Login

आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी ( भाग एक )

प्रॉब्लेम एक आणि सोल्युशन दुसरेच अशा आशयाची कथा

" सोहम , येता-जाता तुझ्या आईने मला बोललेच पाहिजे का..? त्याशिवाय त्यांच्या गळ्याखाली घास उतरत नाही का..?"

"काय झाले आता प्रिया..? सुट्टीच्या दिवशी का इतकी चिडचिड करत आहेस..?"

"तुला माझी चिडचिड दिसते पण चिडचिड का होते ते कळत नाही का..? मला कशावरूनही बोलले जाते या घरात.."

"ओके.."

"ओके...????? म्हणजे का चिडचिड होत आहे हे विचारायची तसदी तरी घे.."

" सुरुवातीला तेच विचारले होते मी प्रिया.. पण तुला आदळ आपट करण्यापासून फुरसत मिळाली की निवांत सांग.."

"सगळे पुरुष सारखेच.. मी तरी कसे अपवाद असेन म्हणा.."

" आता सांगशील का काय झाले..??"

"मला सांग, हे जे मी काही घातले आहे ते काही वाईट दिसत आहे का..?"

"प्रिया स्पष्ट सांग."

"तुझी आई आपल्या कामाला मावशींना सांगत होती, आज कालच्या मुलींना सलवार, सूट, साडी घालायला नको.. नुसता जीन्स घालून फिरतात आणि घरात हे असलं नाईट ड्रेस की फाईट ड्रेस असली सोंग घालून फिरतात..."

"हा हा हा हा हा हा हा..." सोहम जोर जोरात हसायला लागला.

" सोहम मी तुला शेवटचे सांगत आहे , जर मला पुन्हा कपड्यांवरून बोलले गेले तर मी घर सोडून निघून जाईन.."

" अगं कशाला इतकी चिडचिड करत आहेस..? सुट्टीचा दिवस एन्जॉय कर ना..चल आपण आईस्क्रीम खाऊन येऊ.."

"कशी येऊ आईस्क्रीम खायला...??? साडी नेसून की सलवार सूट घालून ..?नाहीतर एक काम करते लग्नात मिळालेले सगळे दागिने अंगावर घालते आणि येते आईस्क्रीम खायला, चालेल..????"

"अग तू कशीही छानच दिसतेस ...एक काम कर, तुला आवडतो तो टॉप आणि जीन्स घाल.. आपण लगेच जाऊन आईस्क्रीम खाऊन येऊ.."

तेवढा पुरता तो विषय मिटला आणि सोहम आणि प्रिया आईस्क्रीम खायला गेले.. प्रियाने पुन्हा जीन्स घातलेले बघून तिच्या सासूबाईंनी म्हणजेच सिंधुताईंनी रागाने मान हलवली..

सोहम आणि प्रियाच्या लग्नाला दीड वर्षे झाली होती.. सुरुवातीचे तीन-चार महिने बरे गेले, पण त्यानंतर प्रियाला सिंधुताईंचा स्वभाव कळू लागला.. त्या छोट्या-मोठ्या गोष्टीत नाक मुरडत असत ... एखाद्याचा अपमान करायला सुद्धा कमी करत नसत.. मुळात त्यांना कोणत्या गोष्टीचा प्रॉब्लेम होता असे नव्हते, तर त्यांचा स्वभावच एक मोठा प्रॉब्लेम होता...

प्रियाच्या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये त्या लक्ष द्यायच्या आणि तिला वाटेल तसे बोलायच्या... सुरुवातीला प्रियाने ऐकून घेतले पण नंतर तिची सुद्धा चिडचिड व्हायला लागली..

"लिंबू आडवाच चिरायचा, उभा चिरू नये.."

"बघावा तेव्हा ओट्यावरती पसारा असतो, जेव्हाचे तेव्हा किचनचा ओटा आवरावा.. अशाने घरातली असलेली लक्ष्मी पळून जाईल.."

"ऑफिसच्या नावाने कसे तरी काम उरकायचे आणि बाकीचे माझ्या म्हातारीच्या बोकांडी ठेवायचे.. मी काय आहेच इथे सगळे उरकायला...नोकरी करून कोणावर उपकार करतात देव जाणे.."

अशा एक ना अनेक सूचना... एक ना अनेक अपमान प्रिया रोज ऐकायची.. सुरुवातीला तिने दुर्लक्ष केलेले असले तरी आता ती सुद्धा उलट उत्तरे द्यायला चालू झाली होती..

शेवटी तीही माणूसच... ऐकून ऐकून किती ऐकणार?? आणि सांगायची सुद्धा काहीतरी पद्धत असते.. एखाद्याला हिणवण्यासाठी मुद्दाम काहीतरी बोललेले तो तरी माणूस किती ऐकून घेणार??

पण प्रिया भांडायला गेली की शब्दाने शब्द वाढायचा आणि सिंधुताई आदळपट करायच्या, नाहीतर प्रियाच्या माहेरच्यांचा उद्धार करायचा..

"असंच वागायला शिकवले आहे का माहेरी???? मोठ्यांशी बोलायची पद्धत माहित नाही का?? आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार वगैरे वगैरे..."

शेवटी प्रिया तणतण करत सगळ्या तक्रारी घेऊन सोहमकडे यायची.. सोहमला तिच्या प्रॉब्लेमशी काही जास्त घेणे देणे नसायचे, एकतर तो महाआळशी माणूस होता.. सुट्टीच्या दिवशी नुसता लोळत पडायचा किंवा ऑफिस वरून थकून आल्यावर नुसता मोबाईल मध्ये तोंड घालून बसायचा..
त्यात प्रियाने काही तक्रारीचा पाढा वाचल्यावर त्याच्या कपाळावर आठ्या यायच्या.. प्रियाची तक्रार किंवा घडलेली हकीकत तो पूर्णपणे ऐकून सुद्धा घ्यायचा नाही.. म्हणजे ऐकल्यासारखे दाखवायचा पण त्याचे अर्धे लक्ष फोन मध्येच असायचे..

तिने वाचलेल्या तक्रारीच्या पाढ्यातून तो पळवाट काढायला बघायचा, जेणेकरून प्रिया सुद्धा ती तक्रार विसरून जाईल आणि त्याच्या डोक्याला सुद्धा कटकट उरणार नाही ...

"प्रिया शांत हो जास्त चिडचिड करू नकोस.."

"अग आईचा स्वभाव असाच आहे.. कुठे एवढे मनावर घेतेस .." असे बोलून तो प्रियाला कटवायला बघायचा..

पण प्रियाचा राग कधी आऊट ऑफ कंट्रोल जायच तेव्हा तो फारसा सिरिअस न होता विषय बदलायला बघायचा, जेणेकरून शांततेत त्याच्या मागची कटकट निघून जाऊ दे. प्रिया पण शांत होईल आणि त्याला पण फार काही कष्ट करायला लागणार नाहीत आणि एन्जॉयमेंट सुद्धा होईल असे मार्ग तो काढायला बघायचा.... जसे की,

"चल प्रिया पण आईस्क्रीम खाऊन येऊ.."

"चला आज आपण एखादा मूवी बघून येऊ.."

"चल आज नेटफ्लिक्स वरती आपण काहीतरी नवीन सिरीज बघू.."

"एक काम करूया ... आपण आज चौपाटीवरची भेळ खायला जाऊया.."

याच्याने व्हायचे असे की तेवढ्यापुरते तणाव मुक्त करायला हे पुरेसे असले तरीही सिंधुताईंचा गैरसमज व्हायचा की लेकाला आणि सुनेला त्यांचे काही पडलेलेच नाही... आणि त्या अजून जास्त राग प्रियावर काढायच्या.. आणि त्यांची दिवसभराची वाढीव बडबड ठरलेली असायची..
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →