प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: इनपण भाग-१
श्वेता आणि रमेश यांचे नुकतेच लग्न झालं होतं. दोघांचंही गाव वेगळे असल्यामुळे त्यांच्या प्रथा सुद्धा वेगळ्या होत्या.
लग्न झाल्यानंतर रमेशच्या घरच्यांना सांगून श्वेता आपल्या माहेरी काही दिवस राहण्यासाठी गेली होती.
" काय मग सर्व ठीक आहे ना? " पोहोचल्यावर तू फोन पण केला नाहीस?" तिच्या नवऱ्याने तिला माहेरी गेल्यानंतर फोनवर विचारलं.
" हो, इकडे आल्यावर सगळेजण भेटण्यासाठी उत्सुक असल्यामुळे सगळ्यांशी बोलण्यामध्ये वेळ गेला आणि तुम्हाला घरी पोहोचले असं सांगणे राहून गेलं." तिने त्यावर त्याला उत्तर दिले.
" तुला माहीत आहे का आपल्याकडे एक जुनी प्रथा आहे, म्हणजे ही फार पूर्वीपासूनच चालत आली आहे. आपल्या दोन्ही घरांमध्ये सुरुवातीपासून चांगले संबंध रहावे म्हणून एकमेकांना एकमेकांची व्याही झालेले आहेत त्यांना जेवायला बोलवतात."
दोघेजण रात्री बोलत होते आणि तेव्हाच रमेशने तिला एका प्रथेबद्दल सांगितले.
"मला याबद्दल काहीच माहीत नाही." श्वेताने सांगितले.
" खरंतर, असं म्हणतात की एकमेकांना जेवणाचे आमंत्रण दिल्याशिवाय सासरी आई-वडिलांना जाता येत नाही." त्याने सांगितले.
तेवढ्यात श्वेताला लक्षात आले की, घरामध्ये सगळे नातेवाईक लग्न झाल्यावर त्यांच्या कामाच्या निमित्ताने आपापल्या घरी निघून गेले होते आणि त्यामुळे कोणी सुद्धा श्वेताला सासरहून माहेरी घ्यायला येण्यासाठी उपलब्ध नसल्यामुळे तिचे वडीलच तिला घ्यायला आले होते.
" काही झाला आहे का?" तिने विचारले.
" नाही, मी तुला फक्त सांगत आहे. " तो म्हणाला.
थोडावेळ बोलून दोघे सुद्धा झोपी गेले.
" मला तर एक गोष्ट समजत नाही. श्वेताच्या घरच्यांना इनपणाबद्दल माहीत आहे का नाही ? का सगळ्या गोष्टी आधुनिकरित्या करायचे आहेत म्हणून त्यांना ते सुद्धा करायचे नाहीये." श्वेताच्या सासरच्या भावकीतली एक स्त्री श्वेताच्या सासुला म्हणाली.
" त्यांन काही गोष्टी माहिती नाहीयेत, तसेच श्वेताला आणायला अजून कोणी नव्हते; त्यामुळे तिचे वडील आले आणि ही काय फार मोठी गोष्ट नाहीये, तर आपण समजून घेऊ शकतो ना." श्वेताच्या सासुने तिच्या घरच्यांची बाजू घेतली.
" मग तुम्ही सांगायचं होतं ना की, अशी प्रथा असल्याशिवाय मुलीच्या सासरी जाता येत नाही." त्यांनी त्यावर आपले मत सांगितले.
" हे बघा, लग्न व्यवस्थित झाले आणि सगळ्या रीतीभाती व्यवस्थित झालेल्या आहेत आणि आता या गोष्टीवरून वाद होण्यापेक्षा, उद्याच मी त्यांना फोन करून सांगतो." श्वेताच्या सासऱ्यांनी सांगितले.
लग्नामध्ये कोणती रीत राहिली असेल किंवा एखाद्या व्यक्तीचा मान-पान राहिला असेल, तर त्यावरून एखादा तरी असा नातेवाईक किंवा भावकीतील व्यक्ती असते, जिला मुद्दामून मिठाचा खडा टाकायची सवय असते, असेच काहीसे झाले होते.
रात्री आपल्या नवऱ्याने सांगितलेली गोष्ट ऐकून श्वेताचे सुद्धा मन चलबिचल झाले होते आणि म्हणून तिने ही गोष्ट आपल्या आई-वडिलांच्या कानावर घातली.
"खरं तर, मला याबाबत काही माहिती नाही आणि आपल्याकडे पण अशी प्रथा नाहीये ,परंतु तसं असेल तर आता त्यांना आता तू पुन्हा सासरी गेल्यावर, एक दिवस आम्ही तुझ्या सासरच्या लोकांना जेवायला बोलवतो." त्याचे वडील म्हणाले.
श्वेताला वाटत होते की, ज्या आई-वडिलांनी आपल्याला लहानाचं मोठं केलं तसेच आता या एका छोट्याशा प्रथेमुळे त्यांना परवानगी घेतल्यासारखं मुलीच्या सासरी जावं लागत आहे.
पाठवणीच्या वेळेस ढसाढसा रडणारे आपले आई-वडील त्यावेळेस तिला दुःख तर झाले होतेच, परंतु ह्या एका गोष्टीमुळे तिच्या सासरी कोणी काहीतरी बोलले असेल का, याची सुद्धा हुरहूर तिला लागली होती.
सकाळीच श्वेताच्या सासऱ्यांनी व्यवस्थितपणे श्वेताच्या वडिलांना त्या प्रथेबद्दल सांगितले.
एक दिवस ठरवून श्वेताच्या आई-वडिलांनी श्वेताच्या सासरच्या मंडळींना जेवणासाठी घरी बोलावले होते.
"मला माफ करा मला ह्या प्रथेबद्दल जास्त काही माहीत नव्हते आणि त्यामुळेच आमच्याकडून ही गोष्ट राहून गेली." श्वेताचे वडील म्हणाले.
" काही हरकत नाही. एखाद दुसरी गोष्ट विसरलीच जाते आणि तुम्हाला माहीत नव्हतं, याची आम्हाला कल्पना होती; म्हणूनच आम्ही तुम्हाला फोन करून सर्व व्यवस्थित सांगितले." श्वेताची सासू तिच्या आईला म्हणाली.
"तरीसुद्धा तुम्ही आधी फोन करून विचारले असते तर बरं झालं असतं. " त्याचवेळी ज्या भावकीतल्या बाईने हा मुद्दा बनवला होता तिथे उपस्थित होती आणि तिने त्यावर आपले मत मांडले.
" मला असं वाटतं ही गोष्ट काही मोठी नाहीये आणि ह्याचा उगाचच मोठा मुद्दा करायची गरज नाहीये." श्वेताच्या नवऱ्याने सांगितलं.
त्यावर त्या भावकीतल्या बाईने गप्प राहणे योग्य समजले.
" तुम्हाला सुद्धा आम्ही आमच्या घरी इनपणासाठी आमंत्रित करत आहोत. " श्वेताच्या सासऱ्यांनी श्वेताच्या आई-वडिलांना आमंत्रण दिले.
क्रमशः
पुढे काय होईल ?
© विद्या कुंभार
कथेचा भाग आवडल्यास लाईक आणि कमेंट नक्की करा.
(सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत. कोणत्याही प्रकारे कथेतील मजकूर, भाग किंवा काहीही कॉपी करण्याचा प्रयत्न केला तर कारवाई करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.)
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
