Login

इश्क तेरा... भाग:३८

समीरने क्रिसची माफी मागितली
इश्क तेरा...
भाग: ३८

लिव्हिंग रूममध्ये क्रिस एका टेबलवर स्टूल ठेवून त्यावर उभा होता. जुलियानाने त्याच्याकडे एक कपडा दिला. त्या कपड्याच्या साहाय्याने तो झुंबर पुसण्याचा प्रयत्न करत होता.
"अगं, कोणालाही सांगून करून घेऊया ना हे काम." क्रिस झुंबराचा एक लॅम्प पुसत म्हणाला.
"नही सा. खुद का काम खुद करना चाहिये." जुलियाना खाली कंबरेवर हात ठेवून उभी होती.
"अगं स्टूल तरी पकड. ही कसरत करता करता मी खाली पडलो आणि माझा हात-पाय मोडला तर." क्रिसने विचारले.
"काही नाही होणार तुम्हाला. तुम्ही खूप फिट आहात. पडला तरी तुम्हाला काही होणार नाही, उलट जमीनच तुटेल." जुलियानाने स्टूल घट्ट पकडत उत्तर दिले.
"अगं माझे लग्न ठरले आहे. ऐन लग्नाच्या दिवसात हात-पायाला प्लास्टर घालून फिरायचे नाही मला." क्रिस म्हणाला.
"तोंड बंद ठेवून लवकर साफ करा. एवढी नौटंकी नका करू. माझा हात तिथे पोहोचत नाही, नाहीतर मी केव्हाच साफ केले असते." जुलियाना म्हणाली.
"किती काम करून घेणार माझ्याकडून. खूप झाले साफ. आता खाली उतरू का." क्रिसने विचारले.
"नाही. त्या बाजूला बघा कोळीष्टक आहे. गदेढ्यासारखे राहण्याची सवय लागली आहे तुम्हाला." जुलियाना म्हणाली.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली.
"आता कोण आले असेल. चल मी बघून येतो." क्रिस म्हणाला.
"तुम्ही खाली उतरू नका. मी बघून येते." असे म्हणत जुलियानाने स्टूल सोडले आणि दार उघडायला गेली.
"ओय स्टूल नको सोडू, मी पडेन. माझे हात-पाय तोडल्याशिवाय तुला शांती मिळणार नाही." क्रिस आपले काम थांबवत ओरडला.
जुलियानाने दार उघडले. बाहेर राघव होता.
"हॅलो बहना... कशी आहेस." राघव आत येत म्हणाला.
"मी ठीक आहे राघवदादा. या ना. तुम्ही कसे आहात." जुलियानाने विचारले.
"मी पण ठीक आहे." राघव म्हणाला.
जुलियाना आणि राघव दोघेही लिव्हिंग रूममध्ये आले.
"अरे बापरे. याला कोणी शिक्षा केली." क्रिसला वर उभा पाहून राघवने हसत विचारले.
"मॅडमने साफसफाई करायला लावली आहे. आताच असा त्रास देतेय, लग्नानंतर काय काय करायला लावणार माहीत नाही बाबा." क्रिस वैतागून म्हणाला.
"काय तुला साफसफाई करता येते. नवल आहे बाबा. म्हणजे लोकांवर ठोसे मारणारे हात झाडू पण हातात घेऊ शकतात तर." राघवने मस्करी केली.
"पुरे झाले. आता जरा स्टूल पकड, नाहीतर उरलेले काम तू कर." क्रिस म्हणाला.
"नको नको. तुझ्याच हाताने ते जास्त स्वच्छ होईल." राघव म्हणाला.
"राघवदादा मी तुमच्यासाठी ज्यूस घेऊन येते." असे म्हणत जुलियाना आत गेली. क्रिस झुंबराचे उरलेले लॅम्प पुसून लगेच खाली उतरला.
"तू आलास म्हणून देव पावला." क्रिस हसत म्हणाला.
"ती आली म्हणून या घराला घरपण आले आहे. आता इथे मोकळा श्वास तरी घेता येतोय. नाहीतर आधी फक्त धूळच दिसत होती." राघव म्हणाला.
तेवढ्यात राघवचा फोन वाजला. समीरचा कॉल होता.
"हॅलो समीर. काय झाले." राघवने विचारले.
"झाले नाही का तुझे." समीरने विचारले.
"येतो, जरा पाच मिनिटे थांब ना." राघव म्हणाला.
"लवकर ये. नाहीतर मी निघतो, मला उशीर होतोय." समीर म्हणाला.
"येतो, आता फोन ठेव." असे म्हणत राघवने फोन ठेवला.
"कोण समीर का. कुठे आहे तो." क्रिसने विचारले.
"बाहेर रस्त्यावर थांबला आहे. मी आत बोलावले होते पण तो आला नाही." राघवने सांगितले.
"तो येणारच नाही." क्रिस थंडपणे म्हणाला.
"अरे नक्की काय घडले आहे तुम्हा दोघांमध्ये. जिगरी दोस्त असे अचानक अबोला धरून का बसले आहेत." राघवने विचारले.
"जे काय घडले ते त्याने तुला सांगितले नाही का." क्रिसने प्रतिप्रश्न केला.
"त्याने सांगितले असते तर तुला कशाला विचारले असते." राघव म्हणाला.
"सोड तो विषय. मला त्या विषयावर जास्त बोलायचे नाही." क्रिस म्हणाला.
"काय सोड तो विषय. तुमच्यापेक्षा या विषयाचा मला जास्त त्रास होतो. तुमच्यात काही बिनसले असेल तर नात्याचे वीण तुटण्याआधी सॉरी म्हणा आणि विषय संपवा." राघवने सल्ला दिला.
"इतके सोपे नाहीये ते राघव." क्रिस म्हणाला.
"काय सोपे आणि काय कठीण आहे ते मी बघतो. बोलायचा प्रयत्न तरी करा. कॉल लाव त्याला." राघव हट्ट धरून बसला.
"राघव तू समजून का घेत नाहीस. तुला माहीत नाही काय घडले आहे ते. उगाच आपला शहाणपणा करू नकोस." क्रिस वैतागला.
"मला आणखी काही ऐकायचे नाही. मी सांगितले ना कॉल लाव." राघवने पुन्हा बजावले.
"ठीक आहे करतो." क्रिसने खिशातून फोन काढला.
त्याने समीरचा नंबर डायल केला पण समीरने कॉल कट केला.
"बघितले साल्याला. माझा कॉल कट केला त्याने." क्रिस जोरात ओरडला.
"अरे अशा शिव्या काय देतोस. फोन कट केला म्हणून काय झाले. मी कॉल करतो, तू उगाच राग डोक्यात नको घेऊस." राघव म्हणाला.
राघवने समीरला कॉल केला.
"बोल." समीर म्हणाला.
"क्रिसचा फोन कट का केलास." राघवने विचारले.
"मी फोन कट केला, याच्याशी तुझा काहीही संबंध नाही." समीर उत्तरला.
"घे त्याला बोलायचे आहे तुझ्याशी." राघव म्हणाला.
"पण मला नाही बोलायचे." समीर म्हणाला.
क्रिसने राघवचा फोन ओढून घेतला आणि तो समीरशी बोलू लागला.
"काय रे जास्त चरबी चढली आहे का तुला. काय समजतोस स्वतःला. माझा फोन कट करण्याची हिंमत कशी झाली तुझी. तुझे हे नखरे आणि शहाणपणा तुझ्यापाशीच ठेव. तू स्वतःला कोण समजतोस. तू माझे डोके गरम केले आहेस. थांब दाखवतोच तुला." असे म्हणून क्रिसने फोन राघवकडे दिला.
"अरे क्रिस थांब, पुन्हा भांडू नका. क्रिस थांब." राघवने त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. राघवचे काहीही न ऐकता क्रिस रागाने पुटपुटत बाहेर गेला. राघवने हात जोडले.
"देवा, या दोघांचे बिनसलेले लवकर नीट कर. यांच्या भांडणात मी सँडविच होतोय." राघव स्वतःशीच म्हणाला.
समीर बाहेर आपल्या मोटरसायकलवर बसला होता. क्रिस धावतच तिथे गेला आणि त्याने समीरची कॉलर धरली.
"काय रे, फोन कट करतोस का माझा. जास्त मोठा झाला आहेस का तू." क्रिसने त्याच्या नजरेत नजर घालून विचारले.
"क्रिस मला माफ कर. आय एम सॉरी. खरंच मी चुकलो. त्या दिवशी मी तसे वागायला नको होते. प्लीज मला माफ कर." समीरने हात जोडत विनवणी केली.
"इतके दिवस खूप बिझी होतास का. हे एवढेच बोलायला इतके दिवस का लावलेत." क्रिसने समीरची कॉलर अजून जोरात आवळली.
"हिंमत झाली नाही रे. आय एम सॉरी." समीर म्हणाला.
क्रिसने समीरची कॉलर सोडली आणि त्याला घट्ट मिठी मारली.
"इट्स ओके." क्रिस हळूच म्हणाला.
"मी पुन्हा कधीच तसा वागणार नाही." समीरने आश्वासन दिले.
"विसर आता ते. तुला तुझी चूक समजली आणि तू प्रायश्चित्त केलेस, यातच सगळे आले." क्रिस म्हणाला.
"पण माझी चूक अक्षम्य आहे." समीर म्हणाला.
"ठीक आहे रे बाबा. मी पण त्या दिवशी तुझा खूप अपमान केला. मी पण तुला सॉरी म्हणतो." क्रिस म्हणाला.
"मला माफ केल्याबद्दल थँक्स ब्रो." समीर म्हणाला.
तोपर्यंत राघव सुद्धा बाहेर आला. क्रिस आणि समीरला एकमेकांच्या मिठीत पाहून त्याला खूप आनंद झाला. त्याने धावत जाऊन त्या दोघांवर उडी घेतली.
"मग आता आपण पुन्हा मित्र झालो ना." राघवने विचारले.
"हो, पूर्वीसारखेच." क्रिस हसत म्हणाला.

क्रमश:

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →