Login

हिसका    भाग १

सुनेच्या प्रत्येक आजारपण, प्रेग्नन्सी, बाळांतपण यासाठी तिच्या माहेरून लग्न झालेल्या बहिणीला बोलावलं जायचं. यावर काय तोडगा काढला जातो ? ते या कथेत वाचा.


हिसका    भाग १


@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगांवकर


" मला काही माहित नाही. मला सोन्याचा हार हवा म्हणजे हवाच. " रिया नियती आणि तिच्या सासरच्यांना सर्व नातेवाईकांमध्ये स्पष्टपणे म्हणाली.

" लाज नाही वाटत का ? बहिणीच्या सासरी येऊन सोन्याचा हार मागताना ? स्वाती म्हणजेच नियतीची नणंद रागाने म्हणाली.

" तूला सोन्याचा हार दयायला, तू कोण मोठी लागून गेलीस ?" मालतीबाई रागाने म्हणाल्या.

" कोण म्हणजे ? मी सख्खी बहीण आहे तुमच्या सुनेची. तीन महिने झालेत मला इथे राबवून घेतलं आहे तुम्ही. मी मावशी झाले, तर तुम्ही पण आजी - आजोबा, बाबा, आत्या, काका झालेच ना ? मग मला मावशी झाल्याची शिक्षा दिलीत का ? 'तूझ्या बहिणीचं आम्हांला करायला नाही जमणार. तू ये आणि सांभाळ. ' असंच म्हणाला होतात ना ? मग फक्त बाळाच्या जन्मवेळी तोंड बघून गेलेल्या आत्याला सोन्याचा हार देताय आणि मी माझं सासर सोडून तीन महिने इथे राबतेय तर मला फक्त साडी ? जमणार नाही. मला सोन्याचा हार हवा म्हणजे हवाच.... " असं बोलून रिया तिथेच मांडी घालून बसली.

" मी या घरची लेक आहे. आणि माझा मान आहे तो. म्हणून हार मला दिला आहे. " स्वाती अजूनही रागात होती.

" आत्याचा मान असतो तो. म्हणून तिला दिलं. आणि तिचं सासर सोडून ती इथे एवढे दिवस कशी थांबणार म्हणून तुला बोलून घेतलं होत. तू तर त्याचा मोबदला मागायला लागलीस. " मालतीबाई म्हणाल्या.

" अरे वाह....! उन्हाच्या सुट्टीत महिना - दोन महिने तुमची लेक माहेरी राहू शकते. एरवी कंटाळा आला की आठवडा आठवडा राहू शकत, वहिनीला कामाला लावू शकते. पण भावजयचं करायचं म्हणल की सासर आठवलं? आणि आणि सर्व झाल्यावर तिच्या सासरच्यांनी तिला सोडलं वाटत, " जा आणि सोनं घेऊन ये " म्हणून. " रिया आज सुसाट होती.

" आमच्यात सुनेच्या बहिणींना सोन्याचं काही करायची पद्धत नाहीये. " मालतीबाई रागारागाने म्हणाल्या.

" मग काय सुनेच्या माहेरच्यांना घरी बोलून अपमान करणं, त्यांना राबवून घेणं ही पद्धत आहे का तुमच्यात ? " रिया सुद्धा प्रचंड चिडली होती.

नियतीची प्रेग्नन्सी जरा नाजूकच होती. तरी सासरी तिला राबवून घेतलं. माहेरी आई नव्हती. म्हणून मोठी बहिण म्हणून प्रत्येक वेळी रियाला नियतीच्या घरचे त्रास द्यायचे.

नियती आजारी असेल, " तूझ्या बहिणीला घेऊन जा. बरी झाली की पाठव. नाहीतर तिच्यामुळे आम्हांला त्रास होईल. "

" नियतीला प्रेग्नन्सीचा त्रास होतोय. येऊन सांभाळ तिला. "

एक ना अनेक कारण देत नियतीचे सासरचे दोघीना त्रास द्यायचे. रियाची सासरची मंडळी समंजस होती म्हणून सर्व निभावून जात होत. पण आता त्रास जास्तच वाढला होता. प्रेग्नन्सीच्या दरम्यान कित्येक वेळा रियाला बोलावलं जाई. शिवाय तिला घरातली कामे पण करायला लावायचे. नियतीला माझ्या घरी नेते म्हणाली तर, ' आमच्यात वंशाचा दिवा ' सासरीच जन्मला येतो. पण त्याचा खर्च माहेरचेचं करणार. रियाच्या आयुष्यात अस्थिरता निर्माण झाली होती. त्यामुळे तिने आता नियतीच्या सासरच्यांना हिसका दाखवायचं ठरवलं. तसं तिने आधीच नियतीला सांगितलं होत. नियती सुद्धा सासरच्या वागण्याने कंटाळली होती म्हणून तिने ही रियाची साथ दिली.

बाळ नाजूक असल्यामुळे बाळाचं बारस तीन महिन्यांनी करायचं ठरवलं होत. आज बारस झाल्यावर मालतीबाईंनी राजेशला स्वातीसाठी एक सोन्याचा हार करायला लावला होता, तो दयायला सांगितला. ते पाहून रिया सर्वांसमोर सोन्याच्या हारासाठी आडून बसली.


क्रमश :


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →