समीक्षण : पन्नास रुपयाची गोष्ट! (ईरा शॉर्टफिल्म)
'पन्नास रुपयाची गोष्ट' ही ईरा व्यासपीठाने आणलेली नवीन आणि पहिलीच शॉर्ट फिल्म आहे. लेखन विश्वात विविधांगी प्रयोग करणाऱ्या ईराने आता लेखनाला अभिनयाची जोड देण्यासाठी पाऊल उचललंय.
काही संघर्ष असे असतात, ज्यांचे मनावरील घाव परिस्थिती बदलली तरी आयुष्यभरासाठी सोबत राहतात. बरेचदा कंजूषपणाबद्दल, खर्चात हात आखडता घेण्याविषयीही काहीबाही बोललं जातं; पण पार्श्वभूमी काही वेगळीही असूच शकते ना! याच पद्धतीची नाण्याची दुसरी बाजू या शॉर्टफिल्ममध्ये दिसते.
या शॉर्टफिल्मची सुरुवात होते एका घरातील सासू-सुनेपासून. सासू आपल्या सुनेकडे त्यांच्याकडून घेतलेले पन्नास रुपये मागत असते. हो बरोबर वाचलंत, 'पन्नास' रुपये! ऑनलाईन दुनियेत रमणाऱ्या सुनेने रोख रक्कम नसल्याने सासूकडून पैसे घेतलेले; पण सासूबाई मात्र पन्नास रुपये परत करण्यासाठी जणू तिच्या मागेच लागतात. परिणामी ही आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रातली सूनबाई काहीशी वैतागतेच. तिच्या चेहऱ्यावरचे ते हावभाव तिचा त्रागा व्यक्त करण्यात यशस्वी ठरतात. हे असंच तर घडत असतं आसपास!
शेवटी सूनबाई ते पन्नास रुपये परत करते बरं आणि इथेच कथानकाचं मुख्य वळण येतं. पन्नास रुपयांची गोष्ट! स्वतःचे असे पैसे असून, मुलगा आणि सून पैसे देत असूनही सासूबाई पन्नास रुपयांच्या मागे का लागल्या असाव्यात? याची उत्तरं मिळायला सुरुवात होते. ही उत्तरं 'पन्नास' रुपयांची किंमत सांगतात. इथे तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा छान प्रयत्न केला आहे. भूतकाळातील प्रसंग सांगताना ते तंत्रज्ञानाच्या माध्यमातून समोर येत असले तरी सांगणाऱ्याच्या बोलण्यात एकप्रकारची रंजकता आहे.
जुन्या-नव्या पिढ्यांची परिस्थिती, विचारसरणी यांचा मेळ साधणाऱ्या या कथानकाला वास्तवाची झालर आहे एवढं खरं. नावाजलेल्या मालिकांमधील अभिनेते संदीप महाजन यांनी कथेतील एकमेव नायकाची, तसेच दिग्दर्शकाची भूमिका चोख बजावली आहे. अनघा धोडपकर यांनी भूमिका निभावलेल्या सासूबाई काहीशा गंभीर पण तरीही शांत वाटतात. तर अभिनेत्री रुपाली तावरे यांची भूमिका असलेली सूनबाई आताच्या काळातील धावपळीच्या जीवनाचं प्रतिनिधित्व करणारी आहे. कथानकाची गरज म्हणून असलेली निवडक पात्रं, अभिनय आणि तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर हे सगळं छान जुळून आलंय. फापटपसारा न ठेवता निवडक मुद्द्यांचा वापर करून चांगली मांडणी केली आहे. ईरा ब्लॉगिंगची निर्मिती असलेला सादरीकरणाचा हा पहिलाच प्रयत्न बऱ्याच अंशी यशस्वी ठरलाय असं नक्कीच म्हणता येईल. एकंदरीत ईराच्या संस्थापिका लेखिका संजना इंगळे यांच्या कथेवर आधारित हे चित्रीकरण छानच झालंय.
पन्नास रुपयांची गोष्ट नक्की काय? सूनबाईचा त्रागा कमी झाला की नाही? सासूबाईंच्या स्वभावामागचा भूतकाळ नक्की काय? हे सर्व जाणून घेण्यासाठी लेखनाला अभिनयाची जोड दिलेलं ईरा व्यासपीठाचं हे पहिलं सुरेख चित्रीकरण नक्की बघा.
© कामिनी सुरेश खाने
१४ एप्रिल २०२६
© कामिनी सुरेश खाने
१४ एप्रिल २०२६
सदर लिखाणाचा कॉपीराईट लेखिकेकडे असून यूट्युब चॅनेल अथवा इतर कुठेही याचा वापर केला गेल्यास कडक कायदेशीर कारवाई केली जाईल याची नोंद घ्यावी.
