Login

इश्क तेरा... भाग:३९

क्रिस जुलियानाच्या लग्नाची तयारी
इश्क तेरा...
भाग: ३९


समीरला रस्त्यावर पाहून जुलियाना जराशी घाबरली. तिच्या डोळ्यांसमोर काही वेळापूर्वी घडलेले ते चित्र फिरू लागले. पण क्रिस आणि राघव त्याच्याशी का बोलत आहेत हे तिला समजत नव्हते. तिच्या हातातील ज्यूसचा ग्लास थरथरत होता.
जल्लोष करत असतानाच समीरची नजर जुलियानावर गेली आणि त्याने नाचणे थांबवले. समीर थांबलेला पाहून राघव आणि क्रिसने पाठीमागे वळून पाहिले. त्यांनीही जुलियानाला पाहताच आपला धिंगाणा थांबवला.
समीर चालत जुलियानाच्या दिशेने गेला. तो आपल्याजवळ येत असल्याचे पाहून ती थोडी अधिक घाबरली. पण समोर क्रिस असल्यामुळे तिला कसलीच काळजी करण्याची गरज नव्हती. म्हणून ती जागेवरून न हलता तिथेच उभी राहिली. समीर तिच्या खूप जवळ पोहोचला. त्याने आपले दोन्ही कान पकडले आणि मान खाली घालून तो गुडघ्यावर खाली बसला.
"आय एम सॉरी." समीरने मान वर न करता माफी मागितली.
जुलियानाने काहीच प्रतिउत्तर दिले नाही. तिने त्याच्याकडे न बघता आपली नजर क्रिसवर रोखून धरली.
"जुलियाना, माफ कर ना ग त्याला. त्याला त्याच्या कर्माचा पश्चाताप होत आहे. तो पुन्हा तसा कधीच वागणार नाही. प्लीज माफ कर दो ना उसे." क्रिसने जुलियानाला समजावले.
"बहना, काय घडले होते ते मला माहीत नाही. कदाचित ते खूप गंभीर सुद्धा असू शकते. पण जर केलेल्या अपराधाचा समीरला खरंच पश्चाताप होत असेल तर मोठ्या मनाने त्याला क्षमा कर." राघवने पण जुलियानाला समजवण्याचा प्रयत्न केला.
पण जुलियानाने काहीच प्रतिसाद दिला नाही. त्या दिवशी समीर ज्या प्रकारे तिच्याशी वागला होता, ते ती विसरू शकत नव्हती.
"जुलियाना, मला माहीत आहे की मी तुझी माफी मागण्याच्या लायकीचा नाही. तरीही तुझ्याकडे माफीची भीक मागतो. प्लीज क्षमा कर मला." समीर म्हणाला.
जुलियाना गप्पच होती. समीरच्या बोलण्यावर तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही.
"जुलियाना, तो खूप कळकळीने मनापासून माफी मागत आहे. कर त्याला माफ." क्रिस म्हणाला.
"ठीक आहे सा. उठ जा. म्हाणे थाणे माफ कियो." जुलियानाने समीरला सांगितले.
"खरंच तू मला माफ केलेस. थँक्यू व्हेरी मच." समीर म्हणाला.
हे ऐकल्याबरोबर क्रिस आणि राघव पुन्हा एकमेकांच्या खांद्यावर हात घालून नाचू लागले.
"थ्री चिअर्स फॉर अवर भाभी अँड अवर फ्रेंडशिप. हिप हिप हुर्रे." राघव जोरात ओरडला.
जुलियानाने आपल्या हातातील राघवासाठी आणलेला ग्लास समीरला दिला.
"हे काय. माझ्यासाठी ज्यूस घेऊन आली होतीस, पण वाटेत दुसऱ्याच भावाला देऊन टाकलास." राघव म्हणाला.
"तुमच्या दोघांसाठी पण आणते. या आत." जुलियाना असे म्हणून आत गेली.
तिच्या पाठोपाठ ते तिघेही आत गेले.
"पुढच्या महिन्यात लग्नाचा बार उडवूया का." क्रिसने विचारले.
"हो तर. काय काय तयारी करायची ते आधीच सांग. शेवटच्या मिनिटाला हे कर ते कर म्हणून ऑर्डर सोडू नकोस." राघव म्हणाला.
"तयारी म्हणजे नक्की काय." क्रिसने विचारले.
"लग्न म्हणजे खाऊची गोष्ट नाही. हॉल बुक करावा लागणार, जेवण, डेकोरेशन, कपडे अशा खूप गोष्टी आहेत. आधी किती जणांना आमंत्रण देणार याची यादी काढा." समीरने सांगितले.
"यादी कशाला हवी. फक्त जिममधील सर्व मेंबर्स आणि तुम्ही. माझे नातेवाईक कोणीच नाहीत. जुलियानाकडून तर कोणीच येणार नाही." क्रिस म्हणाला.
"आणि तुझे मम्मी-डॅडी." राघवने विचारले.
"त्यांना कशाला बोलवायला हवे. त्यांचा आणि माझा काय संबंध." क्रिस म्हणाला.
"क्रिस, ते तुझे आई-वडील आहेत. तू त्यांचा एकुलता एक मुलगा आहेस." राघव म्हणाला.
"एकुलता एक आहे म्हणून काय झाले. त्यांना त्यांच्या दुसऱ्या जोडीदारांपासून आणखी मुले झाली नाहीत यात माझा काय दोष आहे." क्रिसने चिडून विचारले.
"प्रश्न तो नाही. प्रश्न असा आहे की तू त्यांना बोलवणार की नाही." समीर म्हणाला.
"मी बोलवले तरी ते माझ्यासाठी खास इथे येणार नाहीत." क्रिस म्हणाला.
"अरे पण ते येवोत अथवा न येवोत, तू तुझे बोलवण्याचे काम कर." राघव म्हणाला.
बोलता बोलता क्रिसच्या डोळ्यांसमोर भूतकाळातील एक प्रसंग उभा राहिला. त्यावेळी बोर्डिंगमधील शिक्षण संपवून क्रिस घरी परतला होता. त्याचे आई-वडील विदेशात स्थायिक झाले होते. त्यामुळे इथे क्रिसची काळजी घेणारे कोणीच नव्हते. आई-वडिलांना महिन्यापूर्वीच शिक्षकांनी तशी सूचना दिली होती. पण दोघांनीही काहीच हालचाल केली नव्हती. अहंकारी वृत्तीमुळे मीच का करावे हा प्रश्न त्यांच्या मनात असावा. आपला १६ वर्षांचा मुलगा एकटा कसा राहणार, तो काय खाणार, त्यांना याची काहीच काळजी नव्हती.
शेवटी बोर्डिंगमधील प्रिन्सिपलनी एक कामवाली बाई शोधून तिला क्रिसच्या घरी देखभालीसाठी ठेवले. असे म्हणतात की किशोरवयात मुले चिडकी होतात आणि क्रिसचा स्वभाव तर मुळातच तापट होता. त्यामुळे पालकांच्या निष्काळजीपणाचा त्याच्यावर खोल परिणाम झाला. घरातील बाई आपुलकीने त्याची कामे करत होती, तरीही क्रिसच्या जीवनातील आई-वडिलांची पोकळी तिला भरून काढणे शक्य नव्हते.
असाच एक दिवस क्रिस खूप आजारी पडला. त्याला तीव्र ताप येत होता. दोन-तीन दिवस ताप कमी झाला नाही, उलट वाढतच गेला. कामवाल्या बाईने त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले. क्रिसची प्रकृती चिंताजनक होती म्हणून तिने प्रिन्सिपलना फोन लावला आणि त्यांनी क्रिसच्या वडिलांना फोन केला.
"हॅलो, मी क्रिसची प्रिन्सिपल बोलत आहे." मॅडम म्हणाल्या.
"आता आणखी काय पराक्रम केला आहे त्याने. त्याला जी काय शिक्षा द्यायची असेल ती खुशाल द्या." डॅडी म्हणाले.
"तुम्ही विसरलात का. क्रिस आता आमच्या शाळेत शिकत नाही. तो पास आउट झाला आहे." प्रिन्सिपल म्हणाल्या.
"मग आता कशासाठी फोन केला आहे." वडिलांनी विचारले.
"क्रिसची तब्येत ठीक नाही." प्रिन्सिपल म्हणाल्या.
"मग डॉक्टरकडे न्या ना त्याला." वडील वैतागून म्हणाले.
"तो हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे." प्रिन्सिपलनी सांगितले.
"मॅडम, अशा लहान कारणांसाठी मला फोन करू नका. मी भारतात नाहीये. तुम्हीच बघा काय करायचे ते. हवे तर त्याच्या अकाउंटमध्ये दुप्पट पैसे पाठवतो." डॅडी म्हणाले.
"प्रश्न पैशांचा नाहीये." प्रिन्सिपल ओरडल्या.
"प्रश्न कसलाही असो, तुम्ही त्याच्या आईला फोन करा." असे म्हणत वडिलांनी फोन कट केला.
प्रिन्सिपल मॅडमनी त्याच्या आईला फोन लावला. ती त्यावेळी नव्या पतीसोबत एका पार्टीत गेली होती.
"हॅलो, क्रिसची मम्मी का." प्रिन्सिपलनी विचारले.
"हो मॅडम बोला. बोर्डिंगच्या प्रिन्सिपल ना." आईने विचारले.
"हो. अचूक ओळखले तुम्ही."
"तुमचा नंबर सेव्ह होता माझ्याकडे. बोला काय काम होते." आई म्हणाली.
"क्रिस खूप आजारी आहे." प्रिन्सिपल म्हणाल्या.
"हो का. त्याच्या वडिलांनी तुम्हाला मला कॉल करायला सांगितले का." आईने विचारले.
"हो... नाही म्हणजे..."
"हो की नाही एवढेच सांगा मॅडम." आईने मधेच तोडले.
"हो. पण क्रिस खरंच खूप आजारी आहे आणि त्याची देखभाल करणारे कोणीच नाही." प्रिन्सिपल कळकळीने म्हणाल्या.
"एक बाई ठेवली आहे ना. एकाच्या जागी दोन ठेवा पण प्लीज क्षुल्लक कारणांसाठी पुन्हा पुन्हा फोन करू नका." आई म्हणाली.
"तुम्ही इथे येऊ शकणार नाही का." प्रिन्सिपलनी विचारले.
"वेड लागले आहे की काय. मी काय घराजवळच्या बागेत गेली आहे." आई म्हणाली.
"पण..." प्रिन्सिपल काही सांगण्यापूर्वीच आईने फोन ठेवला.
क्रिस बरा होईपर्यंत त्या कामवाल्या बाईने त्याची खूप सेवा केली. पण जन्मदात्या आई-वडिलांना मात्र क्रिसचे काहीच देणेघेणे नव्हते.
"काय रे कुठे हरवलास." राघवने क्रिसला विचारले.
"काही नाही." क्रिस भानावर येत म्हणाला.
"मग काय ठरवले. मम्मी-डॅडीला बोलवणार ना." समीरने विचारले.
"हो बोलवणारच. ते आले नाहीत तरी चालेल. मुलाच्या दुःखात ते कधीच सहभागी होऊ शकले नाहीत, निदान सुखात तरी येऊ दे." क्रिस म्हणाला.
तेवढ्यात जुलियाना ज्यूस घेऊन आली.
"लीजिए राघवदादा." जुलियानाने ज्यूसचा ग्लास राघवच्या हातात दिला.
"थँक्यू बहना." राघव म्हणाला.
"आप भी लीजिए राणा सा." तिने क्रिसला पण एक ग्लास दिला.
"जुलियाना तुला लग्नासाठी कसला ड्रेस हवा आहे." क्रिसने विचारले.
"काहीही. जे तुम्ही आणाल ते मी घालेन." जुलियाना म्हणाली.
"तुझ्यासाठी मी एक उत्कृष्ट असा वेडिंग गाऊन आणणार आहे." क्रिसने हसऱ्या चेहऱ्याने सांगितले.

क्रमश:

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →