Login

इश्क तेरा... भाग:३६

क्रिस जुलियानाची प्रेम कहाणी
इश्क तेरा...
भाग: ३६


दुसऱ्या दिवशी सकाळी उठून क्रिस चर्चमध्ये जाण्यासाठी तयार होत होता.

"जुलियाना... जुलियाना..." क्रिसने जुलियानाला हाक मारली.
"जी सा... क्या हुआ?" जुलियाना त्याच्या जवळ येऊन म्हणाली.
"मला चर्चमध्ये जायचे आहे. माझ्या कपड्यांना इस्त्री करून ठेवली आहे का?" क्रिसने विचारले.
"हो सा... तुमचे सारे कपडे तर परवाच तयार करून ठेवले आहेत." जुलियाना म्हणाली.
"नाही, ते नाही गं. चर्चमध्ये टीशर्ट घालून जाता येत नाही. मला काहीतरी फॉर्मल हवे आहे. फॉर्मल शर्ट आणि पॅन्ट पाहिजे." क्रिसने सांगितले.
"तुम्ही जे हवे ते काढून द्या सा... मी आत्ताच्या आत्ता प्रेस करून देते." जुलियाना म्हणाली.
क्रिसने आपल्या कपाटातून एक शर्ट आणि पॅन्ट काढून जुलियानाला दिली आणि तो आंघोळीला गेला. तोपर्यंत तिने त्याचे कपडे इस्त्री करून ठेवले. काही क्षणातच क्रिस तयार होऊन आला.
"हे बघ मी जातो. मी येईपर्यंत कोणालाच दार उघडायचे नाही. समजले?" क्रिसने तयार होता होता बजावले.
"हो राणा सा... दरवाजा नाही उघडणार पण तुम्ही लवकर या." जुलियाना म्हणाली.
लवकरच क्रिस चर्चमध्ये जाण्यास निघाला. चर्च क्रिसच्या घरापासून ६००-७०० मीटर अंतरावर होते. चर्चचे सकाळचे मिस संपले होते. चर्चचे सर्व पाद्री जवळच असलेल्या चर्चहाऊसमध्ये राहत होते. क्रिसने विचारपूस करून मुख्य पाद्री कुठे राहतात याची चौकशी केली आणि तो त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या खोलीकडे गेला.
"गुड मॉर्निंग फादर." चर्चहाऊसमधल्या एका दारात उभे राहून क्रिसने प्रीयस्टला म्हटले.
"गुड मॉर्निंग... कम इन." फादरनी त्याला आत बोलावले.
"कसे आहात फादर?" क्रिसने आत येत विचारले.
"मी ठीक आहे. ये बस. काही काम होते का?" फादरनी टेबलसमोर असलेल्या खुर्चीकडे बोट दाखवले.
"हो फादर, मला लग्न करायचे होते." क्रिसने सरळ मुद्द्याला हात घातला.
"वा, खूप चांगली गोष्ट आहे. कुठे राहतोस तू?" फादरनी विचारले.
"इथे जवळच फादर." क्रिस म्हणाला.
"म्हणजे इथलाच आहेस का तू? मी तुला यापूर्वी कधीच पाहिले नाही. चर्चमध्ये मिसला वगैरे येत नाहीस का?" फादरनी प्रश्न केला.
"नाही फादर, कधीच आलो नाही." क्रिसने प्रामाणिकपणे सांगितले.
"काय, कधीच चर्चमध्ये आला नाहीस? कॉन्फेशन करायला, होली कम्युनियन घ्यायला सुद्धा कधीच आला नाहीस?" फादरनी आश्चर्याने विचारले.
"हो फादर, खरंच कधी आलो नाही." क्रिस म्हणाला.
"मग आता मॅरेज करायला चर्चमध्ये यावे असे का वाटले?" फादरनी विचारले.
"ते आमचे शेजारी एक डॉक्टर आहेत त्यांनी सांगितले. म्हणजे चर्चशिवाय लग्न होऊ शकते का?" क्रिसने निरागसपणे विचारले.
"चर्चशिवाय झाले असते तर चर्चमध्ये आलाच नसता का?" फादरनी टोमणा मारला.
"हो, जर तसे होत असेल तर इथे येण्याची काय गरज." क्रिस स्पष्टपणे बोलला.
"बाहेर कायद्याने रजिस्टर पद्धतीने लग्ने होतात पण धार्मिक पद्धतीने करायचे असेल तर चर्चमध्ये यावेच लागते." फादरनी समजावून सांगितले.
"ओके, तर कधी करूया लग्न? कुठली तारीख अवेलेबल आहे फादर?" क्रिसने विचारले.
"इतके सोपे वाटते का तुला ते? लग्नाचेही काही नियम असतात, ते पाळावे लागतात. तुझे कन्फर्मेशन झाले आहे का? तू पहिला होली कम्युनियन घेतला आहेस का?" फादरनी विचारले.
"माहीत नाही." क्रिस म्हणाला.
"तुझे आई-वडील कुठे आहेत? मला त्यांना भेटायचे आहे." फादरनी कडक शब्दात सांगितले.
"ते नाहीत." क्रिस म्हणाला.
"ओह सॉरी, लहानपणीच वारले का?" फादरनी हळहळ व्यक्त केली.
"ते वारले नाहीत, जिवंत आहेत ते." क्रिस म्हणाला.
"जिवंत आहेत? मग त्यांना इथे घेऊन ये." फादर म्हणाले.
"ते लंडनमध्ये असतात फादर. त्यांना इथे येणे शक्य नाही." क्रिसने सांगितले.
"त्यांच्याशिवाय लग्न कसे होणार?" फादरनी विचारले.
"फादर, त्यांचा डिवोर्स झाला आहे. दोघांनीही परत लग्ने केली आहेत. त्यांचा आणि माझा काहीही संबंध नाही. तुम्हाला माझे लग्न करायचे असेल तर करा अन्यथा मी दुसरे पर्याय बघतो. तुम्ही मघाशी म्हणालात तसे रजिस्टर पद्धतीने पण करू शकतो." क्रिस थोडा चिडून म्हणाला.
"मी बघतो, यावर तोडगा काढूया आपण. मुलगी कुठली आहे?" फादरनी विचारले.
"माहीत नाही." क्रिस म्हणाला.
"माहीत नाही म्हणजे?" फादर गोंधळले.
"सध्या तरी अनाथ आहे ती असे म्हणू शकता आपण. तिचे कुटुंबीय, तिचे आई-वडील कोण, तिचा धर्म कोणता याबद्दल काहीच माहिती नाही." क्रिसने सांगितले.
"म्हणजे ती ख्रिश्चन नाही?" फादरनी विचारले.
"ते मला माहीत नाही फादर." क्रिस म्हणाला.
"आणि तरी तू तिच्याशी लग्न करण्यास इच्छुक आहेस?" फादरनी पुन्हा विचारले.
"मग काय झाले फादर, धर्म पाहून लग्न केले जाते का?" क्रिसने प्रतिप्रश्न केला.
"हो, धर्माच्या रीतीरिवाजाप्रमाणे आधी धर्म पाहायचा, मग जात, मग मुलीचे कुटुंब आणि सगळे सुरळीत असेल तर नंतर मुलगी." फादरनी आपली बाजू मांडली.
"आणि यापैकी कुठलीच गोष्ट त्या मुलीला नसेल तर लग्नच करायचे नाही का फादर?" क्रिसने विचारले.
"मी असे कुठे म्हटले आहे पण धर्माचे रक्षण करणे आपले कार्य आहे." फादर म्हणाले.
"फादर, तुम्ही फक्त एक तारीख सांगा. पुढचे मी बघतो." क्रिस म्हणाला.
"पुढच्या महिन्यात करू. उद्याच मी तुमच्या लग्नाबद्दलची चिट टाकतो." फादरनी मान्य केले.
"थँक्यू फादर, थँक्यू व्हेरी मच." क्रिस आनंदाने म्हणाला.
"यू आर वेलकम. आता यापुढे रोज चर्चमध्ये ये. मिस वगैरे कसे असते ते बघ. होली कम्युनियन घे. एकदा तू केलेले सगळे गुन्हे कन्फेस कर." फादरनी सांगितले.
"सगळे गुन्हे? सगळे सांगितले तर एक दिवस पुरणार नाही फादर." क्रिस हसत म्हणाला.
"एकाच कन्फेशनमध्ये केलेल्या सगळ्या गुन्ह्यांची माफी माग." फादर म्हणाले.
"नक्की फादर." असे म्हणत क्रिस चर्चमधून बाहेर आला.
तो खूप खुश होता. शेवटी त्याच्या आयुष्यातील एका महत्त्वाच्या प्रसंगाची तारीख ठरली होती. त्याने कधीच विचार केला नव्हता की तो सुद्धा कोणाच्या तरी प्रेमात पडणार आणि लग्नाच्या गोष्टी करणार. पण म्हणतात ना माणसाला बदलायला वेळ लागत नाही आणि क्रिसच्या जीवनात बदल आणण्यासाठी फक्त एक मुलगी पुरेशी ठरली.
तो तसाच जवळच्या एका मिठाईच्या दुकानात गेला आणि त्याने जुलियानासाठी मिठाई घेतली. मग त्याने परतीची वाट धरली. घरी परतत असताना तो पुन्हा भूतकाळात गेला.
"क्रिस, मला सांग तुला कशी मुलगी आवडते." जिममधल्या एका काकूंनी त्याला विचारले होते.
"मुलगी? मुलगी कशासाठी काकू?" क्रिसने विचारले होते.
"कशासाठी म्हणजे? लग्नासाठी. लग्न वगैरे करणार की नाही?" काकू म्हणाल्या होत्या.
"लग्न? ते कशाला करायचे? मी एकटाच ठीक आहे काकू. मला मुलगी बिलगी नको." क्रिस म्हणाला होता.
"हे तू आता म्हणतोस. तीन चार वर्षांनी तूच मुली शोधायला लागणार बघ. पण माझ्या मते तुला जास्त शोधावे लागणार नाही कारण तू श्रीमंत आहेस, जिमसारखा तुझा व्यवसाय आहे, स्वतःचा बंगला आहे आणि मुख्य म्हणजे दिसायला पण तू खूपच हँडसम आहेस. तुला लगेच मुलगी मिळणार." काकू हसत म्हणाल्या होत्या.
"पण काकू मला तर लग्न करायचेच नाही." क्रिसने ठामपणे सांगितले होते.
"लग्न हे करावेच लागते बाळा, त्याच्याशिवाय जीवनाला पूर्णता येत नाही. जीवनात एखादी सोबतीण असली की आयुष्याचा मार्ग सहज चालता येतो." काकू त्याला समजावत होत्या.
"पण माझा तर विवाह या गोष्टीवर विश्वासच नाही काकू." क्रिस म्हणाला होता.
"असे का म्हणतोस तू बाळा?" काकूंनी विचारले होते.
"कारण मी ते अनुभवले आहे काकू. माझ्या स्वतःच्या आई-वडिलांचे लग्न टिकले नाही. त्यांनी प्रभूच्या साक्षीने केलेले लग्न, एकमेकांना दिलेली वचने कधीच निभावली नाहीत. उलट रोज त्यांच्यात भांडणे व्हायची. मी त्यांना कधीच प्रेमाने वागताना बघितले नाही, एकमेकांना साथ दिलेली पाहिली नाही. फक्त एकमेकांची उणीदुणी काढण्यातच त्यांचे वैवाहिक जीवन संपले." क्रिस भावूक झाला होता.
"सर्वच लग्ने अशी होतात असे नाही बाळा." काकू म्हणाल्या होत्या.
"सर्वांचे माहीत नाही पण माझ्या पालकांनी जे केले ते मला करायचे नाही. लग्न करून जर दुसरे साथीदार शोधायचे असतील तर लग्न का म्हणून करायचे?" क्रिसने विचारले होते.
"बाळा, मी सांगते तुला, जर तुझ्या आयुष्यात एखादी चांगली मुलगी आली तर बघ तूच स्वतःच्या पावलांनी तुझे लग्न ठरवायला जाणार." काकूंनी भाकीत केले होते.
समोरून जाणाऱ्या गाडीने हॉर्न वाजवला आणि क्रिसची तंद्री भंग पावली. त्याला हसू आले. त्या जिममध्ये येणाऱ्या काकूंचे बोलणे खरे झाले होते. तिने जसे म्हटले होते तशीच एक मुलगी त्याच्या आयुष्यात आली होती आणि तिच्याबरोबर लग्न करण्यासाठी तो स्वतःच्या पावलांनी चर्चमध्ये जाऊन आला होता.

क्रमश:

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →