ऐकतच नाही भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगांवकर
" अगं काय सांगू तुला. तो ना अजिबात ऐकत नाही. त्यामुळे आता तर आम्ही त्याला काही बोलणंच सोडलंय. " नमिता माही ला अगदी नखऱ्याने म्हणाली.
" अहो ताई पण त्याने ( रोहनने ) फुलदाणी तोडली. ती ही माझ्या ताईने जर्मनीवरून पाठवलेली. " माही भावुक होत म्हणाली.
" ठीक आहे गं. काय एवढं त्या फुलदाणीच ? फुलदाणीच आहे ना ? जर्मनीची असली म्हणून काय झालं ? आज ना उद्या तुटलीच असती ना ? लहान आहे तो. मस्ती करणारच ना ? त्यावरून सुरुवात करू नकोस बाई. माझी लेक आणि नातू वर्षभराने आले आहेत. " नेत्राबाई फनकाऱ्याने म्हणाल्या.
माही - सचिनच्या लग्नाला वर्ष झालं होत. सर्व व्यवस्थित सुरु होत. पण उन्हाळ्याची सुट्टी लागली म्हणून नमिता म्हणजेच माहीची नणंद लग्नानंतर यावेळी वर्षभराने आली होती. कारण त्यांच्या यजमानांची नोकरी बाहेरच्या राज्यात होती. त्यामुळे माहीला या गोष्टींची कल्पना नव्हती. माहीने नणंद येणार म्हणून ऑफिसमधून काही दिवस वर्क फ्रॉम होम घेतलं होत.
रोहन अकरा - बारा वर्षांचा होता. मात्र त्याला वळण अजिबात नव्हतं. त्यात भर म्हणजे त्याने काही केलं तर त्याला ओरडणं सोडून नमिता नेहमी ' तो आमचं ऐकतच नाही. काय करणार ? ' म्हणून बोलायची. त्यामुळेच रोहनला आपल्या मनाप्रमाणे वागायची सवय झाली होती.
माहीला नणंद आणि सासूबाईचं बोलणं पटलं नाही. ' मुलाला धाक ठेवायचा सोडून त्याचं कौतुक काय करतायत ?' पण ती काही बोलू शकत नव्हती. रोहनने जेवायला बसल्यावर सुद्धा भरलेलं ताट बाजूला केलं आणि पास्ताच हवा म्हणून अडून बसला. माहीने त्याला समजावण्याचा प्रयत्न केला तर पुन्हा सासूबाई मध्ये बोलल्या, " तो आजोळी आला आहे. त्याला हवं ते बनवून दे. उगाच त्याला जेवणावरून त्रास नको देऊस. "
" वहिनी अगं आई बरोबर बोलतेय. तसही तो ऐकत नाही. त्याला जे हवं ते हवंच असतं. त्याला दे थोडा पास्ता बनवून. " नमिताने सुद्धा माहीलाच समजावलं.
रोहन आता बेड वर हवं तसा नाचायचा. सोफ्याचे कव्हर खेचून काढायचा. माही पुरती कंटाळली होती. माही भांडी घासून बेडरूम मध्ये आली तर तिथे रोहनने तिचं कपाट उघडून सर्व इकडे तिकडे केले होत. ते पाहून माहीला खूप राग आला. ती रोहनला ओरडली. तिचा आवाज ऐकून नेत्राबाई आणि नमिता दोघींही बाहेर आल्या.
" काय झालं माही ? एवढं का ओरडतेस माझ्या नातवाला ? " नेत्राबाई रागाने म्हणाल्या.
" आई, तुम्हीच बघा रोहनने काय करून ठेवलं आहे ? मुळात माझ्या कपाटाला हात लावायची गरजच नव्हती. कारण त्याची खेळणी काही माझ्या कपाटात तर असणार नाहीत. मग का म्हणून त्याने कपाट उघडलं. वर त्याने सर्व पसारा केला. सर्व कपड्यांच्या घड्या मोडल्या. " माही ला अस्ताव्यस्त कपाट पाहून राग आला होता.
" वहिनी अगं यात एवढं राग याण्यासारखं काय आहे ? लहान आहे तो. उत्सुकता असते, काय असेल कपाटात बघण्याची. म्हणून एवढं ओरडायची काय गरज आहे. आणि तसही तो ओरडून ऐकत नाही. सांगितलं ना तुला आधीच ? आता काय तूझ्या ओरडल्याने तो ऐकणार आहे का ? करू दे ना त्याला जे करायचं आहे ते. " नमिता सुद्धा माही लाच बोलते.
माहीला त्यांचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटत. रात्री सुद्धा नमिता आणि नेत्राबाई सचिनला बोलतात.
माहीला त्यांचं बोलणं ऐकून आश्चर्य वाटत. रात्री सुद्धा नमिता आणि नेत्राबाई सचिनला बोलतात.
" नमिताच घरी येणं, आवडलेलं नाहीये बहुतेक तूझ्या बायकोला. " नेत्राबाई सचिनला बोलतात.
" हो ना, जेव्हा पासून घरी आलीये मी. वहिनी फक्त तक्रार करतेय. आज तर ती रोहनला ओरडली सुद्धा. आता तो नाही ऐकत कोणाचं. तर काय करणार ? आम्ही थोडे दिवस आलोत, पण नाही, माहीला पटलं नाहीये." नमिता सुद्धा सचिनला भडकवत म्हणाली. सचिनला माहीचा राग आला.
