Login

हृदयी प्रेम न उरले !

.
हृदयी प्रेम न उरले !

सकाळचा प्रहर होता. रविवार असल्यामुळे नेहाच्या ऑफिसला सुट्टी होती. नाश्ता करताना तिने फेसबुक उघडले. पियुषने तिला मेसेज केला होता.

पियुष : मी वाट पाहतोय तुझ्या उत्तराची.

नेहा : कसले उत्तर?

पियुष : माझ्या प्रोपोजलबाबतचे उत्तर.

नेहा : ते मी त्या दिवशीच दिले.

पियुष : नकार?

नेहा : हम्म.

पियुष : पण का यार? माझ्यात काय कमी आहे? आपण दोघेही वेल सेटल्ड आहोत. मग काय अडचण आहे?

नेहा : कमी तुझ्यात नाही. कमी माझ्यात आहे.

पियुष : म्हणजे?

नेहा : माझ्या हृदयात आता प्रेम उरले नाही. मग मी तुला प्रेम कुठून देऊ?

पियुष : कळलं नाही.

नेहा : माझं एका मित्रावर खूप प्रेम होतं.

पियुष : ऑफिसमधला होता का तो ?

नेहा : हो.

पियुष : मग काय झालं?

नेहा : मी कधी मित्र म्हणून त्याच्यावर प्रेम करायचे, कधी प्रियकर म्हणून, तर कधी शारीरिक आकर्षण वाटायचं म्हणून प्रेम करायचे.

पियुष : एकाच व्यक्तीवर मित्र म्हणून आणि रोमँटिक प्रेमसुद्धा?

नेहा : हो. पचनी पडण्यास अवघड आहे, पण असंच होतं.

पियुष : मग काय झालं?

नेहा : मी त्याला प्रोपोज केलं. प्रोपोज करण्यापेक्षा माझ्या मनात त्याच्याविषयी किती प्रेम आहे ते सांगितलं.

पियुष : त्याने ब्लॉक केलं का ? कारण मी तुझे सॅड स्टेट्स पाहिले.

नेहा : नाही. नकार दिला. मुळात नकारही दिला नाही. दोघानाही उत्तर माहिती होतं. मला फक्त माझ्या मनातली घुसमट संपवायची होती.

पियुष : मग मैत्री टिकली का?

नेहा : अर्थातच नाही. तो तुटकपणे वागू लागला. भांडणं झाली आणि मग त्याने मला ब्लॉक केलं.

पियुष : आपल्या विश्वात सर्वांनी असे अनुभवले असतेच.

नेहा : मी माफी मागण्याचा हजारदा प्रयत्न केला, परंतु त्याने कधी माझी लायकी काढली तर कधी घाणेरड्या शिव्या दिल्या.

पियुष : बापरे!

नेहा : आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, तीच जेव्हा आपल्याला रडवते तेव्हा खूप त्रास होतो.

पियुष : शत्रूंच्या घावापेक्षा मित्रांनी दिलेले घाव जास्त जखमा देतात.

नेहा : अर्थातच.

पियुष : पुढे काय झालं?

नेहा : माझ्या जीवनकथेतला हिरो माझ्या जीवनातला व्हिलन बनला होता.

पियुष : त्याने अनब्लॉक केलं?

नेहा : नाही. एकेदिवशी त्याला फोन लावला. परत भांडण पेटलं. मी खूप रडले. त्याने अनब्लॉक करणार नाही हे स्पष्टपणे सांगितलं.

पियुष : सोडून द्यायचं.

नेहा : पण शेवटी "काळजी घे" म्हणाला. त्या दोन शब्दांत खूप जिव्हाळा, आपुलकी वाटली. नातं तुटल्याचं दुःख होतंच, पण गुड नोटवर नातं संपलं याचा आनंदही झाला.

पियुष : यार, पण त्याचा माझ्याशी काय संबंध?

नेहा : मी त्या मित्रावर खूप जीव लावला, तरी तो निष्ठुरपणे मला सोडून गेला. आता प्रेम, मैत्री या शब्दांवर विश्वासच उरला नाही. इतका जीव एखाद्या पाषाणावर लावला असता तर त्यालाही पाझर फुटला असता. पण आता हृदयात भावनाच उरल्या नाहीत. दूध का जला छाछ भी फूंक-फूंक कर पीता है. आता परत प्रेमाची, जीव लावण्याची, अटॅचमेंटची भीती वाटते आहे.

पियुष : पण या सर्वांमध्ये माझी काय चूक?

नेहा : तुझी काहीच चूक नाही. पण परत रिस्क घेऊ शकत नाही. पुन्हा रडत बसायचं नाही. कुणासाठी झुरायचं नाही. या जगात संवेदनशील लोकांनाच जास्त त्रास दिला जातो. मोठ्या श्रमाने पाषाणहृदयी बनले आहे. आता पाझर फुटणे अशक्यप्राय. बहुत काय लिहिणे, आपण सुज्ञ असा!

पियुषला समजायचे ते समजले.

©® पार्थ
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →