Login

इश्क तेरा... भाग:३५

रोमाची स्वतःचे नाव उघड होऊ नये म्हणून धडपड
इश्क तेरा...
भाग: ३५


काल रात्री क्रिसकडून मार खाल्लेला तो स्वयंसेवक आपल्या घरी नाकाला बँडेज लावून पडून होता. मारहाणीमुळे त्याचा चेहरा चांगलाच सुजला होता. तो जखमी असल्याने रोमा त्याला त्याचे पैसे देण्यासाठी त्याच्या घरी पोहोचली. तिने त्याच्या आईकडे त्याची विचारपूस केली.

"आत पडलाय खोलीत. नाक तुटलंय आणि पुढचे दोन दातही पडलेत. मी म्हणते कशाला हवेत असले नसले उद्योग? तिथे ते सगळे पैलवान लोक, याच्या आटोक्यात येणार आहेत का? मोठा आला वीर, व्हलंटिअर बनायला गेला आणि स्वतःचेच हाडं मोडून आला." त्याची आई बडबडत आत गेली.

रोमा त्याच्या खोलीत गेली. तिला पाहताच तो दचकला.
"मॅडम तुम्ही? इथे?" तो जरा सावरून बसत म्हणाला.
"उठू नकोस. मी फक्त तुझे पैसे द्यायला आले आहे."
"ते तर तुम्ही ऑनलाइन ट्रान्सफर करू शकला असता."
"नाही, मला कॅश पेमेंट करायचे होते. या प्रकरणाचा कोणताही पुरावा मला मागे ठेवायचा नाहीये. जास्त लागले आहे का तुला?" रोमाने विचारले.
"जरा नाकाला लागले आहे. आपला प्लॅन थोडक्यात फेल झाला मॅडम. सगळे काही व्यवस्थित झाले होते. मी तिला ड्रिंक दिले, तिने ते प्यायले आणि तिला नशा चढली सुद्धा. मी तिला नेऊन माझ्या गाडीत बसवले, पण शेवटच्या क्षणी कुठून तो आला कळलेच नाही."
"त्याने तुला काही विचारले का?"
"नाही मॅडम... काहीच नाही."
"तू त्याला माझे नाव वगैरे सांगितले नाहीस ना?" रोमाच्या आवाजात भीती होती.
"आईशप्पथ मॅडम...एक शब्द सुद्धा बोललो नाही मी." तो गळ्याला हात लावत म्हणाला.
"म्हणजे काहीही न विचारता, न बोलता फक्त मारहाण सुरू केली त्याने? अजबच माणूस आहे तो." रोमा पुटपुटली.
"हो मॅडम, तसेच घडले. मला विचार करायला सुद्धा वेळ दिला नाही त्याने. तुम्ही आधी मला त्याची कल्पना का दिली नाही?"
"मला वाटले तो स्पर्धेत व्यस्त असेल. त्याचे लक्ष त्या मुलीवरच असेल हे मला माहीत नव्हते." रोमा म्हणाली.
"खूपच खतरनाक माणूस आहे तो." क्रिसचे नाव घेताना तो अजूनही थरथरत होता.
"हो ते तर आहेच. डोके नेहमी सटकलेले असते त्याचे. एकदा राग आला की तो काय करेल याचा नेम नसतो."
"तो बॉयफ्रेंड आहे का त्या मुलीचा?" त्याने सहज विचारले.
"नो वे! हे घे तुझे पैसे. थोडे जास्तच दिले आहेत पण तुझे तोंड बंद ठेवायचे. यापुढे मी तुला ओळखत नाही आणि तू मला." रोमा बजावून म्हणाली.
"प्रॉमिस मॅडम!"



इकडे डॉक्टर आणि क्रिसच्या गप्पा सुरूच होत्या.

"हो डॉक्टर, माझे जीवनच बदलून टाकले आहे जुलियानाने. ती जेव्हापासून माझ्या आयुष्यात आली आहे मला एक नवी दिशा मिळाली आहे. काय होतो मी? एक बिघडलेला तरुण जो प्रत्येक मुलीला फक्त उपभोगाचे साधन समजत होता. पण हिने काय जादू केली माहीत नाही. आता मला माझ्या भूतकाळातील कृत्यांचा पश्चाताप होतोय." क्रिस मनापासून बोलत होता.
तेवढ्यात जुलियाना चहा घेऊन बाहेर आली.
"लीजिए डॉक्टर, चाय लीजिए..."
"थँक्यू..." डॉक्टरांनी चहाचा कप घेतला.
"डॉक्टर, जुलियाना खूपच उत्तम चहा बनवायला लागली आहे. सकाळी तिच्या हातचा चहा घेतल्याशिवाय मला चैन पडत नाही." क्रिस म्हणाला.
डॉक्टरांनी चहाचा घोट घेतला. "हो खूपच मस्त झालाय. जुलियाना, आम्ही तुझ्याबद्दलच बोलत होतो."
"माझ्याबद्दल? काय डॉक्टर साहेब?"
"तुला क्रिस आवडतो ना?"
"हो, राणा सा खूप चांगले आहेत." जुलियाना लाजत म्हणाली.
"तसे नव्हे, तुला आयुष्यभर क्रिसची साथ हवी आहे का? तू क्रिससोबत लग्न करणार का?" डॉक्टरांनी थेट विचारले.
"म्हणे ब्याह?"
"हो... लग्न."
"हो सा... राणा सांशी लग्न करायला कोणाला आवडणार नाही? त्यांच्यासारखा पती मिळणे हे कोणाचेही स्वप्न असेल." जुलियानाने कबुली दिली.
"म्हणजे दोघांचीही पसंती आहे, मग काहीच टेन्शन नाही." डॉक्टर हसले. जुलियाना लाजेने लालीलाल झाली.
तेवढ्यात पुन्हा दारावरची बेल वाजली. क्रिसने दार उघडले तर समोर राघव होता. क्रिस राघवला काहीतरी खुणावण्याचा प्रयत्न करत होता पण त्याकडे दुर्लक्ष करत राघव आत शिरला. समोर डॉक्टर बसलेले पाहून तो गोंधळला. प्रश्नोत्तरांच्या फेऱ्यात अडकण्यापेक्षा इथून निसटलेले बरे असा विचार करून तो मागे फिरला.
पण डॉक्टरची नजर त्याच्यावर पडलीच.
"ए थांब, कुठे पळतोयस?" डॉक्टरने त्याला थांबवले.
"ज... जरा घरी जाऊन येतो डॉक्टर." राघव अडखळत म्हणाला.
"का? आत्ताच तर आलास, मग लगेच का जातोयस?"
"मी... मी काहीतरी विसरलो आहे... ते आणायला जातो."
"काय विसरलास?"
"ते... पेन! हो पेन विसरलो आहे मी. घरी जातो आणि पेन घेऊन येतो." राघव कसाबसा म्हणाला.
"पेन कशासाठी?"
"लिहायला... मला लिहायचे आहे."
"काय लिहायचे आहे?" डॉक्टरने विचारले.
"असेच... एक नाटक. डोक्यात एक नाटकाची संकल्पना सुचली आहे ती लिहायची आहे." राघव गडबडून बोलला.
"असा इकडे ये..." डॉक्टरने त्याला जवळ बोलावले. राघव जड पावलांनी डॉक्टरपाशी आला.
"पेन हवे ना तुला? हे घे पेन." डॉक्टरने खिशाचे पेन त्याला दिले.
"अं... पेन?"
"हो, आता लिही काय लिहायचे आहे ते."
"काय लिहू?"
"आत्ताच नाटक लिहायचे म्हणत होतास ना? मला एक सांग, तू ड्रग्ज वगैरे घेत नाहीस ना? लक्षणे काही ठीक दिसत नाहीत तुझी. विनाकारण गोंधळल्यासारखा दिसतोयस." डॉक्टर संशयाने म्हणाले.
"मी आणि ड्रग्ज? मुळीच नाही! ए जुलियाना, तू इथे काय करतेयस? आत जाऊन आराम कर ना." राघवने विषय टाळण्याचा प्रयत्न केला.
"जुलियाना एकदम ठणठणीत आहे, तू तिची काळजी नको करू. आणि हे बघ राघव, मला आता सगळे माहीत आहे, काहीच लपवायची गरज नाही."
"काय? तुम्हाला सगळे माहीत आहे? कसे? ए क्रिस, गुपित उघड झाले की काय?" राघवचा गोंधळ वाढला.
"काय बडबड करतोयस?" डॉक्टर हसले. "मला हे माहीत आहे की जुलियाना क्रिसची बहीण नाही तर गर्लफ्रेंड आहे."
"क... काय? क्रिस?" राघवने हळूच क्रिसकडे पाहिले.
"अरे तू फक्त हो म्हण!" क्रिसने डोळा मारला.
"काय हे क्रिस? कुठलेही नवीन नाटक बसवण्याआधी मला किमान कल्पना तरी देत जा." राघव पुटपुटला.
"आता काही लपवू नका. लवकरात लवकर क्रिस आणि जुलियानाच्या लग्नाची तयारी करा." डॉक्टर म्हणाले.
"काय? लग्न? क्रिस, हे कधी ठरले?" राघव आश्चर्याने ओरडला.
"तू फक्त हो म्हण ना..." क्रिस हसत म्हणाला.
"कुणाच्याही हातात स्क्रिप्ट न देता त्याला थेट स्टेजवर चढवावे तशी माझी अवस्था केली आहे तुम्ही." राघवला काहीच कळेनासे झाले होते.
"हा राघव जरा जास्तच चळवळ करतोय." डॉक्टर म्हणाले.
"नाही डॉक्टर... चळवळ नाही. इथे एक अंक संपलाय आणि माझ्या हातात अजून स्क्रिप्टच आलेली नाहीये." राघव स्वतःशीच पुटपुटला.
"तू वेडा झाला आहेस की काय? आल्यापासून काहीतरी अर्थहीन बडबड करतोयस." डॉक्टर उठले. "बरं क्रिस, मी निघतो. चर्चच्या फादरशी बोलून मला अपडेट कर."
"हो डॉक्टर, नक्कीच." क्रिस म्हणाला.
"आणी तू? स्क्रिप्ट हातात आली की डायलॉग पाठ कर, विनाकारण गडबडतोस तू." डॉक्टरांनी जाता जाता राघवला टोमणा मारला.
डॉक्टर बाहेर गेले.
"हं! माझेच डायलॉग मलाच मारून गेला हा माणूस!" राघव वैतागला. क्रिस मात्र खळखळून हसला.
क्रमश:

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →