Login

तिचा वाढदिवस भाग १

Mother's Birthday
तिचा वाढदिवस भाग १

“अर्जुन, मी काय म्हणतेय, माझा वाढदिवस एवढा मोठा करण्याची काय गरज आहे. आपण घरच्या घरीच वाढदिवस साजरा करूयात ना. कशाला इतका खर्च करायचा.” सुमतीताई अर्जुनला समजावत होत्या.

अर्जुन लॅपटॉपवर काम करत होता. आपल्या हातातील लॅपटॉप त्याने बाजूला ठेवला.

“आई, तू माझा पहिला आणि पाचवा वाढदिवस मोठा केलास, तेव्हा तू काय विचार केला होता?” अर्जुनने सुमतीताईंना प्रश्न विचारला.

“तू लहानाचा मोठा होत होतास, तोच आनंद साजरा करण्यासाठी वाढदिवस साजरा करत होते. खरंतर तुझा पहिला वाढदिवस साजरा करण्याचे डोक्यात नव्हतेच. पहिल्या वाढदिवसाला मुलं गर्दी बघून खूप रडतात, त्यामुळे आपलाही मूड खराब होईल, हा विचार करून मी वाढदिवस घरच्या घरी करायचे ठरवले होते.

आठ दिवस आधी एका मैत्रिणीच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसाला गेले. तिथे तुला खूप मज्जा आली होती. तू खूप खुश होतास. मग मात्र मी ठरवलं की, तुझा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा करायचा.

तू गर्दी बघून रडला नाहीसच पण हसला सुद्धा नव्हता. तू रडला नाहीस यातच तुझे आभार मानले होते. बाकीचे तीन वाढदिवस कधी शाळेत, घरी असे केले. पाचवा वाढदिवस मात्र दणक्यात साजरा करायची तुझी सुद्धा इच्छा होती.

आता वाढदिवसाचे फोटो बघून तुलाही छान वाटतच ना. आपल्या मुलांच्या आनंदासाठी आईवडील काहीही करू शकतात. तू पहिला मुलगा असल्याने तुझे सगळं कार्यक्रम अगदी हौसेने झाले. बाकीच्यांचे वाढदिवस साधेपणानेच झाले.” सुमतीताई आठवणीत रमल्या होत्या.

“आई, म्हणूनच बाकीचे माझे भावंड माझ्यावर जळत असतात. आई, आज त्याच मुलांच्या आनंदासाठी वाढदिवस साजरा करण्यासाठी तयार हो. तुझा वाढदिवस दणक्यात साजरा करण्याची इच्छा आम्हा सगळ्यांची आहे.” अर्जुनने सांगितले.

“सुमती, मुलं कार्यक्रम करत आहेत तर त्यांना नाही नको म्हणूस.” प्रकाशराव मागे उभं राहून अर्जुन व सुमतीताईंच बोलणं ऐकत होते. त्यांनी सुमतीताईंना समजावण्याचा प्रयत्न केला.

प्रकाशराव व सुमतीताई हे नवरा बायको, त्यांना अर्जुन, अजय व आरती हे तीन अपत्य. अर्जुन आपल्या बायको व मुलांसोबत आई वडिलांसोबत पुण्यात राहत होता. अजय त्याच्या फॅमिली सोबत नाशिकला रहायचा. आरती तिच्या नवऱ्यासोबत मुंबईला रहायची. आरतीच्या नवऱ्याची दर दोन वर्षानी बदली व्हायची, म्हणून त्यांचं ठिकाण नेहमी बदलायचं.

सुमतीताईंची एकसष्टी साजरी करायची अस त्यांच्या मुलांनी ठरवली होती. सुमतीताईंना स्वतःवर एवढा खर्च करावा अस वाटत नव्हतं. अखेर सगळ्यांनी समजावून सांगितल्यावर सुमतीताई वाढदिवस साजरा करण्यासाठी तयार झाल्या.

“आई, तुम्हाला ही साडी कशी वाटतेय?” राधा म्हणजेच अर्जुनच्या बायकोने एक कोरी करकरीत साडी दाखवून सुमतीताईंना विचारले.

साडी हातात घेऊन सुमतीताई म्हणाल्या,

“ एकदम भारी. मला अशा पॅटर्नमध्ये साडी घेण्याची इच्छा होतीच.”

त्यांना साडी खूप आवडली होती.

“आता हीच साडी तुम्ही वाढदिवसाच्या कार्यक्रमात घालायची आहे.” राधाने सांगितले.

“तू ही साडी माझ्यासाठी घेतली आहेस!” सुमतीताईंना आश्चर्य वाटले होते.

“हो. आता लगेच किंमत विचारू नका. ही साडी तुम्हाला माझ्याकडून गिफ्ट.” राधा अस बोलल्यावर सुमतीताईंना पुढे काही बोलताच आले नाही.

“अग पण लगेच ब्लाऊज शिवून मिळणार नाही.” सुमतीताई म्हणाल्या.

“मी आधीच पीस काढून शिवायला टाकला आहे. वेळेत मिळेल.” राधाने सांगितले.

सुमतीताईंचा वाढदिवस कसा साजरा होईल? बघूया पुढील भागात……

©®Dr Supriya Dighe
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →