मी भारत.

देश
भारत माझे नाव मी वैविध्याने नटलेला,
गौरवशाली इतिहास माझ्या भूतकाळात साठलेला,
निसर्गसंपन्न असा मी ,होतो सुवर्णनगरी,
लुटून गेल्या मला घुसखोर ब्रिटीश मगरी.

बुद्धिवंतांचा प्रदेश माझा, मी ज्ञानाचा प्रसारक,
मीच जगाला दिला पहिला शल्यविशारद,
ताजमहालाचे मोहक दृश्य माझ्याच ठायी वसते,
हिमालयाची सुंदरता येथे मनोमनी दिसते.

नालंदा,तक्षशिला ही विद्यापीठे नावाजली,
छत्रपतींची स्वराज्य संकल्पना चौमुलखी गाजली,
शाहू महाराजांच्या आखाड्यात मल्ल तयार झाले,
येथेच फुलेंनी स्त्री-शिक्षणाचे दार खुले केले.

भाभा,साराभाई यांचा विचार कलामांनी अमलात आणला,
भारतीय विज्ञानाचा डंका जगभरात वाजवला,
जनतेच्या संघर्षाने स्वातंत्र्य मी मिळविले,
पण राजकारण्यांच्या स्वार्थापायी सारे मातीमोल झाले,

फाळणीच्या जखमा माझ्या अजूनही दुखतात,
भूतकाळाच्या कडू आठवणी अजूनही खुपतात,
मीच आहे तो ज्याने जगास शिकवली एकता,
पण जातींमध्ये विभागून माणसामाणसात आली विषमता,

जातीयतेच्या जोखडात कित्येक पडले भक्ष्य,
त्या धर्मसर्पाने घटनाकार आंबेडकरांसही केला दंश,
आज स्वातंत्र्य अमृत महोत्सवीही मनी माझ्या आहे खंत,
धर्म अन जात सोडून आपण केव्हा मिटवू माणुसकीची भ्रांत.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →