो मी नंतर. करा तुमचे काम." डॉक्टर परतू लागले.
"नाही, गाडी धुवत होतो आम्ही. झाली धुवून. जुलियानाला पण धुवून टाकली. आत या तुम्ही." क्रिस हसत म्हणाला.
"हो आणि आता मी त्यांना धुवून काढणार आहे." जुलियाना हसत म्हणाली.
त्यांची मस्करी पाहून डॉक्टर हसले.
"या तुम्ही डॉक्टर." क्रिसने स्प्रेचा पाईप बाजूला ठेवत म्हटले.
डॉक्टर मुख्य गेटमधून आत आले. जुलियाना पूर्णपणे भिजली होती. तिने स्वतःला झटकले आणि ती कपडे बदलण्यासाठी आत गेली.
"मग, कसे काय चालले आहे." डॉक्टरांनी क्रिसजवळ येत विचारले.
"एकदम मस्त चालले आहे डॉक्टर. परवाच चर्चच्या फादरना भेटून आलो. त्यांनी लग्नाची तारीख पण दिली आहे." क्रिस म्हणाला.
"व्हेरी गुड. खूप आनंद झाला ऐकून. कोणत्या महिन्याची तारीख दिली आहे." डॉक्टरांनी विचारले.
"पुढच्या महिन्यात करूया म्हणाले ते. या डॉक्टर, तिथे गार्डनमध्ये बसून बोलूया." क्रिस गार्डनच्या दिशेने जात म्हणाला.
"पुढच्या महिन्यात. होईल का रे इतक्या लवकर." असे म्हणत डॉक्टर सुद्धा क्रिसच्या पाठोपाठ चालू लागले.
"हो डॉक्टर, होईल. राघव, समीर, प्रतीक आणि विशाल आहेतच ना मदतीला." गार्डनमधल्या लोखंडी झुल्यावर बसत क्रिसने म्हटले.
"हो. माझी काही मदत लागल्यास मला पण सांग. मी पण मदत करतो." डॉक्टर म्हणाले.
"डॉक्टर, तुम्ही चहा-कॉफी काही घेणार का." क्रिसने विचारले.
"नाही नको. आताच घेऊन आलो आहे." डॉक्टर म्हणाले.
"ओके. डॉक्टर, या आठवड्यात मी आणि समीर मुंबईला जात आहोत." क्रिसने सांगितले.
"मुंबईला कशासाठी." डॉक्टरांनी विचारले.
"लग्नाची शॉपिंग करण्यासाठी. तिथे चांगले सामान मिळते. गाडी घेऊन जाणार." क्रिस म्हणाला.
"पण तू आणि समीर दोघेच जाणार आहात. आणि जुलियाना." डॉक्टरांनी विचारले.
"तिच्यासोबत इथे तिचा राघवदादा असणार आहे." क्रिसने सांगितले.
"तसे असेल तर उत्तमच झाले. नाहीतर तिला पण एकटे वाटले असते. आता राघव आहे म्हटल्यावर काळजी नाही." डॉक्टर म्हणाले.
"हो आणि जुलियानाला आता सर्व काही जमते. जेवण आणि बाकीची घरकामं ती करू शकते." क्रिस म्हणाला.
"ओके. चांगली शॉपिंग करा. लग्न सोहळा जीवनात रोज येत नाही. आयुष्यातील हा एक अप्रतिम क्षण आहे. त्याला यादगार बनवा." डॉक्टर म्हणाले.
"हो डॉक्टर. आणि तुम्ही पण इथे जरा लक्ष ठेवा." क्रिस म्हणाला.
"मी आहेच इथे. काहीच काळजी करू नकोस." डॉक्टर म्हणाले.
"डॉक्टर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचे होते. एक अशी गोष्ट जी मी आजपर्यंत तुमच्यापासून लपवून ठेवली आहे. कारण त्यावेळी मी सत्य सांगायला खूपच घाबरत होतो. पण आज ती वेळ आली आहे." क्रिस गंभीर होत म्हणाला.
"मग सांग ना. असे कोड्यात का बोलतोयस." डॉक्टरांनी विचारले.
"डॉक्टर, त्या रात्री जुलियाना बाथरूममध्ये पडली नव्हती." क्रिसने सांगितले.
"काय. जुलियाना बाथरूममध्ये पडली नव्हती. मग कुठे पडली होती." डॉक्टर चक्रावून गेले.
"रस्त्यावर. जेव्हा मी समीरच्या बर्थडे पार्टीतून घरी परतत होतो, तेव्हा ती माझ्या गाडीला धडकली होती. त्यावेळी आम्ही सगळे खूप घाबरलो होतो, म्हणून आम्हाला खोटे बोलावे लागले." क्रिसने कबुली दिली.
"काही हरकत नाही." डॉक्टर शांतपणे म्हणाले.
"डॉक्टर, मी तिला ओळखत सुद्धा नाही. ती कोण आहे, कुठली आहे याचा काहीच पत्ता नाही. तिथे कशी आणि का आली होती, हे अजूनही गूढच आहे." क्रिस म्हणाला.

"असू दे. जे देवाला मान्य असते तेच घडते. सगळा खेळ त्याच्याच मर्जीने चालू असतो. लग्नाच्या गाठी सुद्धा तोच बांधतो." डॉक्टर म्हणाले.

"हो डॉक्टर, अगदी खरे बोललात. कदाचित माझीही गाठ त्याने जुलियानासोबत आधीच बांधून ठेवली होती. तो अपघात कदाचित निमित्तमात्र होता. देवाला त्या अपघातातून माझी आणि जुलियानाची भेट घडवायची होती." क्रिस म्हणाला.

"जीवन म्हणजे सारीपाटाचा खेळ आणि देव खेळाडू. त्याला जेवढे दान पडेल, मोहरे तेवढीच आपली चाल चालणार." डॉक्टर म्हणाले.

क्रमश:

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →